मंगळवार, १ जुलै, २०२५

वारीचे नाते... शेतीशी, मातीशी




पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारक‍ºयांना येणारा प्रत्येक दिवस खरे तर आनंदाचा वाटत असतो. त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती आनंदमय असते. यंदा वरुणराजाने चांगलीच कृपा केल्यामुळे दिंडीत पाऊसही अगदी पहिल्यापासून सोबतच असलेला पाहायला मिळतो. मधल्या काळात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी त्याने पुन्हा हजेरी लावून आपले काम चोख केल्याचे दिसत आहे. पाऊस असला की, वारक‍ºयांच्या त्रासात वाढच होते. कारण दिंडीतील वाटचाल ते झोप ही सगळीच कामे उघड्यावर होतात. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, ‘आकाश मंडप पृथ्वी आसन’ असाच अनुभव वारीत वारक‍ºयाला घ्यायचा असतो. त्यामुळे झोडपून काढणारा पाऊस त्याला वारीत नको असतो. असेच वातावरण यावर्षी दिंडीत वारक‍ºयांना मिळाले.


निसर्गाच्या अगदी जवळ नेणा‍ºया या अनुभवाची गोडी कोणालाच प्रत्यक्ष चाखल्याशिवाय कळणार नाही. जसे आपल्याला साखर गोड आहे, हे प्रत्यक्ष तिची गोडी अनुभवल्यानंतरच कळते, तद्वत आषाढी-कार्तिकीच्या वारीमधील आनंद हा अनुभवल्याशिवाय कळणार नाही. ज्यांना पूर्ण वारी करता येत नाही असे शहरी नोकरदार आणि व्यावसायिक शक्य तिथे वारीचे दर्शन घेऊन या हरिनामात गुंग होतात. ही मंडळी जेव्हा हरिनामाच्या नादाने धुंद होऊन दिंडीसोबत थोडेफार चालतात, ते पाहून संतांच्या करिष्म्याची आणि पांडुरंगाच्या महतीची प्रचिती येते. दिंडीतील आनंद हा या दिव्य अनुभूतीमध्ये दडला आहे, याची प्रचिती येते. तुकाराम महाराजांनी एका अभंगात वारक‍ºयांच्या या सहजस्थितीचे वर्णन केले आहे.

मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो तव छंदेगाईन ओविया मी त्या पंढरीच्या राया.


आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये भक्तांचा महामेळा जमतो. विठ्ठलाला माऊली मानून त्याच्या भेटीची ओढ या काळात प्रत्येक वारक‍ºयाला लागलेली असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून सुरू झालेला हा विठ्ठलभक्तीचा मेळा आजही तेवढ्याच तेजाने बहरतो आहे. दरवर्षी या मेळ्यात सहभागी होणा‍ºया वारक‍ºयांची संख्या वाढत आहे. हे वारकरी देहभान विसरून वारीमध्ये सहभागी होतात. विठ्ठलाचे दर्शन घडले की, ते धन्य होतात.

आषाढी एकादशी जवळ आली की, सा‍ºयांनाच वेध लागतात विठ्ठल दर्शनाचे. तशी तर प्रत्येक भक्ताच्या मनात विठ्ठल दर्शनाची ओढ कायमच असते. विठुरायाला ‘विठुमाऊली’ म्हणून प्रत्येक वारक‍ºयाने या देवतेशी आगळेच नाते जोडले आहे. भक्तपुंडलिकाच्या हाकेला धावून जाणारी ही देवता आपल्याही हाकेला ‘ओऽऽ’ देईल याची खात्री प्रत्येक भक्ताच्या मनात असते. त्यामुळे वारीचा सोहळा रंगतो. या वारीमध्ये नानाविध जातीचे वारकरी सामील झालेले असतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. इतकी वर्ष उलटून गेली; पण वारक‍ºयांच्या मनातील विठ्ठलभक्ती जराही कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दरवर्षी पंढरीच्या वारीमध्ये जमणारे लाखो वारकरी पाहिले की, याची प्रचिती येते. गेल्या सातशे वर्षांपासून ही वारीची परंपरा सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप‍ºयातून आलेले वारकरी सहभागी होतात. वारी हा महाराष्ट्रातल्या धर्मजीवनातला सर्वात मोठा असा मुख्य प्रवाह आहे. हा वारकरी धर्मसंप्रदाय प्रामुख्याने ग्रामीण शेतकरी आणि बहुजन समाजानेच व्यापलेला होता. या मागच्या वर्गीय आणि जातीय स्वरूपाच्या विश्लेषणाचे काम यापूर्वी अनेकांनी केलेले आहे. मराठी सारस्वतांनीही त्याचे कौतुक केले आहे, अभ्यास केला आणि सहभागही नोंदवला आहे. म्हणून तर साहित्य शारदेच्या दरबारात होणा‍ºया साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी हा एक अविभाज्य भाग असतो. या दिंडीत ज्ञानेश्‍वरीचा मान हा वेगळाच असतो. गं. बा. सरदार, बा. र. सुंठणकर आणि डॉ. डी. डी. कोसंबी या अभ्यासकांनी याचे चांगले विश्‍लेषण केले आहे. हा संप्रदाय केवळ धर्मावर आधारित नसून तो सामाजिक वास्तवात पूर्णपणे रुजलेला होता, आहे. हा संप्रदाय राजकीय स्वरूपाचाही होता. त्याची चिकित्सा करण्यात गैर काहीच नाही. कारण समाज जीवनाची ही अंग एकमेकांशी निगडित असतात. म्हणूनच हा मुख्यत्वे कृषीकर्म करणा‍ºया शेतक‍ºयांचा संप्रदाय होता आणि आहे. कृषी हा भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे बाकीचे बलुतेदारी व्यवसाय किंवा गाववाडा हे शेतीभोवतीच फिरत होते. सामाजातील बलुतेदार हे शेतीशी संबंधित उद्योग करत. ही शेती अशा प्रकारे इतर व्यवसायांचा आधार बनली होती. त्यामुळे आपल्या या वारीत सर्व जातीचे महान संत पाहायला मिळतात. त्या वारीचे बिज हे शेतीत दडले आहे. त्यामुळे काळी माती आणि काळा विठ्ठल दोघांनाही आपण माय माऊली म्हणतो.


राम कृष्ण हरी

प्रफुल्ल फडके/ पाऊले चालती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: