सोमवार, २५ मे, २०२६

आगम परंपरेतील पहिला ग्रंथ


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्यातील टप्पे फार महत्त्वाचे आहेत. ते मराठी भाषिकाला माहिती हवे. ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाचा उल्लेख प्राकृत मराठीशी संबंधित असताना तत्कालीन किवा पूर्वकालीन प्राकृत साहित्याचाही आपल्याला विसर पडता कामा नये. प्राकृत साहित्यातील अर्धमागधी आगम परंपरेमधील एक ग्रंथ म्हणून आचारांगसूत्र या ग्रंथाचा उल्लेख केला जातो. १२ आगम ग्रंथांमधील पहिला ग्रंथ असल्याने या ग्रंथाची भाषा आणि सूत्रशैली प्राचीन आहे. याचे आगम साहित्यात स्थान महत्त्वाचे आहे. याला सर्व अंगग्रंथांचे सार म्हटले जाते. याला सामायिक असे देखील म्हणतात. साधू आणि साध्वी यांच्या आचार-विचाराचे या ग्रंथामध्ये विस्ताराने वर्णन केले आहे. या ग्रंथाची विभागणी दोन श्रुतस्कंधांमध्ये केली आहे. पहिल्या श्रुतस्कंधाला बंभचेर अर्थात ब्रह्मचर्य असे म्हणतात. यामध्ये ९ अध्ययने आहेत. म्हणून या श्रुतस्कंधाला नवब्रह्मचर्य हे नाव प्रचलित आहे. यामध्ये ४४ उद्देशक आहेत. दुसºया श्रुतस्कंधामध्ये १६ अध्ययने आहेत; जी चार चूलिकांमध्ये विभागलेली आहेत. दोन्ही श्रुतस्कंधाचे विषय, वर्णन शैली यांचा विचार केला असता पहिला श्रुतस्कंध हा प्राचीन आहे. दुसरा श्रुतस्कंध नंतर चूलिका रूपात त्याला जोडला आहे. हे सूत्र गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारचे आहे. काही गाथा अनुष्टुभ छंदात रचलेल्या आहेत.


यामध्ये प्रथम श्रुतस्कंधातील पहिले अध्ययन शस्त्रपरिज्ञा असून त्यात हिंसेचा निषेध केला आहे. यामध्ये सात उद्देशक आहेत. पृथ्वीकाय इत्यादी सहा जीवनिकायांच्या सरंभ-समारंभ-आरंभ यांची चर्चा या अध्ययनात केली आहे. दुसºया लोकविजय नावाच्या अध्ययनात सहा उद्देशक असून त्यामध्ये अप्रमाद, अज्ञानी, धनसंग्रहाचे परिणाम यांचे वर्णन आहे. लोकविजय म्हणजे या लोकांवर अर्थात संसारावर विजय प्राप्त करणे. संसाराचे मूळ कारण असणाºया क्रोध, मान, माया, लोभ या चार कषायांवर विजय मिळवणे. या अध्ययनाचा मुख्य उद्देश वैराग्य तसेच संयम दृढ करणे, उपभोगाची आसक्ती कमी करणे, हिंसेचा त्याग करणे असा आहे.

शीतोष्णीय नावाच्या तिसºया अध्ययनात चार उद्देशकांमध्ये विरक्त मुनींचे स्वरूप, सम्यकदर्शी याचे लक्षण, कषायांचा त्याग यांचे वर्णन आहे. तर सम्यक्तव नावाच्या चौथ्या अध्ययनामध्ये चार उद्देशक असून त्यामध्ये अहिंसा, देहदमन, संयम इ.चे विवेचन आहे. लोकसार नावाचे पाचवे अध्ययन सहा उद्देशकांनी युक्त आहे. यामध्ये हिंसा करणारे, अहिंसेचे पालन करणारे, परिग्रह करणारे, अपरिग्रह करणारे यांचे वर्णन आहे. बाह्य शत्रूंपेक्षा आतील शत्रूंचा विनाश करणे महत्त्वाचे सांगितलेले आहे. इंद्रियांना उत्तेजना देणारा आहार वर्ज्य करण्यास तसेच इंद्रियांवर ताबा राहत नसेल तर आहाराचा संपूर्णपणे त्याग करण्यास सांगितले आहे.


यातील धूत नावाच्या सहाव्या अध्ययनात पाच उद्देशक असून तृष्णा नष्ट करण्याबद्दल यामध्ये उपदेश केला आहे. देहासंबंधी उपभोगांबाबत जी तृष्णा व त्यावरील उपाय तसेच ती नष्ट करण्याबद्दल या अध्ययनात विवेचन केले आहे. महापरिज्ञा नावाचे सातवे अध्ययन आता उपलब्ध नाही. विमोक्ष नावाचे आठवे अध्ययन मोठे असून त्यात आठ उद्देशक आहेत. विमोक्ष म्हणजे मोहापासून किंवा लोभापासून वेगळे होणे. ज्या साधूंचा आचार आपल्या आचाराशी जुळणारा नाही त्याची संगत सोडणे व आहार, पाणी, वस्त्र इ. दूषित असेल तर त्याचा त्याग करण्यास सांगितले आहे.

या श्रुतस्कंधातील नववे उपधानश्रुत हे अध्ययन खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये भगवान महावीर यांच्या कठोर तपश्चर्या आणि साधनेचे वर्णन आहे. उपधान म्हणजेच तप. यामध्ये चार उद्देशक असून पहिल्या उद्देशकामध्ये महावीरांनी दीक्षा घेतल्यानंतर त्यांना काय काय सहन करावे लागले याचे वर्णन केले आहे. चौथ्या उद्देशकामध्ये महावीरांच्या साधनेच्या काळातील आहार, विहार, आचार यांचे वर्णन आहे.


दुसºया श्रुतस्कंधात पाच चूलिका असून त्यापैकी चार चूलिका आचारांग सूत्रामध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि पाचवी चूलिका निशीथसूत्र नावाने प्रसिद्ध आहे. या पाचव्या चूलिकेला आचारकल्प अथवा आचारप्रकल्प असेही म्हणतात. यामध्ये साधू-साध्वी यांचा आहार, वसती, गमनागमन, भाषा, वस्त्र, पात्र यासंबंधी विवेचन आहे.

आज उपलब्ध साहित्यामध्ये आचारांगसूत्रावर भद्रबाहू यांची निर्युक्ती, जिनदासगणींची चूर्णी व शीलांक यांची टीका उपलब्ध आहे. शीलांक यांच्या टीकेमध्ये नागार्जुन यांनी केलेली वाचना तसेच इतर झालेल्या वाचनांतील पाठभेदांचा उल्लेख केलेला आहे. हर्मन याकोबी यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला आहे. सेक्रेड बुक्स आॅफ द इस्ट या ग्रंथमालेतील २२व्या भागामध्ये आचारांगसूत्राचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला आहे. तसेच हिंदी, गुजराथी व पंजाबी या भारतीय भाषांमध्येदेखील भाषांतर झाले आहे. मराठी प्राकृत भाषेतील असे खूप ग्रंथ आहेत जे आपल्या एका संस्कृतीवर प्रकाश टाकतात. तत्कालीन विचार, आचार, राहणीमान या दृष्टीने या ग्रंथांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर तिच्या मुळाशी असलेल्या या संस्कृतीवर कटाक्ष टाकणेही तितकेच गरजेचे आहे.


प्रफुल्ल फडके/ संस्कृती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: