शनिवार, १६ मे, २०२६

चंदनाची चोळी अंग अंग जाळी (चित्रपटातील रेल्वे 1)


ज्येष्ठ सीनेपत्रकार अनिल तोरणे यांनी मागच्या आठवड्यातील अनंत माने यांच्या लेखावरील एक प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्याशी झालेल्या संवादातून नवा विषय तयार झाला. तो म्हणजे चित्रपटातील रेल्वे. अर्थात मुंबईची लोकल ट्रेन ही जशी जीवनवाहिनी आहे, तशीच ती चित्रपट क्षेत्राचीही महत्त्वाची वाहिनी आहे. बहुसंख्य चित्रपटात रेल्वेतील दृश्य किंवा रेल्वेशी संबंधित दृश्य ही कथानकाचा एक भाग असतात. म्हणूनच यातील रंजकता लक्षात घेता एक छान मालिका आपल्या आठवणींसाठी होऊ शकते हे दिसून आले. जागा आणि वेळेअभावी सगळ्याच चित्रपटांचा उल्लेख इथे करणे केवळ अशक्य आहे. पण काही चित्रपटांत रेल्वेने आयुष्याला कलाटणी दिलेली आहे, त्यांचा उल्लेख या ठिकाणी होईल. त्यासाठी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांचा येथे उल्लेख होईल. अर्थात सुरुवात आपण मराठी चित्रपटापासून करणार यात शंका नाही.


मराठीतील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक म्हणून आपण नेहमीच व्ही. शांताराम यांचा उल्लेख करतो. अनेक गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. त्यातील अखेरच्या काळातील एक चित्रपट म्हणजे चंदनाची चोळी अंग अंग जाळी हा चित्रपट. या चित्रपटात कथानकाला कलाटणी देण्याचे किंवा कथानक तयार करण्याचे काम रेल्वे करते.

१९७५ साली शांताराम बापूंनी निर्माण केलेल्या या चित्रपटात नायक अरुण सरनाईक हा आपल्या आईच्या मर्जीने लग्नास तयार होतो. आईने पसंत केलेली मुलगी म्हणून तिला बघण्याचीही गरज नाही असे म्हणून मुलगी पाहतही नाही. आई आंधळी असते. मोठा भाऊ अपघातामुळे लग्नाला येऊ शकत नाही. जो घरातील कर्ता पुरुष आहे. त्यामुळे अरुण सरनाईक आपल्या आंधळ्या आईबरोबर लग्नाला येतो. लग्नातही बायकोला पाहत नाही तर दुसरीकडे चेहरा करून आंतरपाठ दूर झाल्यावर हार घालतो. लग्नानंतर आई आणि बायकोला घेऊन रेल्वेत बसतो, तोही दुसरीकडे पाहत आणि दरवाजात उभा राहतो. बायकोचे तोंडही पाहिलेले नसते. अशा अवस्थेत रेल्वेने गावाकडे जायला निघतो.


दुसरीकडे गौरा तमासगिरीण म्हणजे संध्या ही आपल्या ताफ्यासह दुसºया एका रेल्वेत बसते. सगळे तमासगिर, साथीदार असा ताफा त्या डब्यात बसलेला असतो. आदल्या दिवशी झालेल्या प्रयोगाची चर्चा होते. यातील तिची लावणी हिरवा शालू, हिरवी चोळी, लाज लाजून मी गोरी मोरी झाले गं हे सुरू होते. कधी आदल्या दिवसाच्या प्रयोगाची आठवण तर कधी रेल्वेतील दृश्य अशात धमाकेदार लावणी सुरू होते. एका बाजूने अरुण सरनाईकची रेल्वे येते तर विरुद्ध बाजूने संध्या आणि तिचा ताफा असलेली आगगाडी येते. एकाचवेळी समोरासमोरून येणाºया दोन आगगाड्या एकाच रुळावर येतात आणि धडक होऊन मोठा अपघात होतो. पुलावरून सगळे कोसळतात आणि इथेच कथानकाला रेल्वेमुळे कलाटणी मिळते. अरुण सरनाईक चाचपडत सावरत उठतो, आपली आई, बायको कुठे दिसते का पाहतो. तर त्याला हिरव्या साडीतील संध्या दिसते. हिच आपली बायको असेल असे समजून तो तिला जवळ घेतो. ती ओळखत नाही त्याला, पण त्याला वाटते अपघातामुळे हिच्या मनावर परिणाम झाला असेल. तो तिला समजावतो आपले लग्न झाले आज. असे म्हणून तिला बरोबर येण्याची विनंती करतो. संध्याही आपण किती दिवस तमासगिरीण म्हणून जगायचे? देवाने ही संधी दिली आहे तर छान संसार करू म्हणून त्याच्याबरोबर घरी येते. इथून पुढे कथानकात बराच संघर्ष, रंजकता येते. तिचे तमासगिरणीचे राहणीमान आणि हा वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्त. या चित्रपटाचे कथानक घडवण्यासाठी रेल्वे हे माध्यम ठरते. पुढे कथानकातील खºया गोष्टी उलगडू लागतात. त्यात साखर कारखानदारीचे राजकारण, वगैरे घेत कथानक रंजक बनते. पण यात कथानकाचा गाभा रेल्वे अपघात राहतो. गौरा म्हणजे संध्याला अजून लहान भावंडे असतात. ही तमाशातून गेल्यामुळे तमाशा बंद पडतो. त्यामुळे सगळ्या लहान भावंडांची उपासमार होऊ लागते. अचानक एका भावाला ती दिसते आणि लहान भावंडेही गौराला शोधत त्या गावात येतात. ही खरी कोण आहे हे कळल्यावर तिला घरातून हाकलून दिले जाते. त्यानंतर भावंडांसाठी ती पुन्हा तमाशा उभा करते. यात खलनायक असलेल्या रमेश देवची वाईट दृष्टी तिच्यावर असणे असा भरपूर मसाला आणि गाणी यातून हा चित्रपट रंजक बनतो.

व्ही. शांताराम यांचा चित्रपट असल्याने नृत्य आणि गीते दमदार आहेत हे सांगायला नकोच. यात अरुण सरनाईक याच्या मोठ्या भावाचे काम भालचंद्र कुलकर्णी यांनी तर वहिनी सरोज सुखटणकर यांनी केले आहे. आंधळी आई शांता तांबे आहे. नायिका संध्या आहे. तर छोट्या पण लक्षवेधी भूमिकेत बी माजनाळकर आणि रंजना देशमुख येथे चमक दाखवतात. खलनायकाची भूमिका रमेश देव यांनी साकारली आहे. यातील एक लाजरा न साजरा मुखडा हे गीत प्रचंड गाजले. त्याचप्रमाणे हिरवा शालू, माझ्या डोळ्यात कचरा गेला, चंदनाची चोळी अंग अंग जाळी ही गीतेही चांगली आहेत. रेल्वेच्या आगगाडीच्या तालावरील संगीतात असलेले हिरवा शालू हिरवी चोळी हे गाणे रेल्वे आणि लावणी यांची ओळख टिकवून ठेवते हे याचे वैशिष्ट्य. मजबूत कथानक असले तरी त्या काळात यावर टीकाही भरपूर झालेली होती. पण व्ही. शांताराम प्रॉडक्शनचा हा एक महत्त्वाचा चित्रपट होता, ज्यात रेल्वेची भूमिका महत्त्वाची होती.


- प्रफुल्ल फडके/द स्क्रीन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: