शुक्रवार, २२ मे, २०२६

विविध मराठी चित्रपटातील रेल्वे


रेल्वे हे सर्वसामान्यांचे फार मोठे आकर्षण असते. विशेषत: ग्रामीण भागात रेल्वेने जाणे, रेल्वे फाटकाच्या कडेने उभे राहून हात करणे, हे प्रकार मोठ्या उत्साहात केलेले असतात. सर्वसामान्य माणसाची ही आवड लक्षात घेऊन असंख्य मराठी चित्रपटातून रेल्वेतून चित्रीकरण केले आहे.


‘एक गाव बारा भानगडी’ हा अनंत माने यांचा गाजलेला १९६८चा चित्रपट. गावातील भानगडी आणि भ्रष्टाचाराच्या वाढत्या तक्रारींमुळे इन्स्पेक्टर शिर्के म्हणजे अरुण सरनाईक याच्याकडे ही तपासाची मोहीम येते. या टेकवडी गावात पोलीस म्हणून न जाता तमाशातील वादक बनून फुला म्हणजे जयश्री गडकरच्या तमाशा पार्टीतून तो जातो. या फुलाची आणि शिर्केची म्हणजे नायक-नायिकेची गाठ पडते ती रेल्वेमध्ये. रेल्वेच्या डब्यात बसून फुलाचे एक लोकप्रिय गाणे देखील आहे. ते म्हणजे कशी गवळण राधा बावरली. नव्यानेच आलेल्या टेपरेकॉर्डमध्ये हे गाणे गुपचूप अरुण सरनाईक रेकॉर्ड करतो आणि तत्कालीन नव्या तंत्राची प्रेक्षकांना ओळख करून देतो. आता टेपरेकॉर्डर, कॅसेट रेकॉर्डर कालबाह्य झाला असला तरी त्याचा चपखल वापर अनंत माने यांनी या चित्रपटात करून घेतला होता. त्यासाठी रेल्वे हे एक ठिकाण होते.

याचप्रमाणे ‘ती मी नव्हेच’ या मराठी चित्रपटातही रेल्वेत एक छान गाणे घेतले आहे. रमेश आणावकर यांचे हे गीत जयवंत कुलकर्णी आणि शारदा या दोघांनी गायले आहे, त्याचे बोल आहेत, ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, साग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट,’ हे पुणे-मुंबई प्रवासातील मजेशीर गीत. या गाण्याने त्या चित्रपटाला वेगळी ओळख दिली आणि त्याचे रेल्वेतील चित्रीकरण हे महत्त्वाचे आकर्षण होते. पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटात येणारे जवळपास २२ बोगदे हे प्रत्येकाचे आकर्षण होते, झाडीतून जाणारी रेल्वे त्याचे सुंदर वर्णन आणि चित्रीकरण या गाण्यात पाहायला मिळते.


१९८३ मध्ये किशोर मिस्किन यांची निर्मिती असलेल्या व्ही. के. नाईक दिग्दर्शित ‘गुपचूप गुपचूप’ चित्रपटातही रेल्वेतील चित्रीकरण महत्त्वाचे आहे. रंजना आपल्या बहिणीला परस्पर लग्न करायला मदत करते. वडिलांना आम्ही दोघी गोव्याला जातो सांगून दोघींची तिकिटे काढून स्टेशनवर येते आणि बहिणीला तिच्या प्रियकराबरोबर पाठवते आणि आपण रेल्वेत गोव्याला जाण्यासाठी बसते. या रेल्वेतच आकाशवाणीचा गायक असलेल्या कुलदीप पवार म्हणजे सुरेशकुमारशी तिची गाठ पडते. पण तिला हा सुरेशकुमार आहे हे माहिती नसते. पण ती सुरेशकुमारची खूप फॅन असते. त्यामुळे ट्रान्झिस्टरवर सुरेशकुमारचे गाणे ती ऐकताना मनातून सुखावलेला कुलदीप पवार रेडिओ बंद करायला सांगतो. मला अजिबात हा गायक आवडत नाही सांगतो. त्यामुळे ती चिडते. मग त्यानंतर हेमा आणि शामा दोन्ही भूमिका आपण जुळ्या बहिणी आहोत असे सांगून रंजना वठवते. रेल्वेत भेटलेला सुरेशकुमार असूनही त्याने आपली गंमत केली म्हणून त्याचा मजेशीर बदला ती घेते. शामा म्हणून प्रेमात पडते. या विनोदी चित्रपटात भरपूर घडामोडी असल्या तरी रेल्वेने नायक-नायिकेची गाठ घालून दिलेली आहे. प्रचंड गाजलेल्या या चित्रपटातील ‘पाहिले न मी तुला...’ हे सुरेश वाडकर यांचे गीत प्रचंड गाजले आहे.

याशिवाय रेल्वेचे प्रत्यक्ष अथवा स्टेशनवरील चित्रीकरण असंख्य मराठी चित्रपटात आले आहे. सगळ्यांचा उल्लेख करणे केवळ अशक्य आहे. पण अनंत माने यांच्याच १९७८च्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटात नायक रवींद्र महाजनी आणि नायिका रंजना यांची भेटही रेल्वेतच होते. दोघांच्या बॅगा बदलतात आणि त्या देताना ओळख होते आणि मग कालांतराने दोघे प्रेमात पडतात. त्याचप्रमाणे शरद पिळगांवकर यांनी सचिनला नायक म्हणून घेतलेल्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटात रमेश भाटकर आणि राजा गोसावी म्हणजे नारुमामाची मुलगी यांची भेटही रेल्वे स्टेशनवरच होते. सुषमा शिरोमणी यांच्या शिरोमणी चित्रच्या ‘मोसंबी नारंगी’ या चित्रपटात बहिणी बहिणींची ताटातूट होण्यासाठी रेल्वे स्टेशनचा आधार घेतला आहे.


‘माझं घर माझा संसार’ हा अच्युत ठाकूर निर्मित राजदत्त दिग्दर्शित चित्रपटात रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. डोंबिवलीतील एका सत्य घटनेवर आधारित रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या ‘माझं काय चुकलं’ या नाटकावर बेतलेला हा चित्रपट. अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस यात नायक-नायिका आहेत. लग्नानंतर सासू-सुनेचा होणारा संघर्ष आणि त्यात ओढाताण होणारा मुलगा. आईची बाजू घ्यायची का बायकोची बाजू सावरायची, यात भरडला जाणारा तरुण असे कथानक यात आहे. यात अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस यांचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेले हे गाणे होते, ‘दृष्ट लागण्याजोगे सारे...’ १९८६ साली हा चित्रपट खूप गाजला होता. यात वैतागून नायक-नायिका रेल्वेतून उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. त्यात ती वाचते आणि नायक मरतो. अशा या शोकांतिकेत रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते.

१९८०च्या दशकातच ‘बाईलवेडा’ नावाचा एक चित्रपट आला होता. यात अशोक सराफ वकील असतो. त्याच्यावर एक महिला रेल्वेत एकटीदुकटी बघून अशोक सराफने छेड काढल्याचा गुन्हा नोंदवते. त्याचा खटला अशोक सराफ सफाईदारपणे चालवतो. या चित्रपटातील रेल्वेची साक्ष महत्त्वाची आहे. पूर्वी रेल्वेत खिडकीच्या खाली अ‍ॅश ट्रे होते. रेल्वेत सिगारेट सर्रास ओढली जात होती. कदाचित या चित्रपटातील निकालामुळे रेल्वेला नो स्मोकिंगची उपरती झाली असावी आणि अ‍ॅश ट्रे काढून टाकले असावेत.


याशिवाय सचिनच्या ‘नवरा माझा नवसाचा २’चे चित्रीकरण हे कोकण रेल्वेचे दर्शन घडवणारे आहे. ‘दुनियादारी’त श्रेयस, स्वप्निल जोशी आणि संदीप कुलकर्णी यांची भेट कथेत महत्त्वाची आहे. याशिवाय ‘डोंबिवली फास्ट, शटर, लालबाग परळ, क्लासमेट, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई, एलिझाबेद एकादशी, मुंबईचा जावई, सिंहासन, सामना, गल्ली ते दिल्ली’ अशा असंख्य चित्रपटातून रेल्वेचे दर्शन झाले आहे.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: