सोमवार, २८ जुलै, २०२५

अ‍ॅशले मॅडिसन सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा


अ‍ॅशले मॅडिसनच्या सर्वेक्षणानुसार आता भारतातील लहान शहरे आणि गावेही बेवफाईच्या बाबतीत मोठ्या शहरांना कडक स्पर्धा देत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त दोन लाख लोकसंख्या असलेले तामिळनाडूतील कांचीपुरम हे भारतात ‘बेवफाईची राजधानी’ म्हणून उदयास आले आहे, तर दिल्ली दुसºया आणि गुरुग्राम तिसºया क्रमांकावर आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे. काही प्रकार फसवणूक करण्याच्या हेतूने होतात, तर काही प्रकार जाणूनबुजून केला जातो. पण यात शहरी आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक दरी कमी झालेली आहे हे एक निरीक्षण फार महत्त्वाचे आहे.


लग्नात फसवणूक करणे आता मोठ्या शहरांचा ट्रेंड राहिलेला नाही, लहान शहरे आणि गावातील लोकही ‘फसवणूक’च्या या खेळात उत्साहाने सहभागी होत आहेत. विवाहबाह्य संबंध आता गावातील लग्नांमध्येही एक सामान्य बाब बनले आहेत. ही काही बनवलेली गोष्ट नाही, विवाहित लोकांसाठी बनवलेल्या खास डेटिंग अ‍ॅप ‘अ‍ॅशले मॅडिसन’च्या अलीकडच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, आता लहान शहरे आणि गावातील लोक त्यांच्या जोडीदारांना फसवण्यात मोठ्या शहरांतील लोकांना जोरदार अशी स्पर्धा करत आहेत. तथापि, कठीण स्पर्धा असूनही, शहरातील लोकदेखील या बाबतीत मागे नाहीत. म्हणजे ग्रामीण भागातील लोक साधे आणि शहरातील बेरकी, फसवणूक करणारे हे समीकरण बदलून आता सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. हे सत्य अत्यंत चिंताजनक आहे. धोका शहरातही आहे, तितकाच तो ग्रामीण भागातही आहे. पूर्वी कथा, कादंबºया आणि चित्रपटांमधून मुलींना फसवणे, फसवून विवाह करण्यासाठी धडपडणारे हे मुंबईसारख्या महानगरातून येत असत. पण या सर्वेक्षणात मुंबई ही स्वच्छ असल्याचे दिसून आलेले आहे.

अलीकडच्या काळात भारत अ‍ॅशले मॅडिसनसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. जून २०२५च्या साइनअप डेटानुसार, भारतातील टियर-२ आणि टियर-३ शहरांचे लोक ‘गुप्त प्रेमसंबंध’ ठेवण्याच्या बाबतीत मेट्रो शहरांच्या लोकांना मागे टाकत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तामिळनाडूतील एक लहान शहर कांचीपुरम, ज्याची एकूण लोकसंख्या फक्त दोन लाख आहे, यामध्ये अव्वल आहे. छोटी शहरे किंवा ग्रामीण भाग हा एकांतासाठी किंवा गुप्तता राखण्यासाठी निवडला जात आहे का? म्हणजे ज्याप्रमाणे रेव्हपार्ट्या, किंवा काही अनैतिकी पार्ट्या आयोजित करण्यासाठी फार्म हाऊसचा वापर केला जातो, त्याप्रमाणे अशा छोट्या शहरांचा वापर केला जात आहे का?


जरी तामिळनाडूतील कांचीपुरम त्याच्या सुंदर साड्या आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध होते, परंतु आता ते भारताचे नवीन अफेअर झोन बनल्यानंतर चर्चेत आहे. अ‍ॅशले मॅडिसनच्या जून २०२५च्या आकडेवारीनुसार, भारतातील २० जिल्ह्यांमध्ये कांचीपुरम हे शीर्षस्थानी आहे, जिथे विवाहित लोक या डेटिंग अ‍ॅपवर सर्वाधिक साइन अप करत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तामिळनाडूचे हे छोटे शहर गेल्या वर्षी १७ व्या क्रमांकावर होते आणि यावर्षी ते थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.

कांचीपुरमनंतर मोठ्या मनाच्या लोकांची दिल्ली दुसºया क्रमांकावर आहे. येथे राहणाºया लोकांची हृदये एकाच वेळी अनेक लोकांसाठी धडधडतात. तिसºया क्रमांकावर दिल्लीला लागून असलेले गुरुग्राम आहे, जे राजधानीच्या सहवासाने प्रभावित आहे.


दिल्लीचे सहा जिल्हे आणि एनसीआरमधील ३ शहरे, गुडगाव, गाझियाबाद आणि नोएडा हे सर्व टॉप २० मध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय, जयपूर, रायगड आणि चंडीगड सारखी टियर-२ शहरे आता डेटिंग तसेच अफेअर्सच्या क्षेत्रात दिल्लीसोबत बरोबरी करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माया नगरी मुंबईचे नाव टॉप २० मध्ये समाविष्ट नाही. ही गोष्ट खरोखरच कौतुकाची म्हणावी लागेल. विशेषत: धार्मिक स्थळांवर असणाºया निवासस्थानांचा वापर अशा संबंधांसाठी होत आहे काय याचा तपास करावा लागेल किंवा शहरातील मोठमोठी महागडी निवासस्थाने परवडत नसल्याने अनैतिक संबंध ठेवणारे अशा छोट्या शहरांचा किंवा ग्रामीण भागांचा शोध घेत आहेत काय याचाही तपास करावा लागेल.

फक्त साइनअप नाही, एप्रिलमध्ये अ‍ॅशले मॅडिसनने you gov  सहकार्याने एक सर्वेक्षण केले, तेव्हा आणखी एक खुलासा झाला. भारत आणि ब्राझील अशा दोन देशांमध्ये आहेत जिथे ५३ टक्के लोकांनी उघडपणे कबूल केले की, त्यांचे प्रेमसंबंध आहेत. अ‍ॅशले मॅडिसनचे मुख्य धोरण अधिकारी पॉल केबल म्हणाले की, ‘भारत नातेसंबंधांची व्याख्या पुन्हा परिभाषित करत आहे.’ त्यांच्या मते, भारत त्यांच्या जागतिक बाजारपेठेत सहाव्या क्रमांकावर आहे आणि वर्षाच्या अखेरीस ते आणखी वर जाण्याची अपेक्षा आहे. ते असेही म्हणाले, ‘आम्ही लोकांना न सांगता, सुरक्षितपणे, गोपनीयपणे आणि निर्णय न घेता त्यांचे नाते एक्सप्लोर करण्याचा पर्याय देतो.’


त्यामुळे विवाहबाह्य संबंध ही समस्या न राहता एक फॅशन होऊ पाहत आहे. किंबहुना ती जीवनशैली बनत आहे. सेकंड होम असते तशी सेकंड फॅमिली करण्याचा ट्रेंड वाढत आहे ही बाब चांगली की चिंताजनक याचा ज्याचा त्याने विचार केला पाहिजे. पण टिव्ही मालिकांमधील एकही मालिका अशी नाही की, ज्यात विवाह बाह्य संबंधांचे समर्थन, कथानक नाही. त्यामुळे यातून अनुकरणाची प्रवृत्ती वाढत असेल, तर अशा मालिकांवर बंदी घालावी का याचा विचार समाजधुरिणांनी केला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/अन्वय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: