नातवंडांचा सांभाळ करणे ही आजी-आजोबांची जबाबदारी नसून ते मुलांच्या आई-वडिलांचे कर्तव्य आहे. आजी-आजोबांवर त्यासाठी दबाव टाकता येणार नाही, असे पुण्यातील फॅमिली कोर्टाने काही वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे. खरे तर हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. कौटुंबिक स्वास्थ्य, कलह याचप्रमाणे विभक्त कुटुंबपद्धतीच्या मर्यादा स्पष्ट करणारा हा निर्णय आहे.
याची पार्श्वभूमी अशी की, पुण्यातील एका महिलेने तिच्या सासू-सासºयांच्या विरोधात या संदर्भातील याचिका दाखल केली होती. सासू-सासरे मुलांचा सांभाळ करत नाहीत म्हणून तिला नाईलाजाने मुलांना पाळणाघरात ठेवावे लागत होते. नातवंडांचा सांभाळ करणे ही सासू-सासºयांची जबाबदारी आहे, अशी भूमिका तिने कोर्टात मांडली होती. कोर्टाने तिची ही भूमिका अयोग्य ठरवली. न्यायालयाच्या या निकालाबद्दल काहीच बोलायचे नाही, पण विभक्त कुटुंबपद्धतीमुळे काय काय तोटे होऊ लागले याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे नोकरी, कामधंद्यातून आपण निवृत्त झालो तरी संसारातून निवृत्त कधी होणार, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे. निवृत्त आई-बाप किंवा सासू-सासरे हे आपल्या सोयीप्रमाणे वापरण्याचे नोकरदार आहेत का? असा समज यातून दिसून येतो. जे प्रेमाने मिळू शकते ते कायद्याच्या धाकाने मिळवता येणार नाही हे पण या निकालाने स्पष्ट झालेले आहे.
आपल्या नातवंडांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा असे प्रत्येक आजी-आजोबांना वाटत असते. त्यामुळे बहुतेक घरात मुलगा, सून नोकरी करत असतील तर त्या आजी-आजोबांना निवृत्तीनंतर नवे काम लागलेले असते. संसारातून, मोहपाशातून, मायाजालातून त्यांची सुटका झालेली नसते तर नवे बंध त्यांना जखडून ठेवतात. त्यामुळे वानप्रस्थाश्रमात जाण्याच्या वयात संसारात गुरफटण्याची वेळ त्यांच्यावर येते. असे गुरुफटणे टाळले तर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. त्यामुळे आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यावर कायद्याचा धाक दाखवून मुलांची जबाबदारी टाकण्याचा प्रकार हा पुण्यात होताना दिसला. सासू-सासरे हे कुटुंबातील घटक म्हणून नाही तर मुले सांभाळण्यासाठी हवे आहेत असे या विचारातून दिसते. त्यामुळेच न्यायालयात अशाप्रकारे सासू-सासºयांविरोधात दाद मागणाºया एका सुनेला न्यायालयाने सुनावले.
या निकालात न्यायालयाने म्हटले होते की, नातवंडांना मार्गदर्शन करणे, चुका सांगणे, पालन-पोषणात मदत करणे याला आजी-आजोबांची जबाबदारी म्हणता येईलही, पण त्यांचा सांभाळ करणे ही पूर्णत: आई-वडिलांचीच जबाबदारी आहे. आजी-आजोबांवर त्यासाठी सक्ती करता येत नाही. मुलांचा सांभाळ करायला आजी-आजोबा म्हणजे बेबीसिटर नाहीत, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेला खडसावले होते. विषय तसा घरगुती आणि छोटा वाटत असला तरी यातून सासू-सासºयांकडे कोणत्या नजरेतून पाहिले जाते हे लक्षात येते. नैतिक जबाबदारीने सासू-सासºयांनी नातवंडांना सांभाळणे वेगळे आणि कायद्याचा धाक दाखवून सांभाळण्यास भाग पाडणे वेगळे. आपल्या नातवंडांसमवेत वेळ घालवायला कोणाला आवडणार नाही? दुधापेक्षा दुधाच्या सायीवर जास्त प्रेम असते. तरीही आपण आजी-आजोबांवर कायद्याने सक्ती करणे हे म्हणजे अतीच झाले.
नोकरी करणाºया कुटुंबांमध्ये हे प्रकार सगळीकडे आहेत. सासू-सासरे आहेत, पण त्यांच्यापासून वेगळे राहायला हवे. मुले झाल्यावर ती सांभाळण्यासाठी मात्र सासू-सासरे हवेत. याचा अर्थ कौटुंबिक भावनेतून नाही तर व्यवहाराच्या भावनेतून गडी कामगार म्हणून सासू-सासरे हवेत असाच अर्थ यातून होतो. सासू-सासरे म्हणजे फुकटात मिळालेले केअर टेकर किंवा कामगार असा समज कोणी करून घेत असेल तर तो चुकीचा आहे. अशांना या न्यायालयाच्या निर्णयाने समाधान वाटेल. पण सासू-सासरे नातवंडांना सांभाळू शकत नाहीत, म्हणून मुलांना पाळणाघरात ठेवावे लागते या कारणाने न्यायालयात सासू-सासºयांविरोधात एक सून दाद मागते हा प्रकार फारच गमतीशिर म्हणावा लागेल. याचे कारण या खटल्यात त्या मुलाचा कुठेही उल्लेख नाही. सासू-सासरे विरुद्ध सून असाच या बातमीतून उल्लेख दिसतो. मग त्या सासू-सासºयांच्या मुलाचा म्हणजे सूनेच्या पतीचा यात काहीच सहभाग नाही. त्याची भूमिका कुठेच स्पष्ट होत नाही. त्यामुळे या घटनेबाबत आणखी संभ्रमावस्था निर्माण होते. पतीला सोडून किंवा पतीच्या माघारी त्याचा संसार सांभाळणारी ती महिला असेल आणि पती नसल्यामुळे तिला नोकरी करावी लागत असेल तर अशा परिस्थितीत आपल्या मुलांना सासू-सासºयांनी सांभाळावे अशी तिची अपेक्षा असेल तर त्यात गैर काही नाही. पण तो हयात असेल तर अशाप्रकारे हे प्रकरण न्यायालयात कसे त्याने जाऊन दिले हा प्रश्न पडतो. पण एकूणच सासू-सासरे किंवा आई-वडील यांना आजकाल आपल्या मुलांकडे राहण्याची वेळ येत असेल तर त्यांना अशा कामांसाठी जुंपले जाते हे निश्चित.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी अशाच विषयांचे चित्रपट मराठी आणि हिंदीतून येऊन गेले आहेत. तू तिथे मी हा स्मिता तळवलकरांचा चित्रपट किंवा बागबान हा अमिताभ, हेमा मालिनीचा चित्रपट म्हणजे निवृत्त आई-बापांकडून मुलांनी बाळगलेल्या चुकीच्या अपेक्षा स्पष्ट करतात. हे अत्यंत चिंतनशिल असे आहे. आजकाल आपल्या सासू-सासºयांना अमेरिकेत, आॅस्टेÑलियात आमंत्रित करण्याचा आग्रह होतो. तिथे नोकर मिळत नाहीत, त्यामुळे सगळी कामे करावी लागतात. त्यामुळे अशा सासू-सासºयांची तिकडे अवस्था घरगडी अशीच होते. असे घरगडी म्हणून येणारे निवृत्त लोकांची संख्या वाढू नये म्हणून अमेरिकेने दोघांना व्हिजा नाकारण्याचे धोरणही अवलंबले आहे. पती किंवा पत्नी दोघांपैकी एकालाच यायला परवानगी दिली जाते. म्हणजे एकमेकांच्या ओढीने ते परत भारतात जातील. पण विभक्त कुटुंब पद्धतीने निर्माण केलेली ही समस्या फारच भयावह अशी आहे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा