सोमवार, १ जून, २०२६

बदलानंतरची आव्हाने


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यामुळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी राज्याचा कार्यभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिवकुमार यांची इच्छा पूर्ण झाली आहे, परंतु कर्नाटक काँग्रेसमध्ये सर्व काही पूर्ववत होईल की, राज्याच्या विविध समस्या सोडवण्याचा मार्ग सुकर झाला आहे, हे सांगणे कठीण आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना सांगितले की, काँग्रेस नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे. तथापि, राज्यसभेत सामील होऊन केंद्रीय काँग्रेस राजकारणात सक्रिय होण्याची विनंती त्यांनी नाकारली आणि आपण राज्य राजकारणातच सक्रिय राहू असे सांगितले.


सिद्धरामय्या हे तळागाळातील नेते असून, त्यांना मोठा पाठिंबा असल्याने मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांच्यासमोर ते आव्हान उभे करू शकतात. यामुळे पुन्हा गटबाजी निर्माण होऊ शकते, कारण शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळातून त्यांच्या काही समर्थकांना वगळले जाऊ शकते. शिवाय, शिवकुमार आपल्या इच्छेनुसार सरकार चालवतील हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी ते प्रशासनातील माजी मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना बाजूला सारू शकतात.

सिद्धरामय्या त्यांचे उत्तराधिकारी शिवकुमार यांच्यासाठी मैदान मोकळे सोडतील अशी शक्यता कमी आहे, कारण तळागाळातील नेता आपले राजकीय वर्चस्व इतक्या सहजपणे सोडत नाही. आपल्या देशात तर हे आणखी दुर्मीळ आहे. आपल्या देशात वयस्कर नेते पूर्णपणे बाजूला सारल्याशिवाय राजकारणातून निवृत्त होत नाहीत. काँग्रेसला सिद्धरामय्या यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.


काँग्रेसने विधानसभा निवडणुका जिंकल्यापासून शिवकुमार २०२३ साली मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते, परंतु काँग्रेस नेतृत्वाने ज्येष्ठतेच्या आधारावर सिद्धरामय्या यांची निवड केली. शिवकुमार यांनी दावा केला होता की, ते आणि सिद्धरामय्या यांनी प्रत्येकी अडीच वर्षे सत्ता वाटून घेण्याचे मान्य केले होते. त्यांच्या दाव्याप्रमाणेच, ते बºयाच काळापासून मुख्यमंत्रीपदाच्या मागे लागले होते, परंतु सिद्धरामय्या ते पद सोडायला तयार नव्हते. अखेरीस काँग्रेस हायकमांडच्या दबावाखाली ते तीन वर्षांनंतर पायउतार होण्यास तयार झाले. याचा अर्थ आहे की स्पष्टपणे त्यांनी दबावाखाली राजीनामा दिला आहे.

कर्नाटकप्रमाणेच राजस्थानमध्येही एक काळ असा होता, जेव्हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या करारावरून संघर्ष झाला होता. सचिन पायलट यांनी या कथित कराराच्या आधारे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अशोक गेहलोत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी काँग्रेस हायकमांडचे निर्देशही फेटाळून लावले. यामुळे सचिन पायलट आणि काँग्रेस हायकमांड यांच्यातील संघर्ष सुरूच राहिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस हायकमांड कोणताही निर्णय घेऊ शकले नाही. अशीच परिस्थिती छत्तीसगडमध्येही निर्माण झाली. येथे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी. एस. सिंह देव यांच्यात सत्ता वाटून घेण्यासाठी ठरलेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळावरून वाद सुरूच होता. येथेही काँग्रेस नेतृत्व कोणताही निर्णय घेऊ शकले नाही. परिणामी, मुख्यमंत्रीपदासाठीचा हा संघर्ष दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण ठरला.


पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विधानसभा निवडणुकीच्या जवळपास एक वर्ष आधी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. मात्र, त्याऐवजी चरणजीत सिंग चन्नी यांनी ते पद स्वीकारले. यामुळे गटबाजीला खतपाणी मिळाले आणि आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत याचा फायदा उचलला. दोन वर्षांत कर्नाटकात निवडणुका होणार आहेत. तेव्हा काय होईल हे सांगणे कठीण आहे, परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की, १९८० पासून कर्नाटकात कोणतेही सरकार पुन्हा सत्तेवर आलेले नाही. शिवकुमार हा ट्रेंड मोडू शकतील की नाही हे सांगणे कठीण आहे, कारण कर्नाटक अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू, एक आयटी शहर म्हणून ओळखली जाते, परंतु सध्या बंगळुरूसोबतच देशभरातील आयटी उद्योगालाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बंगळुरू वगळता कर्नाटकातील केवळ काही मोजकीच शहरे खºया अर्थाने विकसित झाली आहेत. बंगळुरू आणि राज्याच्या उर्वरित भागातील आर्थिक विषमता हे दर्शवते की, सरकारांनी इतर शहरे आणि ग्रामीण भागांच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. इतर अनेक राज्यांप्रमाणेच कर्नाटकही त्याच आर्थिक आणि सामाजिक समस्यांशी झुंजत आहे.


कर्नाटकातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे कोणत्याही पक्षाला अवघड आहे, कारण ग्रामीण जनतेला संतुष्ट करण्याच्या नावाखाली, लोकप्रिय योजनांवर कमी आणि फुकटच्या लाभांवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. फुकटच्या लाभांचे राजकारण कर्नाटकासाठी एक समस्या बनले आहे, हे काही गुपित नाही. लोकप्रिय योजनांच्या पाठपुराव्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशा योजना फुकटच्या लाभांच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतात आणि राज्याच्या आर्थिक आरोग्याची स्थिती आणखी खालावतात.

हे इतर काही राज्यांमध्येही घडत आहे. कर्नाटकाप्रमाणेच अनेक राज्यांमध्ये आर्थिक विकास राजधानी आणि निवडक शहरांपुरता मर्यादित असल्याचे दिसते. बहुतेक राज्यांच्या मागासलेपणामागे हे कारण आहे की, त्यांची सरकारे राज्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करत नाहीत. यामुळे आर्थिक असमतोल आणि विषमता निर्माण होते. हे कर्नाटकातही स्पष्टपणे दिसून येते. ही परिस्थिती शिवकुमार यांच्यासमोर एक आव्हान उभे करू शकते.


प्रमुख राज्यांपैकी तेलंगणा वगळता काँग्रेसकडे केवळ कर्नाटक हे राज्य आहे. जर पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ता गमावली आणि भाजप सत्तेवर आला, तर त्यांचा देशव्यापी प्रभाव आणखी वाढेल. यामुळे काँग्रेसला स्पर्धा करणे कठीण होईल. स्पष्टपणे शिवकुमार यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती बुधवारी होत आहे, परंतु राज्याला त्याच्या समस्यांमधून बाहेर काढणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली अभिनेत्री नर्गिस


मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा १ जून हा जन्मदिवस. १ जून १९२९ रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद असे होते. १९३५ साली वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी ‘तलाश-ए-हक’ या सिनेमातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांना ‘बेबी नर्गिस’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. अभिनेत्री म्हणून १९४२ मध्ये त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या. राज कपूर आणि नर्गिस ही एक अविस्मरणीय जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत होती.


४० आणि ५०च्या दशकात त्या खूप गाजल्या. ‘बरसात’, ‘आवारा’, ‘अंदाज’, ‘श्री ४२०’, ‘दीदार’, ‘चोरी चोरी’, ‘मदर इंडिया’ यासारखे चित्रपट त्यांनी केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिस यांचा उल्लेख होतो. बॉलीवूडची पहिली क्वीन म्हणून नर्गिस दत्त यांना ओळखले जाते. नर्गिसची पहिली ओळख ‘श्री ४२०’चे गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’मध्ये एका छत्रीखाली उभे असलेले नर्गिस आणि राज कपूर यातून होते. तर दुसरी ओळख म्हणजे ‘मदर इंडिया’मध्ये पुढे झोकून नांगर ओढताना दिसणारी नर्गिस.

खरे तर नर्गिस यांची बालपणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्या १४ वर्षांच्या असताना दिग्दर्शक महबूब खान यांनी त्यांच्या ‘तकदीर’ या सिनेमात मोतीलाल यांच्या हिरोईनच्या रूपात त्यांची आॅडिशन घेतली होती. कोणतीही समज नसताना नर्गिस यांनी डायलॉग्स वाचले आणि काय आश् चर्य सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी मान्य केले, की नर्गिसच सिनेमाची हिरोईन होणार. तेव्हा त्यांना रडू कोसळले. त्यांना सिनेमात येण्याची इच्छा नव्हती. तेव्हाच्या काळात सिनेमात काम करणाºयांना वाईट नजरेने बघितले जात होते. नर्गिस यांना आदराचे आयुष्य हवे होते. त्यांना डॉक्टर व्हायचे होते.


पण नियतीच्या मनात असते तसेच होते. आई जद्दनबाई यांनी आपल्या ‘तलाश-ए-इश्क’ सिनेमात नर्गिसकडून काम करून घेतले. १९३५मध्ये बनलेल्या या सिनेमात नर्गिस केवळ ५ वर्षांच्या होत्या. याच सिनेमापासून त्यांचे नाव ‘बेबी नर्गिस’ पडले. नर्गिस यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात आई जद्दनबार्इंनी केली. परंतु नर्गिस यांनी आपल्या पद्धतीने काम केले आणि कायम स्मरणात राहिल्या.

नर्गिस दत्त या पहिल्या अशा अभिनेत्री होत्या ज्यांना भारत सरकारतर्फे मानाचा पद्यश्री पुरस्कार देण्यात आला. त्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. मुंबईच्या वांद्रेमध्ये त्यांच्या नावाचा एक रस्ता आहे. दरवर्षी होणाºया राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला ‘द नर्गिस दत्त अवॉर्ड’ दिला जातो. १९८०मध्ये त्या राज्यसभेच्या खासदारही बनल्या होत्या. ‘मदर इंडिया’, ‘अंदाज’, ‘अनहोनी’, ‘जोगन’, ‘आवारा’ आणि ‘रात दिन’मध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले.


नर्गिस यांनी वास्तव जीवनात सुनील दत्त यांच्याशी विवाह केला. पण त्यांनी ‘मदर इंडिया’ या चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. मेहबूब खान यांनी सुनील दत्त यांची ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी निवड केली. चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली ज्यामुळे सुनील दत्त आणि नर्गिस आयुष्यभरासाठी एकत्र आले. गुजरात येथील बिलीमोर गावात ‘मदर इंडिया’चे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटाच्या एका दृश्यात शेतात आग लागते. परंतु या आगीत नर्गिस या खरेच अडकल्या होत्या आणि सुनील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले होते. खरे तर यादरम्यान सुनील देखील खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची रुग्णालयात खूप काळजी घेतली होती. आगीच्या घटनेनंतर नर्गिस यांचा सुनील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

‘मदर इंडिया’ नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा हा सिनेमा. भारतीय महिलेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची कथा फारच दमदार होती. म्हणूनच त्याला आॅस्करसाठी नामांकित करण्यात आले. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. २००१ साली अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच शतकातील अभिनेत्री म्हणून नर्गिस यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


नर्गिस म्हणाल्या होत्या, ‘मी सुरुवातीलाच निश्चय केला होता, की लग्न केल्यानंतर सिनेमांमध्ये काम करणे सोडून देईन. कारण फिल्मी आणि खासगी आयुष्य आपण एकत्र जगू शकत नाही.’ त्याप्रमाणे सुनील दत्त यांच्याशी विवाह केल्यावर त्यांनी चित्रपटात काम करणे सोडले. नर्गिस या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. त्यांनी नेत्रहीन आणि विशेष मुलांसाठी काम केले. त्या भारतातील पहिल्या स्पास्टिक्स सोसायटीच्या पेट्रन बनल्या. त्यांनी अजंटा आर्ट्स कल्चरल ट्रूप बनवले. त्यामध्ये तेव्हाचे नामवंत अभिनेते आणि गायक सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवत होते. त्यांचे मनोरंजन केले जात होते. बांगलादेश बनल्यानंतर १९७१मध्ये त्यांच्या पहिल्या दलाने तिथे परफॉर्म केला होता. संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’चा प्रीमिअर ७ मे १९८१मध्ये झाला होता. त्याच्या चार दिवसांआधीच म्हणजे ३ मे रोजी नर्गिस यांचा मृत्यू झाला. प्रीमिअरवेळी त्यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.

भारतीय टपाल खात्यानेही नर्गिस यांच्या प्रतिमेचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता. १९८० साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. न्यूयॉर्क येथे काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण ३ मे १९८१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सुनील दत्त अत्यंत दुखावले होते. कॅन्सर विरोधात उपचारासाठी त्यांनी खूप चळवळ उभी केली. ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपटही त्यांनी निर्माण केला होता. त्याची प्रेरणा नर्गिस यांच्या मृत्यूतून मिळाली होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ देदीप्यमान करणारी नर्गिस कायम लक्षात राहणारी आहे.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन


लवचिक भू राजकारणाचे आंतरराष्ट्रीय परिणाम


लवचिक भू-राजकारणाचे जनक असलेल्या भारताच्या उदाहरणाचे अनुसरण करून त्याची लोकप्रियता आता जगभरात वाढत आहे. याला मोदी सिद्धांत म्हणणे अधिक योग्य ठरेल, जे अलिप्ततावादाचे एक संकरित धोरणात्मक स्वरूप आहे. सर्वसाधारण भाषेत, खुले आणि बंद ही जागतिक राजनैतिकता आता लवचिक भू-राजकारण बनली आहे.


खरे तर लवचिक भू-राजकारण म्हणजे एक संधीसाधू परराष्ट्र धोरण, ज्यामध्ये देश कधीकधी मैत्रीचे दरवाजे उघडतात आणि कधीकधी ते स्वत:च्या हितानुसार लगेच बंद करतात. हे लवचिक भू-राजकारण आजच्या जगात वेगाने वाढत आहे. याचे यशस्वी वापरकर्ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीम. याचा सर्वात मोठा फायदा भारतासारख्या देशांना होतो, जे आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली, तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर, लष्करीदृष्ट्या सक्षम आहेत आणि बहुध्रुवीय जगात संतुलन कसे राखायचे हे जाणतात. म्हणूनच भारत हे धोरण स्वीकारत आहे आणि जगातील आघाडीच्या देशांच्या पंक्तीत सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

प्रश्न हा आहे की, याचा फायदा कोणाला होईल? याची अनेक उत्तरे आहेत, त्यापैकी पहिले म्हणजे महासत्तांना सर्वाधिक फायदा होतो. अमेरिका, चीन आणि काही प्रमाणात रशिया व भारतासारख्या देशांना या धोरणाचा सर्वाधिक फायदा होतो. पुढचा प्रश्न असा आहे की, का? याचे सोपे उत्तर असे आहे की, ते परिस्थितीनुसार आपल्या युती बदलू शकतात. ते आर्थिक निर्बंध, लष्करी दबाव आणि तांत्रिक नियंत्रणाचा वापर करू शकतात. ते ‘मित्र’ आणि ‘प्रतिस्पर्धी’ या दोघांसोबतही व्यापार सुरू ठेवू शकतात. उदाहरणार्थ, अमेरिका चीनसोबत स्पर्धा करते आणि व्यापारही करते. चीन रशियाचा भागीदार आहे, पण त्याला पाश्चात्य बाजारपेठा सोडायच्या नाहीत. दुसरीकडे रशिया पाश्चात्य निर्बंध असूनही आशियाई देशांसोबत आपले संबंध अधिक दृढ करत आहे.


दुसरे म्हणजे मध्यम शक्तींनाही फायदा होतो. भारत, तुर्की, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांना ‘बहु-संरेखन’ धोरणाचा फायदा होत आहे. क्वाड आणि ब्रिक्समध्ये असलेला, रशियासोबत संरक्षण सहकार्य कायम ठेवणारा आणि अमेरिकेसोबत तांत्रिक भागीदारी वाढवणारा भारत हे याचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे सामरिक स्वातंत्र्य टिकून राहते, विविध दिशांनी गुंतवणूक आकर्षित होते आणि जागतिक व्यासपीठांवर प्रभाव वाढतो.

तिसरे म्हणजे कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांना लक्षणीय फायदा होतो आहे. यात अ‍ॅपल, टेस्ला आणि मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपन्या राष्ट्रीय स्पर्धेचा फायदा घेतात. देश गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कर सवलती देतात, त्यांच्या पुरवठा साखळ्या स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करतात आणि तंत्रज्ञान कंपन्यांना धोरणात्मक भागीदार मानतात.


अर्थात याबाबत प्रश्न असा आहे की, अशा राजनैतिक धोरणामुळे कोणाचे नुकसान होते? तर उत्तर आहे की, पहिले म्हणजे, लहान आणि कमकुवत देश. यात आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन आणि लहान आशियाई देशांवर एका गटाला पाठिंबा देण्यासाठी वाढता दबाव येतो. ते कर्जाचे सापळे, निर्बंध, राजकीय दबाव आणि धोरणात्मक स्पर्धा यांच्यामध्ये अडकतात. दुसरे म्हणजे, जागतिक स्थिरता. अशा राजनैतिक धोरणामुळे विश्वास कमी होतो. देश कायमस्वरूपी मित्र राष्ट्रांऐवजी तात्कालिक हितसंबंधांचा शोध घेतात. यामुळे युद्धांचा धोका वाढतो, व्यापारातील तणाव वाढतो आणि आंतरराष्ट्रीय संस्था कमकुवत होतात.

पण याचा भारतासाठी काय संदेश आहे हे पाहणे आवश्यक आहे. त्याच वेळी हा काळ भारतासाठी एक संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येतो. जर भारताने नवोन्मेष, उत्पादन, संरक्षण आत्मनिर्भरता, ऊर्जा सुरक्षा आणि तांत्रिक क्षमता मजबूत केली, तर तो या बदलत्या जगात एक संतुलित करणारी शक्ती बनू शकतो. मात्र, जर आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्य अपुरे असेल, तर या ‘खुलेद्वार’ राजनैतिक संबंधांमध्ये मोठे देश लहान देशांना केवळ सामरिक प्याद्यांप्रमाणे वापरू शकतात.


थोडक्यात, असे म्हणता येईल की या प्रकारच्या जागतिक राजनैतिक संबंधांचा सर्वाधिक फायदा त्या देशांना आणि कंपन्यांना होईल, ज्यांच्याकडे सामर्थ्य, भांडवल, तंत्रज्ञान आणि पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, दुर्बळ देशांसाठी हे अनिश्चितता, दबाव आणि परावलंबित्वाचे एक नवीन पर्व ठरू शकते. आज भारत विकसीत राष्ट्र म्हणून उदयास येत असताना भारतासाठी हे धोरण महत्त्वाचे आहे. अत्यंत फायदेशीर आहे. सर्वसामान्य जनता याबाबत अनभिज्ञ राहते. विरोधक याकडे कानाडोळा करतात आणि सरकार आणि मोदी यांच्यावर बेछूट टीका करत राहतात. पण त्याचा देशाला, राष्ट्राला होणारा फायदा आहे हे सांगायचे हेतुपुरस्सर टाळतात. कारण हे सरकार जनहिताचे, देशहिताचे काम करत आहे हा संदेश सामान्यांपर्यंत गेला तर आपले कसे होणार याची भीती विरोधकांमध्ये असते. त्यामुळे या चांगल्या धोरण आणि कामगिरीपासून सामान्य माणूस कसा अनभिज्ञ राहील हे पाहण्यात विरोधकांना अधिक रस असतो. त्यासाठी मग मेलडी चॉकलेटचे राजकारण सुरू करून पंतप्रधानांची खिल्ली उडवली जाते. सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. पण सरकार अत्यंत योग्य मार्गाने आणि नव्या धोरणाने जात आहे हे माहिती असूनही विरोधक सैराट होतात.

द ग्रेट शोमन राज कपूर


बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोडी म्हणजे राज कपूर आणि नर्गिस. काल १ जून हा नर्गिसचा जन्मदिवस, तर आज २ जून हा राज कपूर यांचा स्मृतिदिन. पाठोपाठ दोन दिवस दोघांवर लिहायला मिळण्याचा हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. गेल्या काही वर्षांत सिनेमासृष्टीत वेगाने परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले आहेत. पण तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती फारशी नसतानाही फार वेगळे आणि तर्कशुद्ध चित्रपट देण्याचे काम राज कपूर यांनी केले होते. कारण चित्रपटच त्यांचे पहिले प्रेम आणि विचारांचे केंद्र होते.


राज कपूर यांनी आठ वर्षांचे असताना चित्रपटाच्या जाहिराती आणि चित्र चिकटवून एक स्क्रॅप बुक तयार केले होते. ते आजही कृष्णा राज कपूर यांनी जपून ठेवले आहे. तारुण्यात त्यांना एका किशोरवयीन मुलीशी प्रेम झाले होते, दोघांच्या कुटुंबाचा परिचय होता. त्यामुळे लग्न शक्य होते. मुलीच्या वडिलांनी राज कपूर यांना एकुलत्या एका मुलीशी लग्नानंतर घरजावई करून त्यांची शेकडो एकर जमीन आणि व्यवसाय सांभाळण्यास सांगितले. राज कपूर त्या मुलीवर मनापासून प्रेम करत होते; पण चित्रपट निर्माता होण्याचे स्वप्न बाळगल्यामुळे त्यांना घरजावई होणे मंजूर नव्हते. त्यामुळे त्यांचे हे लग्न होऊ शकले नाही. परतताना राज कपूर यांनी मुलीची भेट घेतली त्या वेळी ती मुलगी अंगठा दाखवत त्यांना म्हणाली, ‘फिर ना आना इन गलियों चौबारों मे.’ या घटनेच्या अनेक दशकांनंतर ‘प्रेमरोग’मध्ये सावकाराची लाडकी मुलगी, अंगठा दाखवत ‘ये गलियां ये चौबारा, यहां आना ना दोबारा; की तेरा यहां कोई नहीं.’ हे गीत म्हणते. या गाण्यात लावण्यात आलेला सेटदेखील त्या सावकाराच्या हवेलीसारखाच होता. ऋषी कपूर पद्मिनी कोल्हापुरेमध्ये राज कपूर स्वत:चे स्वप्न पाहात होते. याला म्हणतात ग्रेट शोमन. आयुष्यात आलेले अनुभव कलेसाठी वापरणे आणि कलेतील जिवंतपणा दाखवणे फार कौशल्याचे असते ते राज कपूर यांच्याकडे होते.

सिनेमामय राज कपूर यांनी आपल्या आयुष्याच्या घटनेवरच अनेक पटकथा लिहिल्या आणि चित्रपटासारखे लार्जर दॅन लाइफ आयुष्यदेखील जगले. ते प्रत्येक वेळेस फक्त दृश्य किंवा कॅमेºयाचा विचार करत होते. त्यांचे आयुष्य संपादित नसलेल्या रीलप्रमाणे आहे, हे वाक्य त्यांनी स्वत: लिहिले होते. अधिकांच्या लांबीमुळे दृश्यावर प्रभाव पडतो, तर तेवढ्याच कमीमुळे दृश्याला नुकसानदेखील होते, असे त्यांचे मत होते.


वडील पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकातून राज कपूर थोड्याच भूमिकेतून खूप काही शिकले. नाटकानंतर सर्वच कलावंत आणि तंत्रज्ञ प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. कोणत्या दृश्यात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि तो कधी कंटाळला, या माहितीच्या आधारे पुढच्या भागाची पटकथा आणि संवाद लिहिले जात होते. राज कपूर यांना प्रेक्षक प्रतिक्रियेचे महत्त्व याच संस्थेतून कळले. त्यामुळे राज कपूर यांनी कधीच वॉटरटाइट पटकथेवर चित्रपट लिहिला नाही. ते थेट चित्रीकरणाच्या वेळी बदल करत. उटकमंडमध्ये ‘संगम’च्या चित्रीकरणाचे रश प्रिंट पाहून परदेशात चित्रीकरण केल्याचे वाटत होते. हे लक्षात येताच त्यांनी पटकथेत परिवर्तन करून युरोपमध्ये शूटिंग केले. अनेक देशात चित्रीकरण झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. ‘तुम्हे देख के तेरे दिल में हजारों फूल खिलते हैं’ हा संवाद ‘प्रेमरोग’मध्ये होता. यावरून त्यांना कल्पना आली की अँमस्टरडॅममध्ये लाखोंच्या संख्येने ट्युलिप फुले लावली जातात. त्यांनी तिथे जाऊन चित्रीकरण केले.

कथा, पटकथा, संगीत, गायन या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने अभ्यास करून ते चित्रीकरण करत. त्यामुळे त्यांचे चित्रपट पाहताना कुठेतरी आपल्या जवळपासचा प्रसंग प्रत्येकाला जाणवतो. राज कपूर यांची कळत नकळत कुठेतरी डावी विचारसरणी होती. त्यामुळे समाजाचे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सुरुवातीच्या काळात मांडले. देशात स्थिरता आल्यानंतर त्यांनी रंजक प्रेमकथांकडे आपला मोर्चा वळवला. प्रेम आणि स्वप्नवत चित्रपट त्यांनी रंगीत चित्रपटांनी केले. तर समाजाची दुरवस्था, समस्या ही काळी बाजू त्यांनी कृष्णधवल चित्रपटांतून मांडली. ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘चोरी चोरी’, ‘जिस देश में गंगा बहिती है’ यातून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या बाजू मांडल्या.


राज कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गीत म्हणजे, ‘श्री ४२०’मधील ‘मेरा जूता है जपानी’. मुकेश यांनी गायलेले शैलेंद्र यांचे हे केवळ गीत नाही तर तत्कालीन देशासाठी असलेला एक संदेश होता. स्वातंत्र्यानंतर देशाची परिस्थिती कशी सुधारेल याचे हे गीत म्हणजे एक रुपक होते. ‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंगलिश्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिन्दुस्तानी’ यात दुसºया महायुद्धानंतर जपानची हानी होऊनही त्यांनी प्रगती केली होती. तशी चाल आपण चाललो तर विकास आहे हे सांगण्यासाठी जूता जपानी हवा. इंग्लिश पतलून म्हणजे शिस्तीचे प्रतीक होते. कायदे मोडून आपण स्वातंत्र्य मिळवले असले तरी आता शिस्तीची गरज आहे हे सांगण्यासाठी इंग्लिश पतलून हवी असे ते सांगतात. डोक्यावर असलेली लाल रशियन टोपी हे साम्यवादाचे, समाजवादाचे, सर्वांना सारखा, समान न्याय देण्याचा संदेश देणारे प्रतीक होते. पण दिल मात्र भारतीय असेल आणि ही सगळी तत्त्व स्वीकारली तर आपण विकसित होऊ शकतो हे सांगणारे हे गीत आहे. म्हणून राज कपूर हे ग्रेट शोमन ठरतात.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन