शनिवार, १९ जुलै, २०२५

नरकासूर


माझे नाव भावना प्रधान. आज मी माझीच कथा तुम्हाला सांगणार आहे. नाव भावना असले आणि आडनाव प्रधान असले, तरीही मी भावना प्रधान कधीच नव्हते. पण त्या प्रसंगानंतर मी अगदी कोलमडून गेले होते. अगदी भावनाशून्य झाले होते. बोलण्याच्या ओघात समजेलच सारे काही. पण माझ्यातला गेलेला आत्मविश्वास, पुसलेल्या भावना आणि जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याची दृष्टी त्याने दिली. हे त्याचे उपकार असले तरी त्याला ते उपकार आहेत असे वाटत नाही, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.


त्याचे नाव कौतुक शारंगधर. त्या घटनेनंतर तो एकेदिवशी आला आणि मला भेटायचेय म्हणाला. सवयच झाली होती मला त्या घटनेनंतर अशाप्रकारे भेटायला येणाºयांची. केविलवाण्या, दयेच्या नजरेने पाहणाºयांची मला घृणा येत होती. मीडियावाले, कॅमेरामन, पत्रकार, राजकीय नेते, विविध संघटनांचे कार्यकर्ते घराभोवती गर्दी करत होते. आई-वडिलांना कॅमेºयासमोर आणून काहीतरी दाखवायचा चंग बांधत होते. नुसता बाजार मांडला होता त्यांनी. राजकीय नेते या घटनेचा निवडणुकीत आपल्याला कसा फायदा होईल आणि सध्याचे सरकार कसे नालायक आहे हे सांगण्यासाठी घोषणा करत होते. या गर्दीतील राजकारणाचा, मीडियाचा खोटेपणा मला जाणवत होता. अहो त्या नराधमाने तर एकदाच अत्याचार केला होता. पण या बातम्या आणि राजकारणातील चर्चांनी क्षणोक्षणी डंख मारले जात होते.

तो आत आला आणि थेट त्याने विषयालाच हात घातला. तो म्हणाला, ‘हाय भावना, मी कौतुक. म्हणजे कौतुक शारंगधर नाव माझे. मला तुझ्याशी बोलायचे आहे.’ मी क्षणभर त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि कपाटातून एक झेरॉक्स प्रत काढून त्याच्या हातात ठेवली. त्याने त्या कागदाकडे पाहिलेही नाही आणि तो बाजूला ठेवत म्हणाला, ‘मला तुझ्याशी बोलायचेय’


‘मला सगळ्यांना सांगून सांगून कंटाळा आला आहे. पोलिसांना, डॉक्टरांना, मीडियाला, महिला संघटनांना... शेवटी मी ते लिहून काढले आहे, त्यात सगळे डिटेल्स आहेत.’

‘भावना...कूल डाऊन...डोण्ट बी गेट एक्सायटेड... प्रत्येकवेळी त्याच विषयावर चर्चा केली पाहिजे असे नाही ना? बोलण्यासाठी इतरही विषय असू शकतात.’ त्याचा ठाम आणि आग्रही सूर मला वेगळाच जाणवला. त्यात कुठेतरी प्रामाणिकपणा जाणवला. त्यामुळे मी जरा शांत झाले आणि म्हणाले, ‘गेला महिनाभर तो विषय सोडून काही बोललेच जात नाही. जेवताना, खाताना, झोपताना आणि झोपल्यावर स्वप्नातही तोच विषय. म्हणजे स्वप्न पडण्यासारखी झोप लागतच नाही, पण तो प्रसंगच जीवंत स्वप्न होऊन समोर चित्रपटाप्रमाणे दिसू लागतो.’


मला क्लासला जायचे होते. म्हणून मी बाहेर पडले. नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर आले. पण बस काही केल्या येत नव्हती. टॅक्सी करून जावे की कॅब करावी असा विचार करत असतानाच एक टॅक्सी जवळ येऊन थांबली. मी त्याला हात केला आणि टॅक्सीत बसले आणि त्याला पत्ता सांगितला. त्याने गाडी एकदम वेगाने चालवली आणि थोडा पुढे आला आणि साईडला गाडी घेतली. मला समजेना. तेवढ्यात अजून दोघे जण तिथे आले आणि गाडीत बसले. एकाने माझ्याशी लगट सुरू केली. मी ओडण्याच्या आतच टॅक्सीवाल्याने गाडी सुसाट निर्मनुष्य जागी नेण्यास सुरुवात केली आणि ते नराधम माझ्यावर तुटून पडले. शुद्धीवर आले तेव्हापासून नुसते सगळे लचके तोडत होते. पण हे लचके तोडणारे पांडरपेशी प्रतिष्ठीत होते. ते नराधम अत्याचार करून केव्हाच पळून गेले होते. कोणीतरी मला बेशुद्धावस्थेतच सरकारी हॉस्पिटलला आणले, पोलीस आले, नातेवाईक आले. पण नंतर चौकशी करणाºयांच्या तºहांनी तेच तेच अत्याचार पुन: पुन्हा वेदना देत होते. त्या दिवसापासून हेच रोज ऐकत होते. अजून काय सांगू तुम्हाला?

‘भावना, हे सारे मलाही माहिती आहे. कशासाठी सांगितलेस तू हे सारे? ते पुन: पुन्हा बोलण्याने काही साध्य होणार आहे का?’ कौतुक सहजपणे बोलून गेला. पण मी त्याला म्हणाले, ‘उद्ध्वस्त झाले आहे मी. आता जगण्याची दिशाच बदलली आहे माझ्या.’


‘बरोबर बोललीस... तुझ्या जीवनाची दिशा बदलायलाच तर मी आलो आहे.’ कौतुक म्हणाला तशी मी अवाक् झाले. ‘म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? नातेवाईक आई-वडिलांना शेजाºया-पाजाºयांना दयेचा, तिरस्काराचा कंटाळा आला का? म्हणून एखाद्या आश्रमात पाठवणार काय मला? माझ्या जीवनाची दिशा कशी बदलेल आता? एका निष्पाप नासवलेल्या मुलीला कोणती जगण्याची दिशा असू शकते?’

‘भावना, जगात अजूनही काही सुंदर असू शकते यावरचा तुझा विश्वास उडाला आहे.’


‘काय सुंदर असणार आहे? माझ्या आयुष्याची अशी लक्तरे झाली असताना मला कसे सुंदर दिसू शकेल काही?’

‘माझे ऐकशील?’


मी त्याला मानेनेच होकार दिला. तसा तोसहजपणे म्हणाला, ‘भावना मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू करशील माझ्याशी लग्न?’

काय बोलावे हे मला कळेचना. अचानक कोणी असा प्रश्न करेल? तेही माझ्या या अशा प्रकारानंतर कोणी मला असे विचारेल असे कधी मनातही येणार नाही. पण त्याचा चेहरा अत्यंत निरागस होता. तो खरोखरच प्रामाणिक होता. पण मीच बरबाद झालेले होते. समाजाच्या दृष्टीने अपवित्र झाले होते. कौतुकसारख्या कशातही कमी नसलेल्या तरुणाला मी शोभेन का? का त्याने माझ्याशी लग्न करावे? आयुष्यभर त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहावे म्हणून तर नसेल ना तो बोलत? पण त्याचा हेतु शुद्ध होता. माझ्या चेहºयावरचे भाव त्याने ओळखले आणि तो बोलू लागला,


‘भावना, मी समजू शकतो तुझ्या मनात काय चाललेय ते. पण एक सांग... तुझा देवावर विश्वास आहे ना?’ ‘माहिती नाही मला आहे की नाही? होता खरे तर पण या प्रकाराने देवाने काय माझ्या नशिबात दिले म्हणून माझा सगळ्यावरचाच विश्वास उडाला रे...’ कौतुक जवळ आला आणि म्हणाला, ‘भावना देवाने तो वाईट प्रसंग आणला त्यापेक्षा आजचा क्षण अधिक चांगला आहे असे नाही का वाटत तुला?’

‘कशासाठी करतो आहेस हे? जग काय म्हणेल तुला? कसली अवदसा आठवते आहे तुला?’


‘भावना, या जगात अत्याचार घडलेली तू पहिली मुलगी नाहीस. वर्षानुवर्ष अत्याचार घडत आहेत. यात त्या मुलींचा काय दोष? अत्याचार करणारे उजळ माथ्याने जगतात आणि निर्दोष असताना अशा अबलांनी आयुष्य वाया घालवायचे? वा रे सरकार, वारे माध्यमांनो...नाव उघड करायचे नाही म्हणून अशा पीडितेला निर्भया हे नाव दिले. जिने आयुष्यभर भीतीच्या सावटाखाली जगायचे ती कसली निर्भया?’ त्याच्याकडे मी बघतच राहिले. त्याच्या तोंडातून येणारे शब्द मला ऐकावेसे वाटत होते. तो बोलत राहिला, भावना, कृष्णाने १६ हजार एकशे आठ स्त्रीयांशी लग्न केले होते ना? याचा अर्थ समजतो का तुला? समाज हा कायम षंढच असतो. नरकासुराने सोळा हजार स्त्रियांना नासवले तेव्हा एक कृष्ण पुढे आला. त्या नरकासूराला मारले. पण त्या सोळा हजार स्त्रियांशी लग्न करायला समाजातला कोणीच पुढे आला नाही. म्हणून या नालायक षंढ झालेल्या समाजाला कृष्णाने दाखवून दिले की, इतक्या चांगल्या मुलींशी लग्न करायला तुमच्यापैकी एकही लायक नाही, मीच त्यांना माझे नाव देतो. कृष्णाची पत्नी आहे म्हटल्यावर कोणीही वाकड्या नजरेने कधी बघणार नाही, हा होता पुरुषार्थ. पण कृष्णाला थट्टेत सोळा हजार बायकांचा रंगेल देव म्हटले जाते. त्यामुळेच समाजात षंढांची संख्या वाढत गेली तर दुसरीकडे नरकासूर निर्माण होत गेले. स्त्रीयांवर अत्याचार करणारे नरकासूर बोकाळले. आता गरज आहे ती उद्धार करणाºया श्रीकृष्णाची. मी विचारले, ‘आदर्श घालून द्यायला निघाला आहेस? म्हणून मला मदतीचा हात देतो आहेस?’

‘या प्रश्नाची अपेक्षा होतीच भावना. पण मी सुद्धा एका अत्याचार पीडित बहिणीचा भाऊ आहे. तिच्या पुनर्वसनासाठी, तिला नव्याने जगण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण तिच्याशी विवाह करायला कोणी तयार होईन. शेवटी एकदिवस आत्महत्या केली तिने. त्याचवेळी निर्धार केला होता की लग्न करेन तर अशाच मुलीशी, जिला मी सुखी करेन. तुझा होकार मी गृहीत धरला आहे. सगळ्या समाजाला दाखवून द्यायचे आहे.’


कौतुकचे आई-वडील दुसरे दिवशी आले. त्याची आईपण साक्षात देवीच होती. ‘कौतुक, आमचा एकुलता एक मुलगा आहे. आयटी इंजिनिअर आहे. घरचे सगळे छान आहे. त्यात तुझ्यासारखी सुंदर मुलगी सून म्हणून मला मिळणार आहे. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल.’ मी सहज म्हणाले, ‘कौतुक एकुलता एक आहे?’

‘हो, आमच्या तिघांशिवाय घरात कोणीच नसते. आता तुम्ही घर मोठे करायचे.’


त्यानंतर कौतुकचा फोन आला होता. तो म्हणाला, ‘आईने काय बोलणे झाले सांगितले मला, मी एकुलता एक आहे हे तुला आता समजले आहेच. मग आत्महत्या कोणी केली असा तुला प्रश्न पडला असेल ना? भावना, या अत्याचार झालेल्या सगळ्या कोणाच्या तरी बहिणीच आहेत गं. त्यांचे दु:खही आपण आपले मानले तर जग खूप सुंदर दिसेल.’

प्रफुल्ल फडके/रविवारची कथा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: