राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अलीकडेच इयत्ता ८ वीच्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटी, इंडिया अँड बियॉन्ड’ या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात काही बदल केले आहेत. या उपक्रमाचा मूळ उद्देश इतिहास, भूगोल, आर्थिक जीवन आणि शासन यासारख्या विषयांना एकत्रित करून विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या सामाजिक विकासाची समग्र समज विकसित करणे आहे.
हे पुस्तक वर्षानुवर्षे मागणी असलेल्या संतुलित इतिहास लेखनाच्या दिशेने एक ठोस प्रयत्न असल्याचे दिसते. या पुस्तकात १३व्या ते १७व्या शतकापर्यंतचा मध्ययुगीन इतिहास तपशीलवार सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिल्ली सल्तनतचा उदय आणि पतन, समकालीन प्रतिकार, त्या काळातील राजकीय अस्थिरता, लष्करी मोहिमा, विजयनगर साम्राज्य, मुघल आणि त्यांचा प्रतिकार, मराठे आणि शिखांचा उदय इत्यादींचे ऐतिहासिक पुराव्यांवरून विश्लेषण करण्यात आले आहे.
पाठ्यपुस्तके समकालीन आणि भारतकेंद्रित करणे ही काळाची गरज आहे. भारतीयांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी हे आवश्यक आहे. दिल्ली सल्तनत आणि मुघलांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये निवडक पद्धतीने का शिकवला जावा? खानवाच्या लढाईत, चंदेरीच्या लढाईत, घाघ्राच्या लढाईत आणि इतर अनेक आक्रमणांमध्ये बाबरने नरसंहार आणि लूटमार केली. युद्धानंतर मारल्या गेलेल्या हिंदूंच्या कवटीचे मनोरे उभारण्याची बाब त्याच्या ‘बाबरनामा’ या आत्मचरित्रात तपशीलवार नोंदवली आहे.
आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अकबराच्या कथित महानतेचे अशा प्रकारे कौतुक केले गेले आहे की जर त्याच्या नावापुढे ‘महान’ हे विशेषण जोडले नाही तर काहीतरी गहाळ झाल्यासारखे वाटते. सत्य हे आहे की, १५६८ मध्ये चित्तोड किल्ल्याच्या वेढ्यादरम्यान त्याने सुमारे तीस हजार हिंदूंची कत्तल केली, ज्यात महिला, मुले आणि अगदी शेतकरीही होते. ९ मार्च १५६८ रोजी अकबराने स्वत: प्रकाशित केलेले फतेहनामा-ए-चित्तोड या तथ्यांची साक्ष देते. १५९८मध्ये संकलित केलेल्या मुन्शत-ए-नमकीनमध्येही हा फतेहनामा समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचे संकलक अकबराचे दरबारी मीर अब्दुल कासिम नमकीन होते. अकबराचे समकालीन आरिफ मोहम्मद कंधारी यांनीही त्यांच्या तारिख-ए-अकबरी या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
अकबराच्या सर्वात प्रमुख दरबारींपैकी एक असलेल्या अबुल फजल यांचे ‘ऐन-ए-अकबरी’ आणि ‘अकबरनामा’ आणि इमाम अब्दुल कादिर बदाऊनी यांचे ‘मुंतखब-उत-तवारीख’ ही पुस्तकेही त्याच्या क्रूरतेच्या, धार्मिक कट्टरतेच्या आणि कामुकतेच्या अतिरंजित तपशिलांनी भरलेली आहेत. असे असूनही चित्रपट आणि इतिहासात त्याला एक आदर्श नायक म्हणून सादर केले गेले होते, तर अबुल फजलच्या मते, ‘अकबरच्या हरममध्ये सुमारे पाच हजार महिला होत्या आणि या पाच हजार महिला त्याच्या ३६ पत्नींपेक्षा वेगळ्या होत्या.’ तो सुंदर महिलांना पळवून नेण्यासाठी आणि त्यांना त्याच्या वासनेचा बळी बनवण्यासाठी मीना बाजार आयोजित करत असे. त्याच्या क्रूरतेच्या यातनामय प्रक्रियेतून सुटण्यासाठी आणि त्यांची ओळख आणि स्वाभिमान जपण्यासाठी, हिंदू महिला जळत्या चितेत स्वत:ला जाळून जौहर करणे हे जीवापेक्षाही सन्माननीय मानत असत.
स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांपर्यंत पाठ्यपुस्तकांमध्ये अशा कमकुवत आणि बर्बर शासकाला कोणत्या मानसिकतेने महान म्हणून शिकवले जात होते आणि मातृभूमी, स्वराज्य, स्वधर्म आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी लढणाºया महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या योद्ध्यांना जाणूनबुजून लहान असल्याचे सिद्ध केले जात होते? छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप किंवा इतर कोणत्याही सनातनी शासकाने धर्म किंवा पूजेच्या आधारावर गैरसनातनी अनुयायांशी भेदभाव केला असेल किंवा त्यांची कत्तल केली असेल किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केली असतील असे एकही उदाहरण सापडणार नाही. मग धर्माच्या आधारावर गैरमुस्लिमांचा नरसंहार करणारे मुघल कसे महान झाले? भारताचा खरा इतिहास शिकवला जायला हवा. छत्रपती शिवरायांचा आदर्श जगाला मान्य असताना आमच्या इतिहासात मोगलांना जेवढे स्थान दिले गेले आहे तेवढे महाराजांना का नाही दिले गेले? स्वातंत्र्यानंतर ५५ वर्षे हेच शिकवले गेले. या संकुचित मनोवृत्तीला बदलण्याची गरज आहे.
हे सर्वमान्य सत्य आहे की, औरंगजेब तलवारीच्या बळावर हिंदुस्थानला दारुल हराममधून दारुल इस्लाममध्ये रूपांतरित करू इच्छित होता. त्याच्या दृष्टीने प्रत्येक हिंदू फक्त आणि फक्त काफिर होता, ज्याचा रक्तपात करणे, ज्यांची मंदिरे नष्ट करणे, ज्यांचा विश्वास निर्दयीपणे चिरडणे हे तो आपले ‘शुद्ध आणि धार्मिक कर्तव्य’ मानत होता. १२ एप्रिल १६६९ रोजी त्याने हिंदूंवर जिझिया कर लादण्याचा आदेश दिला. औरंगजेबाने हिंदू सणांवर बंदी घातली होती आणि तो जिवंत असेपर्र्यंत हिंदूंना दिवाळी साजरी करता येत नव्हती किंवा उघडपणे होळी खेळता येत नव्हती. त्याने त्याच्या संपूर्ण राज्यातील हिंदू मंदिरे, शैक्षणिक केंद्रे आणि पवित्र स्थळे पाडण्याचा आदेश दिला होता. त्याच्या आदेशानुसार काशीचे विश्वनाथ मंदिर, मथुराचे श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि पाटणचे सोमनाथ मंदिर यासह हजारो मंदिरे पाडण्यात आली. १६८८ मध्ये त्याने हिंदूंसाठी पालखी, हत्ती आणि घोडे बंदी घातली आणि शस्त्रे बाळगणे हा गुन्हा घोषित केला. औरंगजेबाच्या हिंदूंवरील बर्बर आणि क्रूर अत्याचारांचे तपशीलवार वर्णन त्याच्या एका दरबारी मुहम्मद साकी मुस्तैद खान यांनी लिहिलेल्या ‘मासिर-ए-आलमगिरी’ या पुस्तकात वाचता येते. हत्याकांड करणाºयांचे गौरव करणे थांबवण्याची आणि स्वत:, मालमत्तेवर आणि भारतावर केंद्रित इतिहास पुन्हा लिहिण्याची वेळ आली आहे. भारताचा खरा आणि अचूक आदर्श व्यक्तींचा इतिहासच अभ्यासक्रमात असला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा