जगभरात असंख्य वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे आहेत; पण त्यात कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा दबदबा असतो. त्या व्यक्तीचा, पक्षाचा उदोउदो करण्यासाठी, अशी वर्तमानपत्रे चालवली जातात; पण सामान्य माणसांचे विषय घेऊन चालणारे कोण आहे? हा विषय आदरणीय मुरलीधर तथा बाबा शिंगोटे यांच्या मनात सतत घोळायचा. त्या विचारातूनच १९९०च्या दशकात दै. मुंबई चौफेरची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आणि तो एक सर्वसामान्यांचा आवाज झाला. आज बाबांना जाऊन ५ वर्षे झाली. त्यांचा पाचवा स्मृतिदिन आज आहे, पण तरीही त्यांचा विचार जपत हे दैनिक आणि हा अंबिका परिवार चालला असल्यामुळे अजूनही बाबांचे अस्तित्व जवळपासच असल्याचे सतत जाणवत राहते. त्यातून ९ डिसेंबर २०२४ ला त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यावर त्यांची नजर सतत आपल्यावर आहे आणि आपण त्यांच्याशी सतत संवाद साधत आहोत असे वाटते.
वर्तमानपत्र हे राजकारण्यांचा अड्डा असता कामा नये, तर त्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न समोर आले पाहिजेत. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बातमीला, कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. त्याप्रमाणे सर्वसामान्यांचे दैनिक, सामान्यांचा आवाज, सामान्यांना आनंद देणारे वर्तमानपत्र देण्यासाठी बाबांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, पुण्यनगरी, यशोभूमी, कर्नाटक मल्ला, अशा वृत्तपत्रांची मालिका त्यांनी वाचकांना दिली आणि सामान्यांचा आवाज अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात मिळवली.
न कंटाळता, कायम उत्साहात काम करत राहणे, ही त्यांची ख्याती होती. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे रहस्य आहे हे स्वामी विवेकानंदांचे तत्त्व होते. ते धोरणच त्यांनी अवलंबले होते. आपल्या कर्तृत्वाचा आणि कामे कशी करायची असतात, त्याचा ठसा उमटवून मराठी वृत्तपत्रसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवणारे मालक, संपादक, प्रकाशक, वितरक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले जाते.
बाबा शिंगोटे हे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एक चमत्कारच म्हणावा लागेल, म्हणूनच राज्य सरकारने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर कसे मोठे होता येते याचे शिक्षण मिळण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात त्यांच्यावर एखादा पाठ घेण्याची आवश्यकता आहे. इतिहासातले कर्तृत्वाचे दाखले आपण नेहमीच वाचत आलो आहोत; पण वर्तमानातले साक्षीदार आणि वर्तमानात रमणारे हे व्यक्तिमत्त्व फार महत्त्वाचे आहे. आज या वृत्तसमूहातील कोणत्याही वर्तमानपत्राकडे वाचक फोन करून आपल्या भावना व्यक्त करतात ही बाबांची किमया आहे आणि त्यांनी दिलेला तोच वसा आम्हाला जपायचा आहे. सर्वसामान्य माणूस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
आपण वाचकांना जो अंक देणार आहोत, तो अत्यंत अचूक असला पाहिजे. माहितीने परिपूर्ण असला पाहिजे. त्यात मनोरंजनही असले पाहिजे, याकडे बाबांचा कटाक्ष असायचा. त्यामुळेच प्रस्थापित वर्तमानपत्रांतूनही आपली वेगळी वाट निर्माण करण्याचे त्यांचे धोरण हे यशस्वी झाले. अतिशय अल्प काळात त्यांनी आपली सर्वच वर्तमानपत्रे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केली. अवघ्या दोन दशकांत त्यांनी अनेक दशके लोकांच्या मनात असलेल्या वर्तमानपत्रांना मागे टाकत वाचकप्रियता मिळवली. हे काम सोपे नव्हतेच; पण ते त्यांनी सहजपणे करून दाखवले. यासाठी लागते ती जिद्द आणि प्रामाणिकपणा, जो त्यांच्याकडे होता, त्याचेच हे यश होते.
आजकाल मॅनेजमेंटच्या पदव्या घेणारे लोक आपल्या काही तरी कल्पना लढवून प्रयोग करत असतात; पण असली कसलीही प्रस्थापित डिग्री नसताना, बाबा त्यांच्या कल्पकतेने जो यशस्वी प्रयोग करत होते, त्यामुळे मुंबई चौफेर, पुण्यनगरी ही वर्तमानपत्रे यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचली.
आज लाखो वाचक दररोज मुंबई चौफेर वाचतात आणि त्याच्याशी समरस होतात ही बाबांची पुण्याई आहे. याचे कारण दीर्घकाळ वितरण व्यवस्थेत राहिल्याने त्यांना वाचकांची नाडी सापडलेली होती. वाचकांना जे पाहिजे तेच दिले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे बाबांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली सर्वच वर्तमानपत्रे वृत्तपत्रसृष्टीतील एक विश्वासपात्र आणि यशस्वी दैनिके ठरली. बाबांच्या प्रत्येक वागणुकीतून आणि कृतीतून काही ना काही तरी सतत शिकायला मिळायचे. अन्य साखळी वर्तमानपत्रे किंवा त्यांची वितरण साखळी, त्यासाठी हिंडणारे कर्मचारीही या व्यवसायातले बारकावे नेमके कसे असले पाहिजेत, याचे मार्गदर्शन घेण्यासाठी सतत बाबांकडे येत असत.
बाबा नेहमी सांगायचे की, सगळ्या वर्तमानपत्रांची आज कुठे, किती अंक विक्री झाली आहे, किती वितरित केले आहे याची आकडेवारी दुसºया दिवशी समजायची; पण बाबांना मात्र ही आकडेवारी डोक्यात असायची. ती त्याच दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना माहिती असायची. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात कोणत्या गावात कोणते वर्तमानपत्र किती ठिकाणी जाते, किती खप आहे, हे त्यांना माहिती असायचे. त्यामुळे कोणीही कितीही दावे केले, कसलीही आकडेवारी जाहीर केली, कोणाचेही दाखले दिले, कोणत्याही एजन्सीचे हवाले दिले, तरी बाबांचे त्यावर शिक्कामोर्तब असेल, तरच ती आकडेवारी खरी आहे का खोटी आहे, हे समजायचे. कारण बाबांना वाचकांची, विक्रेत्यांची, पत्रकारांची, संपादकांची सर्वांचीच माहिती व मर्यादा माहीत होती. प्रत्येकाची क्षमता माहिती होती. इतके ते सगळे कसे काय करत होते?
तर एखादा चमत्कार असावा, अशी काम करण्याची त्यांची क्षमता होती. तो मशीनचा आवाज, कागदाचा वास आणि वाचकांपर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणाºया वितरणाचा आनंद हे त्यांना सतत हवे हवेसे वाटायचे. जास्तीत जास्त ताजी बातमी आपल्या अंकातून दिली पाहिजे यासाठीच त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि वाचकांची पसंती मिळवली. एक मराठी माणूस अनेक संसार उभे करतो, अनेकांना रोजगार देतो आणि सर्वसामान्यांची ताकद उभी करतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा होते, आहेत. बाबा नेहमी म्हणायचे की, लग्न समारंभात सजवलेले ताट असते, त्याप्रमाणे वर्तमानपत्र असले पाहिजे. चमचमीत भाजी, चटणी, कोशिंबीर, झणझणीत रस्सा, आमटी, आंबट ताक, कढी, चुरचुरीत तळण, भजी, गोडवा जपणारे मस्तपैकी पक्वान्न, अशी परिपूर्ण थाळी जशी लोकांना आवडते, तसेच वर्तमानपत्र असले पाहिजे. त्यात सगळे रस असले पाहिजेत. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, अध्यात्म, राजकारण, इतिहास, भूगोल, कला, नाटक, सिनेमा असे सगळे विषय असले पाहिजेत. गुन्हेगारी जगत असले पाहिजे, आरोग्य असले पाहिजे, शिक्षण असले पाहिजे. सगळे काही एकाचवेळी देता आले पाहिजे. दोन, पाच रुपये देऊन आपला पेपर विकत घेतल्यावर ते पैसे वसूल झाले, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. इतका छान अंक आपण दिला पाहिजे. यासाठी बाबा कायम आग्रही होते. तो वसा आम्ही कायम जपणार आहोत हीच बाबांना दिलेली ग्वाही म्हणजे त्यांना दिलेली आदरांजली ठरेल.
आज बाबांच्या जाण्याने अंबिका ग्रुपची, आमची सर्वांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, कारण आमचे मार्गदर्शक गेले आहेत; पण त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच आम्ही पुढे जाऊ, असे वचन त्यांना यानिमित्ताने देऊन आमची आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो.
- प्रफुल्ल फडके/श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा