शनिवार, ५ जुलै, २०२५

आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी


अखेर आज तो दिवस उजाडला ज्याची गेले अठरा दिवस आपण वाट पाहात आहोत. आज देवशयनी किंवा मोठी आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आज पंढरपूरकडे लागलेले आहेत. आजच्या दिवशी दरवर्षी आठ-दहा लाख वारकरी पंढरपुरात जमतात. म्हणजे ते शरीराने आणि मनाने तिथे आहेत आणि जे शरीराने तिथे नाहीत, तेही मनाने आज पंढरपुरात आहेत. आजचा हा दिवस भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणाºयांचा सगळ्यात मोठा सण आहे. पण, सण असूनही तो चित्त शुद्धीशी जोडलेला आहे. आषाढी उपवासाचा सगळ्यात मोठा अर्थ शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धीतून विठुरायाच्या पावलांशी लीन होणे आणि नामदेवाच्या भाषेत ‘विठ्ठल पाहणे’ असा आहे. त्या विठ्ठलाच्या नामस्मरणाचा हा दिवस आहे. जगातल्या सगळ्या धर्मात उपवास आहेत. ते चित्तशुद्धीकरिता आहेत, शरीरशुद्धीकरिता आहेत. आजचा उपवास हा चिंतनाकरिताही आहे. म्हणून आषाढीचे विशेष महत्त्व आहे.


आपल्याकडले सणवार आणि उपवास हे निसर्गाशी जोडलेले आणि निसर्गाशी नाते सांगणारे असे आहेत. चिंतन, मनन आणि भजन यातून आत्मशुद्धी होत असते. हा उपवास विठुरायाशी जोडलेला आहे. या उपवासाची जी रचना आहे, ती बघितली तर आषाढी, कार्तिकी आणि महाशिवरात्र हे तिन्ही उपवास बरोबर १२० दिवसांच्या फरकाने आलेले आहेत. आषाढीच्या आधी शेतीची कामे आटोपलेली आहेत आणि मग श्रमशक्तीला विश्रांतीची जोड दिलेली आहे. शिवाय बदलत्या ऋतुचक्रात पचनशक्तीला विश्रांती हा आणखी एक महत्त्वाचा शास्त्रीय उद्देश आहे. दुसरा उपवास कार्तिकीचा, तो शिशिर ऋतूच्या म्हणजे हिवाळ्याच्या टप्प्यावर आणून ठेवलेला आहे. तिसरा उपवास महाशिवरात्रीचा. तो उन्हाळ्याच्या टप्प्यावर आलेला आहे. या प्रत्येक उपवासाचे अंतर १२० दिवसांचे आहे आणि ते शास्त्रीय आहे. त्याला धर्माचा संदर्भ घातला ते त्याचे पालन व्हावे म्हणून. पण, तिन्ही उपवासांचा संदर्भ शास्त्रीय आहे. निसर्गाच्या बदलत्या ऋतुचक्राशी जोडलेला आहे. म्हणून आपल्याला सण आनंद देतात, उपवास आनंद देतात.

आषाढी एकादशीचा मुख्य उद्देश नामस्मरणाशी जोडलेला आहे. विठूचा गजर करण्याशी जोडलेला आहे. आत्मज्ञान होण्याशी जोडलेला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी ही जी संत मंडळी आहेत, त्यांना आदराने, सन्मानाने आणि भावनेने संत म्हटले तरी मुळात ते सर्व तत्त्ववेत्ते आहेत. लौकिक अर्थाने डिग्री घेतलेले शिकलेले नसले, तरी हरिनामाच्या सामर्थ्याने त्यांना आलेले जीवनातील अनुभव जीवनाचे तत्त्वज्ञानच बनले आणि त्यांच्या वाणीतून आत्मज्ञान प्रकट झाले.


ज्ञानोबा, तुकोबा यांची गोष्ट फारच वेगळी आहे. संत परंपरेचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि तुकोबा कळस झाला. मधल्या चारशे वर्षांत नामदेव आले, त्यांनी ‘पाहावा विठ्ठल’ सांगून द्वैत-अद्वैताचा भ्रम दूर करून टाकला. म्हणून या परंपरेत नामदेव खूप मोठे झाले. विठूच्या गजरात नामाचाही गजर आहे. बाकी अठरापगड जातीतले जे संत निर्माण झाले, ते कोणत्या विद्यापीठात शिकले होते? पण, त्यांच्या तत्त्वज्ञानाला आत्मज्ञानाचे केवढे मोठे सामर्थ्य होते. गोरा कुंभार होता. मडकी करत होता. कच्चे मडके भाजत होता, पक्के करत होता आणि अंगठ्याजवळच्या दोन बोटांनी त्या भाजक्या मडक्यावर ठोकून ‘मडके कच्चे की पक्के’ असे विचारत होता. हे विचारता, विचारता गोरोबाला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्याच डोक्यावर दोन बोटे आपटून एक प्रश्न विचारला, ‘अरे, मी इतकी मडकी भाजतो आहे. कच्चे की पक्के विचारतो आहे. पण, माझे हे मडके कच्चे की पक्के?’ कसे कळणार? तिथे गोरोबाला आत्मज्ञान झाले. सावता माळी मळ्यातल्या भाजीमध्ये आलेले तण उपटणारे. ते आत्मज्ञानाची भाषा बोलू लागले. ‘कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी.’ आणि मग ते म्हणतात, जमिनीतले तण मी उपटले. पण, माझ्या मनातल्या अविचारांचे तण मी उपटले काय? ते तसेच आहेत. हा विचार येणे हीच आत्मज्ञानाची पायरी असते. संत सेना महाराज त्यांच्या व्यवसायाप्रमाणे लोकांची डोकी साफ करीत. ती करता-करता ते तत्त्वज्ञान सांगून जातात की, ‘माझ्या डोक्यातला मळ मी साफ केला आहे का?’ गोरा, सावता, सेना, रोहिदास महाराज या विविध जाती-जमातीतल्या संतांना आत्मज्ञान झालेले आहे. तुकोबा तर त्याच्या पुढे गेले? आणि त्यांनी विठ्ठल मनामनात बसलेले असल्याचा दृष्टांत दिला. गाडगेबाबा त्यांच्या पुढचे. गाडगेबाबांनी सांगितले की, अरे, तू म्हणजेच देव. गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे, देवळात गेलो, देवाच्या गाभाºयात काळोख, देव दिसेना. मग बापुरावाला सांगून दिवा आणला. देव दिसला. कोणामुळे दिसला, दिव्यामुळे दिसला. मग देव मोठा की दिवा मोठा? गाडगेबाबांचे हे तत्त्वज्ञान देव एक आहे. त्याची रूपे अनेक असतील. धर्म अनेक आहेत, पण त्यांची शिकवण एक आहे. हेच आत्मज्ञान. त्यांची शिकवण देणारी परंपरा म्हणजेच वारकरी परंपरा. या आत्मज्ञानाच्या ओढीने प्रत्येक जण पंढरपुरात जमतो. आत्मज्ञान झालेल्यांमुळे मग अवघी विठाई एक होऊन जाते. जगाची सूत्रे चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे, असे एकदा मान्य केले, तर मग त्याला नाव काहीही द्या. त्या अदृश्य शक्तीचा धाक हाच तुम्हाला सरळ मार्गाने चालायला प्रेरित करणार आहे. शेवटी अहंकाराने भरलेले आपण सर्व काही इथे टाकून जाणार आहोत. जगाचा सगळ्यात मोठा अनर्थ तेव्हा झाला असता, जर माणसाला मरणाची तारीख समजली असती. आपली मालमत्ता वर घेऊन जायला परवानगी असती. या दोन गोष्टींचे बंधन नसते, तर माणसाने कुणालाच जुमानले नसते. ते जुमानण्यासाठी हरिनाम आणि त्याकरिता उपवास. आपले दैनंदिन जीवन शुद्ध ठेवायचे, असे संत शिकवतात. जेवढे जीवन हातात आहे, ते सत्प्रवृत्तीने जगा, असे आषाढी सांगते. संयमाने जगा. आहारामध्ये, विहारामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये संयम आणि सभ्यता ठेवा. मग एका आत्मिक बळाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या आषाढीचा तोच खरा अर्थ आहे. दहा इंद्रिये आणि अकरावे मन अशा एकादश वासनांना शमविण्यासाठी ही एकादशी असते. ही सर्व एकादश अंगे तृप्त झाली की, माणूस माणूस नाही, तर विठ्ठल होतो.

अशा विठ्ठलाचे, स्वत:चे दर्शन आज आपल्याला घडणार आहे. आज आपण तिथे पोहोचलोच, विठ्ठलमय झालो, पाहिला विठ्ठल असा अभिमान, आनंद बाळगण्याचा दिवस अखेर आज उजाडला. आमची वारी अशा प्रकारे पूर्ण झाली.


हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा//

गुण गाईन आवडी/ हेची माझी सर्वजोडी//


राम कृष्ण हरी

प्रफुल्ल फडके/ पाऊले चालती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: