‘मुका घ्या मुका’ हा दादा कोंडके निर्मित, दिग्दर्शित, अभिनीत १९८७ला प्रदर्शित झालेला चित्रपट. या चित्रपटातही रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट द्वयर्थी असतात, एवढेच सामान्यपणे बोलले जाते. निव्वळ विनोदी चित्रपट म्हणून दादांच्या चित्रपटाकडे पाहणे हे दादांवर अन्यायकारक होईल. कारण त्यांच्या चित्रपटातून, व्यंगातून आणि फटकाºयातून जे विनोद निर्माण झालेले असतात ते बरेच काही सांगून जात असत. राजकारण्यांपासून ते व्यवस्थेपर्यंत सर्वांचे वस्त्रहरण करणारे ते फटकारे असत. असाच एक समाज आणि राज्यकर्ते, ग्रामीण राजकारण आणि गावापासून लांब असलेले सरकार यावर भाष्य करणारा हा चित्रपट.
चित्रपटाचा नायक दादा कोंडके हा मुका आहे. नाव मुकुंदा असले तरी सगळे गाव त्याला मुका म्हणूनच ओळखत असे. हा काही जन्मापासून मुका नसतो, पण लहानपणी डोक्यावर झालेल्या आघातामुळे तो मुका झालेला असतो. त्यामुळे त्याच्या खुणांच्या भाषेतून, हावभाव आणि हातवाºयातून विनोद निर्मिती करता करता अनेकांच्या भानगडी त्याच्या नजरेस पडतात. दादांच्या चित्रपटाची नेहमीची टीम यात आहे. यात रत्नमाला, उषा चव्हाण, वसंत शिंदे, मोहन कोठीवान आणि दीनानाथ टाकळकर ही नेहमीची पात्र आहेत.
उषा चव्हाण ही मोहन कोठीवानची मुलगी असते. तिच्या कुंडलीत असलेल्या मंगळामुळे ज्याच्याशी तिचे लग्न ठरवण्याचा प्रयत्न होईल तो मरणार असतो. त्यामुळे लग्न काही होत नसते. त्यामुळे गावातील टारगट, इरसाल लोक मोहन कोठीवानला मुक्याबरोबर तिचे लग्न लावून देण्यास सांगतात. मेला तरी काही फरक पडणार नाही अशा हिशोबाने लग्नाची खटपट होत असतानाच जेजुरीच्या जत्रेला तो आपल्या आईबरोबर मागे लागून जातो. इथे पाण्याचा फिरकीचा तांब्या पडल्याचे निमित्त होते आणि पायºयांवर गडगडत येतो आणि त्याच्या डोक्याला आघात होतो. त्याने त्याची वाचा परत येते. आता अनेक वर्षांचे दाबून धरलेले मनातील विचार, सगळ्यांच्या भानगडी यातून गावभर नुसता हा मुका बडबड करत खळबळ माजवून देतो. त्याची बडबड सगळ्यांना डोईजड होते. त्याचवेळी उषा चव्हाणचा बाप मोहन कोठीवान हा मुक्याला १ लाख रुपये कमवून दाखव मग तुझे माझ्या मुलीशी लग्न लावून देतो अशी अट घालतो. आता गाव सोडून मुका मुंबईला निघतो आणि त्यासाठी रेल्वेने जाण्याची वेळ येते. रेल्वे फर्स्टक्लासच्या डब्यात घुसतो. त्या डब्यात दीनानाथ टाकळकर असतो. तो असतो मोठा मंत्री. इथे कसा आला, मुक्याला तो विचारतो पण तो काही दाद लागून देत नाही. भोळसट आहे कोणीतरी यडपट म्हणून तो दुर्लक्ष करतो. रेल्वेत घरातून बांधून आणलेल्या जेवणातला घासातला घास देण्याचा प्रयत्न तो करतो. त्याचा हा भोळसटपणा टाकळकरांना आवडतो. जेवून दोघे झोपतात. दादा खालीच दोन सीटच्या मध्ये पसरून झोपी जातो आणि एक चोर गाडीत शिरतो. तो चोर टाकळकरांवर हल्ला करतो, तेव्हा दादा मध्ये उठतो आणि त्या चोराला पळून लावतो. आपल्या जीवावरचे संकट गेले आणि तेही या भोळसट माणसामुळे म्हणून ते भावूक होतात. मुंबईला गाडी आल्यावर जाग येते, तोपर्यंत दादा कुठे पसार झालेले असतात. दुसरे दिवशी एका पुतळ्याचे अनावरणासाठी हे मंत्रिमहोदय येतात, तेव्हा त्या चबुतºयावरील पुतळ्याच्या जवळ दादा झोपलेले दिसतात. ते दादांना घेऊन घरी येतात. देवासारखा माणूस म्हणून त्याचे कौतुक करतात, विचारपूस करतात. मग याला लग्नासाठी १ लाख हवेत हे लक्षात आल्यावर एक लाख देतात आणि त्याला निरोप देतात. आपला जीव वाचवल्याची ती बक्षिसी असते. पण दादा आपण हे परत करणार सांगत राहतात आणि पुन्हा रेल्वेने गावी येतात. या रेल्वेत साध्या तरटाच्या पिशवीत एक लाख रुपये घेऊन येताना. प्रत्येकाला लाख रुपये आहेत हा पिशवीत असे सांगत सुटतात. पण त्या अवताराकडे पाहून कोणी विश्वास ठेवत नाही. रेल्वेतून गावात उतरल्यावर सगळ्यांना लग्नाचे आमंत्रण देतच हा मुका प्रवेश करतो. लाखभर रुपये घेऊन आल्याची दवंडी पिटतच तो येतो, तेव्हा गावात सगळ्यांना याला वेड लागले आहे असेच वाटते. कारण एका दिवसात लाखभर रुपये कमावणे सोपे नाही. पण मुका जेव्हा ते पैसे मोहन कोटीवानला दाखवतो, तेव्हा मोहन कोठीवान ते पैस हडप करतो आणि मुक्याने पैसे आणलेच नाहीत त्याला वेड लागलेय असा कांगावा करतो. दुसरे दिवशी दीनानाथ टाकळकर गावात एका कार्यक्रमासाठी येतात आणि मुक्याची आठवण काढतात. सगळ्यांना आश्चर्य वाटते. मोहन कोठीवानची लबाडी उघडकीस येते आणि त्याला पकडून दिले जाते आणि दादा व उषाच्या लग्नाला टाकळकर पुढाकार घेतात. रंजक, विनोदी, भेदक असे असले तरी यात मार्मिकपणा खूप आहे.
यात रंजक कथानक असले तरी रेल्वेचे काम या कथानकात दादांची आणि दीनानाथ टाकळकरांची भेट होणे, त्याला एक लाख रुपये मिळणे आणि लग्नाचा मार्ग मोकळा होणे यासाठी पुरक ठरते. न शिकलेला मुका शहरात जाऊन इतके पैसे कमावून कसे आणणार? त्यासाठी रेल्वेत कोणा मोठ्या व्यक्तीचा जीव वाचवणे, त्याने उपकाराची परतफेड करणे अशा अर्थाने कथानक बांधताना रेल्वेचा वापर इथे करून घेतलेला आहे.
प्रफुल्ल फडके/द स्क्रीन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा