शनिवार, १६ मे, २०२६

पाकीस्तान सुधारणार नाही


अलीकडेच आॅपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारताने पाकिस्तानला कसे पराभूत केले, याची सर्वांनी आठवण केली. पण, आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, पाकिस्तानचे चारित्र्य बदललेले नाही. याचा पुरावा म्हणजे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे विधान की, जर पाकिस्तानवर पुन्हा हल्ला झाला, तर त्याचे परिणाम व्यापक, धोकादायक, दूरगामी आणि वेदनादायी असतील. पाकिस्तान-समर्थित दहशतवादी नेटवर्क अजूनही सक्रिय आहे, या वस्तुस्थितीकडेही आपण दुर्लक्ष करू शकत नाही.


त्यांची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय पूर्वीप्रमाणेच भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली आहे आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे तिचे मनोधैर्य वाढले आहे. पाकिस्तान सुधारणार आहे असे गृहीत धरणे अन्यायकारक ठरेल. गेल्या वर्षी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट आणि उच्चभ्रू दहशतवादी गटाचा उदय, हे दर्शवते की दहशतवादाचा धोका कायम आहे. अलीकडच्या वर्षांत एनआयए आणि विविध राज्यांतील पोलिसांनी अनेक संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे लोक शस्त्रांची व्यवस्था करणे, रसद व्यवस्थापन करणे आणि दहशतवादी योजनांची अंमलबजावणी करणे यात महत्त्वाची भूमिका बजावत होते.

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे दहशतवादात सामील असलेल्या व्यक्तींचे बदलणारे स्वरूप. काही आरोपी सुशिक्षित व्यावसायिक होते, ज्यात डॉक्टर आणि तांत्रिकदृष्ट्या कुशल व्यक्तींचा समावेश होता. हे उच्चभ्रू दहशतवादाचा वाढता शिरकाव दर्शवते, जिथे दहशतवादी कारवायांमध्ये माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आर्थिक क्षमतांचा वापर केला जात आहे. अशा घटकांना ओळखणे अधिक कठीण असते, कारण ते कायदेशीर संस्थात्मक चौकटीत राहून काम करतात आणि आपली ओळख लपवून ठेवतात. इस्लामिक स्टेटशी संबंधित गटही भारतात सक्रिय असल्याचे दिसून येते. भरती, पाळत ठेवणे आणि स्फोटकांचे प्रशिक्षण यांसारख्या कारवायांमध्ये सामील असलेल्या स्लीपर सेलची ओळख पटली आहे. विविध राज्यांमध्ये झालेल्या धरपकडीमुळे हे देखील सूचित होते की, हे वेगळे गट नाहीत, तर एका व्यापक आणि एकमेकांशी जोडलेल्या नेटवर्कचा भाग आहेत.


आज दहशतवाद वेगाने आपले स्वरूप बदलत आहे. हे आता केवळ बंदुका आणि बॉम्बपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते अधिक विकेंद्रित, तंत्रज्ञान-आधारित आणि चकमा देणारे बनले आहे. अवैध शस्त्रांची तस्करी ही देखील एक गंभीर चिंतेची बाब आहे. एके-४७ सारख्या शस्त्रांच्या जप्तीमुळे एका संघटित सीमापार पुरवठा जाळ्याचा पदार्फाश झाला आहे, ज्यामुळे बाह्य पाठिंबा आणि देशांतर्गत जाळ्यांमधील संबंध अधोरेखित झाला आहे. हे स्पष्ट आहे की, भरती, निधीपुरवठा, रसद आणि अंमलबजावणीची एक सुसंघटित प्रणाली अस्तित्वात आहे. ही अधिकाधिक अत्याधुनिक रणनीती दहशतवादी रचनेच्या तपशिलातही दिसून येते.

मार्च महिन्यात दिल्ली कॅन्ट रेल्वे स्टेशनवर आयएसआय-संबंधित एका हेरगिरीच्या कटाचा पदार्फाश झाला, ज्यात गुप्तपणे बसवलेल्या सौर-ऊर्जेवर चालणाºया सीसीटीव्ही कॅमेºयांचा वापर लष्करी हालचालींचे थेट फुटेज पाकिस्तानी सूत्रधारांना पाठवण्यासाठी केला जात होता. यावरून हे दिसून येते की, पाळत ठेवण्याच्या कारवाया अधिकाधिक गुप्त आणि तंत्रज्ञान-आधारित होत आहेत. अशी उपकरणे लष्करी हालचालींचा नकाशा तयार करण्यास, कमकुवत दुवे ओळखण्यास आणि भविष्यातील हल्ल्यांची तयारी करण्यास मदत करू शकतात. लहान घटनादेखील एका मोठ्या कटाचा भाग असू शकत असल्याने सतत सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे.


आणखी एक गंभीर चिंतेची बाब म्हणजे कायदेशीर व्यावसायिक व्यासपीठांचा गैरवापर, ज्याकडे कधीकधी ‘कॉर्पोरेट जिहाद’ म्हणून पाहिले जाते. नाशिकमधील एका बीपीओच्या प्रकरणामुळे हे दिसून आले आहे की, दहशतवादी कारवायांसाठी जाळे विणण्याकरिता आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी व्यावसायिक संस्थांचा कसा वापर केला जाऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होते की, दहशतवादी डावपेच आता पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे विस्तारले आहेत. डिजिटल कट्टरतावाद हा देखील एक वेगाने वाढणारा धोका बनला आहे. आॅनलाइन प्रचार, एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म आणि लक्ष्यित संदेशांद्वारे तरुणांवर प्रभाव टाकला जात आहे आणि त्यांची भरती केली जात आहे. यामुळे दहशतवादाचा धोका अधिक व्यापक, अदृश्य आणि दीर्घकाळ टिकणारा बनला आहे.

खलिस्तानसारखे जुने मुद्दे पुन्हा उकरून काढून पाकिस्तान भारतातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. चंदीगडमधील भाजप कार्यालयाजवळील स्फोट, जालंधरमधील बीएसएफ मुख्यालयाबाहेरील स्फोट आणि आयएसआय-समर्थित गटांचा पदार्फाश या घटनांमधून हाच कल दिसून येतो. या कारवायांकडे सामाजिक दरी वाढवण्यासाठी आणि जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी चालवल्या जाणाºया डिजिटल प्रचार मोहिमेचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे भारताला कोणताही निष्काळजीपणा परवडणार नाही.


आॅपरेशन सिंदूरच्या यशाला एका मजबूत आणि आधुनिक अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा आधार असणे आवश्यक आहे. विविध संस्थांमध्ये उत्तम समन्वय, तत्काळ गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हे धोके वेळेवर ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रहारसारख्या जलद प्रतिसाद यंत्रणा गरजेच्या वेळी तत्काळ कारवाई सुनिश्चित करू शकतात. त्याच वेळी कट्टरतावादाच्या मूळ कारणांवर प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरुणांना अतिरेकी विचार आणि चुकीच्या माहितीबद्दल शिक्षित करणे हे प्रतिबंधात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शालेय स्तरावर अंतर्गत सुरक्षेची मूलभूत समज विकसित केल्याने समाज अधिक दक्ष आणि जबाबदार बनू शकतो.

सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण दहशतवादी संघटना अनेकदा फूट आणि असंतोषाचा गैरफायदा घेतात. दहशतवादाविरुद्धचा हा लढा केवळ शारीरिकच नाही, तर वैचारिकही आहे, ज्यासाठी एका प्रभावी प्रति-कथनाची आवश्यकता आहे. भारतापुढील आव्हान केवळ दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे हे नाही, तर त्यांचा अंदाज घेऊन ते हाणून पाडणे हेही आहे. संकरित दहशतवादाच्या या युगात, जिथे बाह्य आणि अंतर्गत धोके अधिकाधिक एकमेकांत गुंतले आहेत, तिथे सततची दक्षता, सज्जता आणि सामरिक लवचिकता हीच अंतिम सुरक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: