जागतिक विचारप्रक्रियेला भारताने एक अद्वितीय देणगी दिली आहे- सनातन धर्म, जो मुळातच सर्वसमावेशक, सहिष्णू, शांतताप्रिय आणि कल्याणकारी आहे. दुर्दैवाने परकीय विचारसरणींनी सनातन धर्माविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या परकीय षड्यंत्रांच्या आणि राजकीय स्वार्थांच्या प्रभावाखाली भारतातील काही राजकीय पक्षांनी आणि तथाकथित विचारवंतांनी सनातन धर्माविरोधात आघाडी उघडली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच तामिळनाडू विधानसभेत केलेले जहाल वक्तव्य, ज्यात त्यांनी सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे असे म्हटले आहे. त्यांच्या मते, सनातन धर्म समाजात फूट पाडतो. उदयनिधी आणि त्यांच्यासारख्या इतरांनी यापूर्वीही सनातनविरोधी वक्तव्ये केली आहेत. अशा धोकादायक वक्तव्यांमागे द्वेष आणि राजकीय स्वार्थ, तसेच सनातन धर्माबद्दलची विकृत समज दडलेली असते.
‘सनातन’ हा शब्द संस्कृतमधील ‘सद्’ या धातूपासून आला आहे. पाणिनीच्या सूत्रांनुसार, ‘सद्’ या शब्दाला ‘नुम’ हा प्रत्यय जोडून ‘सन’ हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ ‘शाश्वत’ किंवा ‘कायमस्वरूपी’ असा होतो, तर ‘तन’ म्हणजे ‘विस्तारित.’ अशाप्रकारे सनातन म्हणजे जे शाश्वतपणे विस्तारणारे आणि प्रवाही आहे. असेही म्हटले आहे की, ‘सनातनस्य धर्म: इति सनातन धर्म:’ ज्याचा अर्थ आहे की, जे नेहमीच अस्तित्वात होते आणि नेहमीच अस्तित्वात राहील ते सनातन आहे. त्याला ना आरंभ आहे ना अंत. सनातन धर्माच्या विरोधकांनी हे समजून घेतले पाहिजे की, ज्या सनातन धर्माला आरंभ किंवा अंत नाही आणि जो शाश्वत व चिरस्थायी आहे, त्याच्या विनाशाची किंवा विलोपनाची कल्पना करणे हे केवळ एक दिवास्वप्न आहे. भूतकाळात अलेक्झांडर, मिहिरकुल, मोहम्मद घोरी, महमूद गझनवी, खिलजी, चंगेज खान, तैमूर लंग, बाबर, औरंगजेब आणि इतरांनीही सनातन धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही सनातन धर्म अजिंक्य आहे.
सनातनाच्या शाश्वततेचा पाया काही वैश्विक नियम आहेत जे वैश्विक, कालातीत आणि सार्वत्रिक आहेत. या नियमांमध्ये सत्य, कर्म, कर्तव्य, नीतिमत्ता, सद्गुण, सर्वांचे कल्याण, सहिष्णुता, निसर्गपूजा आणि भक्ती यांचा समावेश आहे. म्हणजे, सनातन धर्म हा केवळ एक धर्म नाही, तर एक समग्र जीवनशैली आहे. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मासारखे धर्म सनातन धर्मापेक्षा बरेच वेगळे आहेत, जे एकाच पैगंबरावर, एकाच ग्रंथावर किंवा उपासनेच्या विशिष्ट पद्धतीवर आधारित आहेत आणि इतर काहीही स्वीकारत नाहीत. याउलट, सर्वसमावेशक सनातन धर्मामध्ये संपूर्ण पृथ्वीला आपले कुटुंब मानण्याची आणि सर्वांच्या कल्याणाची इच्छा बाळगण्याची परंपरा आहे. तरीही सनातन धर्माला द्वेषपूर्णपणे विभाजक किंवा भेदभाव करणारा म्हटले जाते का? हाच सनातन धर्म पुढे हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. कालांतराने जातीव्यवस्थेसारख्या काही वाईट गोष्टीही त्यात शिरल्या, ज्यांना अंतर्गत विरोध झाला. त्यामुळे या काही वाईट गोष्टींमुळे संपूर्ण सनातन धर्म नष्ट करण्याबद्दल बोलणे अत्यंत निंदनीय आहे.
अर्थात ही खेदाची बाब आहे की, मार्क्सवाद आणि इतर परकीय विचारसरणी तसेच लांगुलचालनाच्या राजकारणामुळे केवळ द्रमुकच नव्हे तर इतर काही पक्षदेखील सनातन धर्म किंवा हिंदुत्वाचा अनादर करत आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते, ‘ज्याप्रमाणे डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोविड-१९चे निर्मूलन केले जाते, केवळ सनातन धर्माला विरोध करणे पुरेसे नाही; त्याचे पूर्णपणे निर्मूलन केले पाहिजे.’ मद्रास उच्च न्यायालयाने या विधानाला द्वेषपूर्ण भाषण म्हटले होते. दुर्दैवाने काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील इतर मित्र पक्षांनी या विधानाला मौन बाळगून संमती दिली. उदयनिधींच्या अलीकडील विधानाचा निषेध करण्याऐवजी काँग्रेसने ते त्यांचे ‘वैयक्तिक मत’ किंवा ‘प्रादेशिक राजकारण’ असल्याचे सांगून फेटाळून लावले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी उदयनिधींच्या विधानाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनीही धर्माला वैयक्तिक बाब संबोधून उदयनिधींच्या विधानाचा निषेध करणे टाळले. त्याचा निषेध करण्याऐवजी अखिलेश यादव यांनी स्वत:च अप्रत्यक्षपणे सनातन धर्मावर हल्ला केला. मे २०२२ मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘हिंदू धर्मात कुठेही दगड ठेवा, लाल झेंडा फडकवा आणि पिंपळाच्या झाडाखाली मंदिर बांधले जाते.’ ही टिप्पणी हिंदू श्रद्धेची थट्टा होती. त्याचप्रमाणे २०२५मध्ये अखिलेश यादव म्हणाले की, त्यांना सुगंध आवडतो, म्हणून त्यांच्या सरकारने कन्नौजमध्ये परफ्यूम पार्क बांधले, तर भाजपला ‘दुर्गंर्धी’ आवडते, म्हणून ते गोशाळा बांधत आहेत. अल्पसंख्याक तुष्टीकरणाच्या राजकारणात हा ट्रेंड नवीन नाही. राम मंदिर आंदोलनादरम्यान कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराचे समर्थन करताना मुलायम सिंह यादव म्हणाले होते की, जर गोळीबार झाला नसता, तर मुस्लिमांनी देशावरील विश्वास गमावला असता.
सनातन धर्मावर हल्ला करण्याचा काँग्रेसचाही असाच इतिहास आहे. या संदर्भात, नोव्हेंबर १९६६मध्ये इंदिरा गांधींनी गोभक्तांवर केलेला गोळीबार, २००७ मध्ये रामसेतू प्रकरणात काँग्रेसप्रणीत सरकारने न्यायालयात श्रीरामाशी संबंधित ऐतिहासिक पुरावे स्वीकारण्यास दिलेला सुरुवातीचा नकार किंवा एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात राहुल गांधींनी भगवान श्रीरामांना एक काल्पनिक पात्र संबोधणे, अशी अनेक उदाहरणे आहेत.
ही एक विडंबना आहे की, सनातन परंपरा, जी मुळात सर्वात सहिष्णू, उदार आणि सर्वसमावेशक आहे, तिच्यावरच सर्वाधिक हल्ले होतात. याउलट हे राजकीय पक्ष कट्टर विचारसरणींविरुद्ध आवाज उठवत नाहीत. तिथे कोणी आंदोलन केल्यास हिंसक प्रतिक्रियांची भीती असते. तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी राजकारण, ‘पैगंबराचा अपमान करणाºयाला एकच शिक्षा आहे, ती म्हणजे शरीरापासून मस्तक वेगळे करणे,’ यांसारख्या मूलगामी घोषणांवर अनेकदा मौन बाळगते. आज, जेव्हा जग दहशतवाद, हिंसाचार, युद्ध, सांस्कृतिक असहिष्णुता आणि सामाजिक विघटन यांसारख्या आव्हानांशी झुंजत आहे, तेव्हा मानवी सभ्यतेसाठी एक संतुलित आणि शाश्वत उपाय केवळ सनातन धर्माच्या मार्गातूनच उदयास येईल. जे सनातन धर्माचा नाश करू पाहतात किंवा त्याचा अनादर करतात, त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे.
- प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा