आमची ही पंढरीची वारी जशी भक्तीची वारी आहे, तशीच ती समाज प्रबोधनाची वारी आहे. या वारीत सामाजिक एकतेबरोबरच अंधश्रद्धांवर प्रहार केलेला आहे. भेदभावाच्या भिंती पाडून टाकण्याचे काम या वारीने केले आहे. जातीभेदाचे अंतर कमी करण्याचे काम या वारीने केले आहे. म्हणून ही वारी महान आहे. या वारीच्या मार्गावरील प्रत्येक संतांनी यासाठी प्रबोधन केलेले आहे.
वारीत म्हटली जाणारी सगळी भजने, कीर्तने आणि भारूडे ही तर अंधश्रद्धा त्यागण्यासाठीच प्रबोधन करत असतात. इथे विवेक बुद्धीलाच प्राधान्य दिले गेलेले आहे. विवेक बुद्धीनेच जाणारे सगळे या मार्गावर, या वारीत असतात म्हणून ही वारी कायम राहिली आहे. कोणताही शहरी नक्षलवाद या वारीला रोखू शकत नाही. ती प्रत्येकाच्या मनामनात फेर धरत आहे.
कोणतीही गर्दी म्हटली की, पोलिसांचे टेन्शन वाढते. आयपीएलच्या जुगारात जिंकलेल्यांच्या सत्कार समारंभात झालेली चेगराचेंगरी जेमतेम काही हजारांची होती. पण आमची लाखोंची गर्दी वारीचे सौंदर्यच वाढवते. त्यामुळे इथे गर्दी झाली तरी पोलिसांना हातात ना लाठी घ्यावी लागते, ना कसला बंदोबस्त करावा लागतो. शे-पाचशेच्या मोर्चासाठीही पोलिसांना दंडेलशाही करावी लागते. पण आमच्या लाखोंच्या वारीत पोलिसांना कधी लाठी हातात घ्यावी लागत नाही. पोलीसही वारकरी बनून, भक्तिभावाने या वारीत हिंडतात. ते वारकºयांच्या मदतीला, तो आनंद लुटायला इथे येतात. त्यांना बंदोबस्तासाठी जावे लागत नाही. वारकºयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सरकार पाठवते. पण इथे पोलिसांना त्यांची ड्युटी करावी लागत नाही, तर आनंद घेता येतो हाच या वारीचा शांततेचा, विवेकाचा संदेश आहे.
विशेष म्हणजे, पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकºयांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारकºयांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात. यावेळी या सेवा पुरवणारे लोक, व्यक्ती संस्था या वारकºयांमध्येच परमेश्वराला, विठ्ठलाला पाहतात. दगडातल्या देवाला काय पाहायचे, हाच परमेश्वर मानून माणसातल्या देवाची सेवा ते करतात. तर आपण त्या माऊलीच्या दर्शनाला परमेश्वराच्या दर्शनाला जात आहोत, त्या प्रवासात आपल्याला कसलाही त्रास होऊ नये, म्हणून विठ्ठलानेच या सर्वांना पाठवले आहे, असा भाव वारकºयांच्या मनात असतो.
‘देवाक काळजी रे बाबा देवाक काळजी रे’ म्हणत तो त्याचा आनंद घेतो. हा पूर्णपणे श्रद्धेचा विषय आहे. इथे कुठेही अंधश्रद्धेला थाराच नसतो. कारण या वारीत आमच्या संतांचे तुकोबारायांचे अभंग, एकनाथांचे अभंग हे निरूपणासाठी घेतलेले असतात. वारकरी संप्रदायात, या वारीत कोणतीही अंधश्रद्धा नसते. पूर्णपणे कर्म करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. आमचा शेतकरी हा शेतीची कामे करून मगच वारीला निघतो आणि परत येईपर्यंत शेतीने चांगले रूप घेतलेले असते. काळी आई हिरवीगार झालेली असते. तोच विठ्ठलाचा प्रसाद मानला जातो. पेरण्या केल्यावर, शेतीची कामे पूर्ण झाल्यावर त्या पावासाला मनसोक्त पडून जमिनीला भिजवायचे असते. त्यातून अंकूर बाहेर काढून रोपे वर आणायची असतात. त्यासाठी या निसर्गाला मोकळीक देऊन शेतकरी वारीला जातो आणि येईपर्यंत पिके पूर्णपणे डवरलेली असतात. शेतीची कामे अर्धवट ठेवून शेतकरी कधीच वारी करत नाही. तसेच हे नियोजन, निसर्गाचे चक्र असते. म्हणूनच इथे कुठेही अंधश्रद्धेला थारा नसतो.
नवस, सायास याला अर्थ नसतो. कारण आमच्या वारीतील सगळे संत हे या अंधद्धेवरच कोरडे ओढत असतात. तुकोबारायांनी भेदभावाच्या भिंती तोडताना म्हटले आहे की, ‘दोन्ही टिपरी एकचि नाद। सगुण निर्गुण नाहीं भेद रे। ’ संत तुकारामांच्या अभंगाती टिपरीचे जे अभंग आहेत. त्यातील हा अभंग आहे. दोन टिपºया असल्या तरी त्या एकमेकांवर आदळल्या की, नाद हा एकच होत असतो. त्याचा हा नाद भेदभावाच्या भिंती तोडून जातो. म्हणून तर रासक्रिडेत, गोपिकांबरोबर नाचताना तो श्रीहरी टिपरी खेळतो. आजकाल टिपरी हा शब्द अनेकांना समजत नाही, कारण त्याला गुजराती, मारवाडी लोकांनी दांडिया असे नाव दिले आहे. पण टिपरी असो की दांडी एकमेकांवर आपटल्यावर आवाज एकच होतो. हे एकरूपतेचे लक्षण असते. ते श्रीहरीला पसंत असते. म्हणून याच अभंगात ते म्हणतात की,
‘कुसरी अंगें मोडितील परी। मेळविति एका छंदें रे ॥ १॥
काहींच न वजे वाया रे। खेळिया एक चि बसवंत अवघियां रे।
सम विषम तेथें होऊंच नेदी। जाणऊनि आगळिया रे ॥ ध्रु.॥
टिपरी खेळताना सगळे भेदभाव गळून पडतात. कारण सगळेजण एकरूप झालेले असतात. यासाठी टिपरी ही भगवंताशी संवाद साधणारी काठी आहे. ती जादूची काठी आहे. तशीच ती फिरते आहे. या जादुई टिपरीने आमचा भगवंताशी संवाद साधला जातो. पण हा संवाद साधताना समोर कोणीतरी नाद करण्यासाठी लागतो. हा एकट्याने खेळण्याचा खेळ नाही. तर सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. भेदभावाच्या भिंती पाडणारा असा सर्वसमावेशक खेळ म्हणूनच भगवंताला प्रिय आहे.
भगवंताची, श्रीकृष्णाची कोणतीच कृती ही अनावश्यक नव्हती. त्याच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे की कसे वागावे. काय करावे. तेच सांगणारा हा वारीचा मार्ग आहे. म्हणून या वारीच्या मार्गावर तुकोबारायांचे अभंग ही अविट गोडीने गायले जातात.
‘संत महंत सद्धि खेळतील घाई ।
ते च सांभाळी माझ्या भाई रे।
हात राखोन हाणिती टिपºया।
टिपरें मिळोनि जाय त्याची सोई रे ॥ २॥
इथे संपूर्ण समर्पणाची अपेक्षा ते करतात. हातचे राखून काही काम केले तर ते पूर्णत्वास जात नाही असेच ते सांगतात.
‘विताळाचें अवघें जाईल वांयां ।
काय ते शृंगारूनि काया रे।
निवडूनि बाहेर काढिती निराळा ।
जो न मिळे संताचिया घाई रे ॥ ३॥
प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज ।
नि:शंक होउनियां खेळें रे ।
नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान ।
विठ्ठल नामाचिया बळें रे ॥ ४॥
रोमांच गुढिया डोलविती अंगें ।
भावबळें खेळविती सोंगें रे।
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे ।
या विठोबाच्या अंगसंगें रे ॥ ५॥
अशी ही एकरूपतेची, एकात्मतेची, समानतेची दिंडी घेऊन पंढरीची वारी आता पंढरपुराच्या दाराशी आललेली आहे, सीमेवर विसावते आहे.
प्रफुल्ल फडके/पाऊले चालती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा