अशोक हांडे हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि सळसळता उत्साह आणि प्रेक्षकांना भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व समोर येते. यावर्षीचा साहित्य सम्राट आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे. बहुआयामी आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला मिळणार आहे, याचा तमाम महाराष्ट्राला आनंद आहे. कारण रंगभूमीसाठी अशोक हांडे यांनी दिलेले योगदान हे अनमोल आहेच, पण मराठी लोककला आणि संगीताची परंपरा सर्वदूर पोहोचवणारा हा वारकरी या कलेत पांडुरंग भेटीचा आनंद मिळवतो आणि प्रेक्षकांना त्याची अनुभूती देतो.
अशोक हांडे हे आपल्या ‘चौरंग’ या त्यांच्या संस्थेमार्फत लोककलेला व नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य गेली तीन दशके करीत आहेत. अशोक हांडे यांनी मंगलगाणी-दंगलगाणी, आवाज की दुनिया, आझादी पचास, गाने सुहाने, स्वरलता, गंगा-जमुना, माणिकमोती आणि मराठी बाणा हे कार्यक्रम यशस्वीच नव्हे तर एका उत्तुंग यशोशिखरावर नेले. याशिवाय यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील मी यशवंत, एका व्यक्तिमत्त्वात १० व्यक्तिमत्त्वे साकारलेले आचार्य अत्रे यांचा एक भव्यदिव्य कार्यक्रम, अत्रे, अत्रे सर्वत्रे असे अनेक कार्यक्रम मराठी रंगभूमीवर सादर करून स्वत:ची एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली.
अशोक हांडे यांचे वडील किसनराव नथुजी हांडे, इयत्ता सातवीला म्हणजेच पूर्वीच्या व्ह.फा. किंवा व्हर्नाक्युलर फायनलला पुणे जिल्ह्यात दुसरे आले होते. त्यावेळी त्यांना तलाठ्याची नोकरी चालून आली होती. पण तलाठी झालास तर वाईट मार्गाने पैसा कमवशील म्हणून आजोबांनी त्यांना मुंबईला हमाली करायला पाठवले. क्रॉफर्ड मार्केटमध्ये हमाली करणाºया किसनरावांनी स्वत:च्या कर्तृत्वावर तिथेच जम बसवला आणि आंब्याचा व्यापार सुरू केला. अशोक हांडे यांचे वडील मुंबईला आणि आईबरोबर मुले गावाकडे अशी त्याकाळच्या जगण्याची रूढ परंपरा होती तसेच घडले होते. पण ईश्वरी कृपा असेल कदाचित पण, अशोक हांडे यांना लहान वयातच लोककलांचे बाळकडू त्यामुळेच मिळाले. भारूड, भजन, लळीत, नाटके असा उत्सवी बाज तर जात्यावरची गाणी (ओवी), मोटेवरची गाणी, बैलगाडीवरची गाणी, शेतात काम करतानाची लयबद्ध गाणी इथपासून उजाडता-उजाडता आलेला वासुदेव, लग्नानंतरच्या जागरणाला किंवा गोंधळासाठी आलेली वाघ्या-मुरळी, गोंधळी, जोगवे, वैदिणी, भिकारी, लमाणांचे तांडे इथपासून ते अगदी निर्जन ठिकाणच्या शिवमंदिरात एकटाच एकतारीवर भजने म्हणणारा कोणी एक साधू असा मराठी संगीताचा अस्सल बाज या ग्रामीण जीवनात संस्कारक्षम वयात त्यांना पाहायला, ऐकायला, शिकायला आणि अनुभवायला मिळाला. ही शिदोरी घेऊन ते मुंबईत दाखल झाले. शिक्षणानंतर आपल्या आंब्यांच्या विक्रीच्या पिढीजात व्यवसायात लक्ष घालू लागले. पण तरीही रंगभूमीचे आकर्षण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांच्यातला कलाकार कुठेतरी बाहेर पडू पाहत होता. एखाद्या वारकºयाला जशी विठ्ठल भेटीची ओढ लागते तशी रंगभूमीवरच्या विठ्ठलाची ओढ त्यांना खेचत होती.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे तर त्यांचे दैवत आणि साक्षात सरस्वती म्हणून ते पाहत होते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर ते त्या वेळी करतच होते, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी त्यांनी एक खास जागा तयार केलेली होती. मुंबईच्या रुपारेलमध्ये महाविद्यालयीन जीवनात एकांकिकेचे लेखन-दिग्दर्शन करता करता ते शेवटी रंगभूमीचे झाले. त्यांना ही वारीची दिंडी भेटली.
अर्थात हिंदी, मराठी चित्रपटांतील गाण्यांचे गारूड काही उतरायला तयार नव्हते. त्यातून मिळणाºया ऊर्जेतूनच पुढे अशोक हांडे यांनी मंगलगाणी-दंगलगाणी, आवाज की दुनिया, आझादी ५०, गंगा-जमुना, गाने सुहाने, मराठी बाणा, मधुरबाला असे कार्यक्रम सादर केले.
२००४ मध्ये लता मंगेशकर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करून ७६व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लतादीदींची ७५ गाणी सादर करणारा अमृतलता हा कार्यक्रम त्यांनी चौरंग या संस्थेतर्फे सादर करायला लागले. अमृतलताचा पहिला प्रयोग झाला २२ जानेवारी २००४ रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियममध्ये. त्यानंतर पुढचा प्रयोग प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर येथे केला. त्यानंतर इंदौर, उज्जैन, कोलकाता, झारखंड, दिल्ली, गोवा, रायपूर, पुणे, गांधीनगर असा प्रवास करत करत अमृतलता कार्यक्रमाने पाचशे हून अधिक प्रयोग केले. अमृतलता कार्यक्रम करायचा, असे जेव्हा ठरले; त्या वेळी कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी तसेच त्यात कोणकोणत्या गाण्यांची निवड केली आहे, याची कल्पना देण्याकरिता ते लतादीदींशी संपर्कात होते.
त्याचप्रमाणे माणिक वर्मा यांच्या निधनानंतर भारती आचरेकर यांनी अशोक हांडे यांच्याकडे माणिक वर्मांवर एखादा कार्यक्रम करा, अशी विनंती केली होती. त्यातून माणिकमोती तयार झाला. तीच कहाणी गंगा-यमुना या कार्यक्रमाची. आपल्याकडे रूपेरी पडद्याला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न याच नजरेने मधुबालाकडे बघितले जाते. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावे लागले. ते सर्व अशोक हांडे यांनी मधुरबालाच्या रूपात मांडले.
यशवंत या कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी त्यांना मिळाली. मराठी बाणा हा १२५ कलाकारांना सोबत घेऊन मराठी रसिक प्रेक्षकांसमोर अशोक हांडे सादर करतात ही तर कमालच आहे. म्हणजे रंगमंचावर एखादा सर्कसचा ताफा यावा तसा भव्यदिव्य आभास इथे होतो. हे अत्यंत अवघड आहे. चार माणसांना एकत्र आणणे जिकिरीचे असते, तिथे हा एवढा मोठा ताफा जमवणे सोपे काम नाही. पण या कलाकारांच्या वारीचे हेच तर महत्त्व आहे. अशोक हांडे यांनी ते साध्य करून दाखवले. मराठी बाणा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. शाहीर साबळे यांच्यानंतर मराठीचे हे सांस्कृतिक वैभव खºया अर्थाने कोणी जपले, संवर्धन केले असेल तर ते अशोक हांडे यांनी. त्यामुळे महाराष्ट्रासाठी अशोक हांडे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मराठी बाणा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला याचे कारण मराठी बाणा आणि संस्कृती याबद्दलची त्यांची निष्ठा आणि प्रेम, त्यांच्या अंगातले मूलभूत नाट्यगुण, दिग्दर्शन कौशल्य, अभ्यासू वृत्ती आणि उत्कृष्ट व्यवस्थापन, या सगळ्यांचा हा परिपाक आहे. नर्तक, गायक आणि वादक असे सव्वाशे कलाकार एकत्र आणून त्यांना उत्तम तºहेने नटवून, तीन तासांहून अधिक काळ एक क्षणही वाया जाऊ न देता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणे हे अत्यंत अवघड काम आहे.
मराठी बाणामधून अशोक हांडे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन डोळ्यांसमोर उभे करतात. इथले सण समारंभ, मग लग्न असो वा मंगळागौर, दहीहंडी असो वा गणपती पूजन या सगळ्याचा समावेश या कार्यक्रमात झाला आहे. आदिवासी, कोळी, पंढरपूरचे वारकरी ही सारी मंडळी इथे पाहायला मिळतात.
यामध्ये कालीमाता आहे, गणपती आहे, विठ्ठल-रखुमाई आहेत, संत तुकाराम भजनात गुंगवतात आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यातून प्रेरणा देतात. या कार्यक्रमातून जुन्यापासून नव्यापर्यंतच्या लोकसंगीताची चव चाखायला मिळते, शिवाय जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा या भावगीतापासून ते पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा सारख्या लावणीपर्यंत! प्रयोगातले नर्तक उत्तम नाचतात, गायक सुमधुर गातात, वादक अजोड वाद्यवादन करतात. प्रेक्षक तल्लीन होतात. हीच ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. कारण इथे साक्षात रंगभूमीवरचा पंढरी असतो.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वत: अशोक हांडे यांची चपळाई आणि अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रयोगाला मुठीत पकडून ठेवत त्यांचे नियंत्रण फार प्रभावी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कोणत्याही व्यवस्थापनाच्या अभ्यासकांना अशोक हांडे यांची कारकीर्द अभ्यासावी लागेल असे वाटते. या सर्व कार्यक्रमाचे लेखन आणि संपादन त्यांनी स्वत: केले आहे. मराठी बाणाचे २००० च्या आसपास प्रयोग झाले आहेत. अशा या महान कलाकाराला, मराठी बाण्याला आचार्य अत्रे यांच्या कºहेच्या काठावर मिळणारा सन्मान अत्यंत अनमोल आहे, उचित असा आहे. कारण हा केवळ अशोक हांडेंचा नाही तर त्यांनी गौरवलेल्या महाराष्ट्राचा हा गौरव यातून होणार आहे.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा