भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, असे अनेकदा म्हटले जाते, परंतु आता समोर आलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, मुस्लीम लोकसंख्या संपूर्ण जगात सर्वात वेगाने वाढत आहे. एका आकडेवारीवरून असेही दिसून येते की, जर हीच पद्धत चालू राहिली तर २०५० पर्यंत मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकसंख्या जवळजवळ समान असू शकते आणि २०७०नंतर मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्चनांना मागे टाकू शकते. हा बदल केवळ सांख्यिकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्याही संपूर्ण जगावर परिणाम करेल. या धार्मिक लोकसंख्या वाढीचे अनेक परिणाम जगावर होऊ शकतात. राजकीय उलथापालथ घडवण्याची ताकदही या लोकसंख्येवर आहे. त्यामुळे प्रत्येक देशातील राजकीय पक्ष आपली व्होट बँक जतन करण्यासाठी याचा वापर करताना दिसतील हे नक्की.
प्यू रिसर्च सेंटरच्या ‘२०१० ते २०२० पर्यंत जागतिक धार्मिक लँडस्केप कसा बदलला’ या विश्लेषणात्मक अहवालात जागतिक धार्मिक लोकसंख्याशास्त्रात होत असलेल्या व्यापक बदलांचे चित्र सादर केले आहे. या अहवालानुसार, जगातील सर्वात वेगाने वाढणारा धार्मिक समुदाय मुस्लीम समुदाय आहे. अहवालानुसार, २०१० ते २०२० दरम्यान मुस्लिमांच्या संख्येत झालेली वाढ इतर सर्व धर्मांना मागे टाकणारी आहे.
या अहवालात म्हटले आहे की, २०१० ते २०२० दरम्यान मुस्लिमांच्या संख्येत ३४७ दशलक्ष (३४.७ कोटी) वाढ झाली आहे, जी इतर सर्व धर्मांच्या एकत्रित वाढीपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, जागतिक मुस्लीम लोकसंख्येची टक्केवारी २३.९ टक्क्यांवरून २५.६ टक्क्यांपर्यंत वाढली. ही वाढ प्रामुख्याने तरुण लोकसंख्या आणि उच्च प्रजनन दरामुळे झाली. अहवालात म्हटले आहे की, २०१० मध्ये ख्रिश्चन लोकसंख्या ३०.६ टक्के होती, जी २०२० मध्ये २८.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली. या घटनेचे मुख्य कारण धार्मिक त्याग होते, ज्यामध्ये लोक विशेषत: पाश्चात्य देशांमध्ये ख्रिश्चन धर्म सोडत आहेत.
त्याच वेळी, अहवालात म्हटले आहे की, जागतिक हिंदू लोकसंख्या सुमारे १.२ अब्ज (२०१० मध्ये १.१ अब्ज होती) पर्यंत वाढली आहे, म्हणजेच १२ टक्केची वाढ. तथापि, हिंदूंची जागतिक टक्केवारी १५ टक्क्यांवरून १४.९ टक्क्यांपर्यंत किरकोळ घटली आहे. अहवालानुसार, हिंदूंचा प्रजनन दर जागतिक सरासरीशी सुसंगत आहे आणि धर्मांतराचा दरदेखील खूप कमी आहे. अहवालानुसार २०२०पर्यंत जगातील ९५ टक्के हिंदू भारतात राहतात.
याशिवाय, ‘धर्म न मानणाºया’ श्रेणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. धार्मिकदृष्ट्या अलिप्त लोकांची संख्या २७ कोटींनी वाढून १.९ अब्ज झाली आहे आणि त्यांचा जागतिक वाटा २३.३ टक्क्यांवरून २४.२ टक्के झाला आहे. प्रमुख धर्मांमध्ये २०१०च्या तुलनेत २०२० मध्ये फक्त बौद्ध धर्माची लोकसंख्या कमी होती. २०१० मध्ये बौद्ध हे जागतिक लोकसंख्येच्या ४.९ टक्के होते, परंतु २०२० मध्ये ती कमी झाली.
या अहवालानुसार, भारतात हिंदूंची लोकसंख्या २०१० मध्ये ८० टक्क्यांवरून २०२० मध्ये ७९ टक्के झाली आहे. त्याच वेळी भारतातील मुस्लीम लोकसंख्या २०१० मध्ये १४.३ टक्क्यांवरून २०२० मध्ये १५.२ टक्के झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने प्रजनन दर आणि तरुण लोकसंख्येमुळे आहे, धर्मांतरामुळे नाही. जरी भारतातील मुस्लिमांची ही वाढ पाकिस्तान किंवा बांगलादेशसारख्या इतर दक्षिण आशियाई देशांपेक्षा मंद असली तरी, ती अजूनही एक महत्त्वपूर्ण सांख्यिकीय बदल आहे.
या अहवालानुसार, २०१० मध्ये जगातील एकूण मुस्लीम लोकसंख्येपैकी ३५ टक्के लोक १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे मुस्लीम होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, इतक्या तरुण लोकसंख्येमुळे जन्मदर जास्त राहतो, ज्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढते. तसेच, मुस्लीम महिलांचा सरासरी प्रजनन दर इतर धार्मिक समुदायांपेक्षा जास्त आहे. यामुळे मुस्लीम लोकसंख्येचा नैसर्गिक वाढीचा दरदेखील जास्त आहे. तसेच, अहवालात म्हटले आहे की, मुस्लीम धर्म सोडून देणाºयांची संख्या आणि इतर धर्मातून इस्लाम स्वीकारणाºयांची संख्या जवळजवळ समान आहे. म्हणजेच, धार्मिक बदलाचा परिणाम नगण्य आहे, ज्यामुळे निव्वळ लोकसंख्या वाढ केवळ जन्मांमुळे होते. याशिवाय, अहवालानुसार केवळ १ टक्के प्रौढ लोक त्यांचा जन्मधर्म सोडून इतर धर्म स्वीकारतात, विशेषत: हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांमध्ये धर्मांतराचा दर अत्यंत कमी आहे.
तथापि, प्यू रिसर्चच्या या अहवालातून असे दिसून आले आहे की, येत्या काही दशकांत जगातील धार्मिक लोकसंख्या रचनेत लक्षणीय बदल होऊ शकतात, कारण मुस्लीम लोकसंख्या वेगाने वाढत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, ख्रिश्चन समुदायासमोरील आव्हाने वाढतील, विशेषत: युरोप आणि अमेरिकेत. अहवालानुसार जागतिक स्तरावर हिंदू समुदाय स्थिर राहील, परंतु भारतातील त्याचे प्रमाण हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. हा अहवाल केवळ लोकसंख्याशास्त्रीय विश्लेषणाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर धोरण-निर्धारण, शिक्षण, सांस्कृतिक जतन आणि धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचा आहे यात शंका नाही. खरे तर अशा अहवालांमुळे सुधारणांसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोणत्या धर्मात साक्षरता, रोजगार, गुन्हेगारी, सांस्कृतिक बाबी किती प्रमाणात आहेत आणि समाजहितासाठी काम करणारी शक्ती नेमकी कोणती आहे हे लक्षात घेऊन त्याचे विवेचन होणे आवश्यक आहे. कोणता धर्म चांगला की वाईट हा प्रश्न कधीच नसतो, पण त्याचे राजकारण करून स्वार्थासाठी वापर होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा