चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भाषणांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केले की, जरी दोन्ही देश व्यासपीठावर एकत्र आले, तरीही त्यांच्या दृष्टिकोन, प्राधान्यक्रम आणि जागतिक भूमिकेबद्दलच्या विचारसरणीत खोल अंतर आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे भाषण परिपक्व, आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक दृष्टिकोनाने परिपूर्ण होते, तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांचे भाषण जुन्या तक्रारी, पाकिस्तानची बळी कार्ड प्रतिमा आणि काश्मीरचा जीर्ण झालेला मुद्दा यापुरते मर्यादित होते. त्यामुळे एकूणच या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री यांची अभ्यासपूर्ण काम करण्याची पद्धती आणि परिपक्वता दिसून आली, तर पाकिस्तानचा मात्र रडेपणा दिसून आला.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या भाषणात एससीओची प्रासंगिकता, प्रादेशिक स्थिरता आणि दहशतवादाविरुद्ध सामायिक जबाबदाºयांवर भर दिला. त्यांनी भारताची उदयोन्मुख जागतिक भूमिका अधोरेखित केलीच नाही तर या व्यासपीठाद्वारे पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांना स्पष्ट संदेश दिला की, दहशतवाद आणि सीमापार हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारताच्या कारवाईचे समर्थन करताना, जयशंकर यांनी एससीओला दहशतवाद आणि अतिरेकीवादाचा सामना करण्याच्या त्यांच्या मूळ उद्दिष्टापासून विचलित होऊ नये असा सल्लाही दिला. तसेच, जयशंकर यांचे लक्ष भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ धोरणाला आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टिकोनाला प्रादेशिक सहकार्याशी जोडण्यावर होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा या प्रदेशात शांतता आणि दहशतवादमुक्त वातावरण असेल, तेव्हाच सामायिक विकास शक्य आहे. ऊर्जा सुरक्षा, आर्थिक सहकार्य, कनेक्टिव्हिटी आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर भारताची भूमिकादेखील जबाबदार आणि परिपक्व जागतिक शक्तीची प्रतिमा सादर करते.
दुसरीकडे, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांचे भाषण पूर्वनिर्धारित अजेंडा आणि भारताविरुद्धच्या जुन्या दाव्यांचा विस्तार असल्याचे दिसून आले. इशाक डार यांनी अप्रत्यक्षपणे काश्मीर मुद्दा उपस्थित करून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओढण्याचा प्रयत्न केला, तर एससीओचा निकष असा आहे की, हे व्यासपीठ द्विपक्षीय वादांसाठी नाही तर सामायिक प्रादेशिक हितसंबंधांसाठी आहे. डार यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे पहलगाम हल्ल्याकडे दुर्लक्ष करणे, भारतावर निराधार आरोप करणे आणि भारताशी संवादाची गरज व्यक्त करणे यांसारख्या गोष्टी होत्या. इशाक डार म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत दक्षिण आशियात अत्यंत त्रासदायक घटना घडल्या. इशाक डार म्हणाले की, पाकिस्तान युद्धबंदी आणि स्थिर प्रादेशिक संतुलन राखण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. तथापि, बळाचा मनमानी वापर सामान्य होणे हे आपण स्वीकारू शकत नाही. तसे पाहिले तर, एकीकडे पाकिस्तान स्वत:ला बळी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत राहिला, तर दुसरीकडे तो प्रादेशिक स्थिरता आणि विकासाबद्दल बोलत राहिला, जो केवळ त्यांच्या धोरणातील विरोधाभास अधोरेखित करतो.
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भाषणांवर नजर टाकली, तर एससीओ व्यासपीठावर दोन्ही देशांच्या दृष्टिकोनात मोठा फरक दिसून येईल. भारत आर्थिक विकास, दहशतवादाविरुद्ध एकता आणि प्रादेशिक स्थिरतेबद्दल बोलत असताना, पाकिस्तान अजूनही काश्मीर मुद्द्यात आणि भारतविरोधी चर्चेत अडकलेला दिसत होता. भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना, पाकिस्तान अजूनही त्याच्या ओळखीच्या आणि अस्तित्वाच्या राजकारणात अडकलेला आहे. या बैठकीतून हे स्पष्ट झाले की, पाकिस्तान त्याच्या जुन्या अजेंड्यातून बाहेर पडण्यास तयार नाही, तर भारत प्रत्येक जागतिक व्यासपीठावर रचनात्मक, समाधान-केंद्रित आणि विकास-केंद्रित दृष्टिकोनाने पुढे जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले आहे की, पुढील महिन्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजिन शिखर परिषदेत आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये २० हून अधिक देशांचे नेते आणि १० आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख सहभागी होतील. एससीओ तियानजिन शिखर परिषदेचे आयोजन ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि एससीओ सदस्य देशांचे इतर नेते या शिखर परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेला गेले तर सर्वांच्या नजरा विशेषत: भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भाषणांवर असतील.
तथापि, एससीओसारख्या व्यासपीठावर भारत आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनातील फरक केवळ भाषणांपुरता मर्यादित नाही तर तो दोन्ही देशांच्या व्यापक परराष्ट्र धोरणाचा आणि भविष्यातील राजनैतिक मार्गांचा देखील सूचक आहे. भारत आपल्या आत्मविश्वास, आर्थिक ताकद आणि जागतिक भूमिकेवर आधारित आपले भविष्य घडवत असताना, पाकिस्तान अजूनही भूतकाळातील घोषणांमध्ये अडकलेला आहे. या बैठकीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, आज भारत केवळ दक्षिण आशियासाठीच नव्हे तर जागतिक दक्षिणेसाठी देखील एक विश्वासार्ह नेता आहे, तर पाकिस्तानची भूमिका आता केवळ विरोध आणि बळी पडण्याच्या कथेपुरती मर्यादित आहे. पण यातून भारत हा एक श्रेष्ठ भारत होत आहे, याचे चित्र याठिकाणी दिसून आले. पुढच्या महिन्यात पंतप्रधान मोदी तिथे गेले तर त्यावर कळस चढवून येतील यात शंका नाही.
प्रफुल्ल फडके/अन्वय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा