शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

२५ टक्के टेरिफचा परिणाम कोणत्या क्षेत्रावर होणार?


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला भारतातून आयात होणाºया वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याचा आदेश ७ आॅगस्टपासून लागू होईल. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर (अमेरिकेच्या वेळेनुसार) या संदर्भात कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशात अमेरिकेच्या अनेक व्यापारी भागीदारांवर नवीन कर लादण्यात आले आहेत. जे ७ आॅगस्टपासून लागू होतील. यापूर्वी हा कर शुक्रवारपासून म्हणजेच १ आॅगस्टपासून लागू होणार होता. त्यांच्या व्यापार अजेंडातील हा पुढचा टप्पा आहे. पण यावरून भारतात प्रचंड राजकारण सुरू झाले आहे. विशेषत: हा २५ टक्के टॅरिफ लावल्यामुळे विरोधकांना कोलीत मिळाले आहे. पण त्याचा नेमका परिणाम काय होणार आहे, याबाबत कोणीच बोलत नाही. म्हणूनच ते समजून घेणे आवश्यक आहे.


यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणारी बहुतेक उत्पादने तेथे महाग होणार आहेत हे निश्चित आहे. भारतीय निर्यातदारांसाठी हा धक्का ठरू शकतो, कारण अमेरिका हा भारतीय उत्पादनांचा मोठा खरेदीदार आहे आणि जर भारतातून पाठवल्या जाणाºया वस्तूंवर अमेरिकन शुल्क वाढले तर तेथील नागरिक भारतीय उत्पादनांऐवजी इतर देशांमधून येणाºया वस्तूंना कमी दरामुळे प्राधान्य देऊ शकतात.

भारत आणि अमेरिकेतील व्यापार सुमारे १३० अब्ज डॉलर्सचा आहे आणि यामध्ये भारताची निर्यात सुमारे ८७ अब्ज डॉलर्सची आहे. भारतीय उद्योग उत्पादनांपासून ते सेवांपर्यंत सर्व काही अमेरिकेत निर्यात करतात. अशा परिस्थितीत आता अमेरिकेने शुल्काची घोषणा केल्यामुळे त्याच्या परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उदाहरणार्थ- भारत आणि अमेरिकेतील व्यापाराशी संबंधित सध्याचे आकडे काय आहेत? ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतातील कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे? याशिवाय, रशियासोबतच्या भारताच्या व्यापाराबाबत ट्रम्प यांनी दंड लादण्याची धमकी दिली आहे, येणाºया काळात कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो? हे लक्षात घेतले पाहिजे.


या वर्षी एप्रिलमध्ये जेव्हा ट्रम्प यांनी पहिल्यांदाच वेगवेगळ्या देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली, तेव्हा दिसून आले की भारताने अमेरिकेतून आयात केलेल्या अनेक वस्तूंवर कर लादला आहे. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प भारतावर प्रत्युत्तरात्मक आयात शुल्क लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आयटी क्षेत्रावर, कापडावर, शेतीवर होऊ शकतो. सध्या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू आहेत. उदाहरणार्थ, जर अमेरिकेने भारतातून आयात केलेल्या तांदळावर २५ टक्के कर लादला, तर ज्या अमेरिकन नागरिकांना पूर्वी १०० रुपयांना भारतीय तांदूळ मिळत होता त्यांना आता आयात शुल्कासह १२५ रुपयांना तांदूळ मिळेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादनांवरही अशीच परिस्थिती असेल.

भारताचे इलेक्ट्रॉनिक क्षेत्र हे अमेरिकेला सर्वात मोठे निर्यात क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांत, लॅपटॉप, सर्व्हर आणि टॅब्लेटच्या बाबतीत भारत अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. अशा परिस्थितीत, ७ आॅगस्टपासून लागू होणाºया अमेरिकन टॅरिफचा या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, पीटीआयने गुरुवारी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकेत या क्षेत्रावर आयात शुल्क लादण्यासाठी कलम २३२चा आढावा घ्यावा लागेल, ज्याची अंतिम तारीख दोन आठवड्यांनंतर आहे. म्हणजेच, या क्षेत्राला दोन आठवड्यांसाठी अमेरिकन टॅरिफमधून सवलत मिळण्याची अपेक्षा आहे.


भारताच्या टेक्सटाइल उद्योग निर्यातीचा मोठा भागदेखील अमेरिकेवर अवलंबून आहे. जर आकडेवारीवर विश्वास ठेवायचा झाला, तर भारतातून होणाºया एकूण टेक्सटाइल निर्यातीपैकी २८ टक्के निर्यात केवळ अमेरिकेत होते. अशा परिस्थितीत, ७ आॅगस्टपासून लागू होणाºया टॅरिफचा या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम होईल. खरे तर, गेल्या काही वर्षांत, अमेरिकेने भारत तसेच व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात कापड उत्पादने आयात केली आहेत. अमेरिका सध्या व्हिएतनामवर १९ टक्के कर लादत असताना, ट्रम्प यांनी इंडोनेशियावर २० टक्के कर लादला आहे. या संदर्भात अमेरिकेच्या करामुळे भारताचे कापड क्षेत्र स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बांगलादेश आणि कंबोडियादेखील या क्षेत्रात भारतासोबत स्पर्धेत आहेत, परंतु अमेरिकेने या देशांवर जास्त कर लादले आहेत. बांगलादेशवर अमेरिकेचा आयात शुल्क ३५ टक्के आहे आणि कंबोडियावर तो ३६ टक्के आहे.

भारताच्या औषध क्षेत्रासाठी अमेरिका हा सर्वात मोठा देश आहे. अहवालांनुसार, भारताची अमेरिकेला होणारी एकूण निर्यात १०.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारताच्या एकूण औषध निर्यातीपैकी सुमारे ४० टक्के निर्यात अमेरिकेत जाते. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या शुल्काचा परिणाम या क्षेत्रावर वाईट परिणाम करू शकतो. कदाचित भारताच्या या क्षेत्राला सध्या ट्रम्प यांच्या २५ टक्के शुल्काच्या कक्षेबाहेर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत ब्रोकरेज हाऊस जेफरीजने म्हटले आहे की, सध्या तरी ट्रम्प यांच्या प्रतिशोधात्मक शुल्काचा भारतीय औषध क्षेत्रावर कमीत कमी परिणाम होईल, परंतु भविष्यात कोणत्याही अतिरिक्त शुल्काची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुरुवारी औषध क्षेत्रांच्या शेअर्समध्येही थोडीशी घसरण दिसून आली.


अमेरिकेच्या शुल्काचा भारताच्या रत्ने आणि दागिने क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या उद्योगांमध्ये अशी चर्चा आहे की, अमेरिकेने शुल्क लादल्यानंतर बहुतेक रत्ने आणि दागिन्यांच्या किमती वाढतील, ज्यामुळे त्यांची खरेदी कमी होईल आणि या उद्योगाचा लाभांश कमी होऊ शकतो. सध्या, अमेरिकेने या उद्योगावर १० टक्के बेसलाइन टॅरिफ लावला आहे, जो एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आला होता, तर यापूर्वी पॉलिश केलेल्या हिºयांवर शून्य, सोने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर ५-७ टक्के आणि चांदीच्या दागिन्यांवर ५-१३.५ टक्के शुल्क होते. अमेरिकेच्या या नव्या टॅरिफमुळे भारतीय रत्ने आणि दागिने उद्योगाला धोका निर्माण झाला आहे, शिवाय एक लाख कामगारांच्या नोकºया धोक्यात आहेत.

भारत सध्या अमेरिकेला ५.६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची कृषी उत्पादने निर्यात करतो. त्याच्या प्रमुख निर्यातीत सागरी उत्पादने, मसाले, दुग्धजन्य पदार्थ, तांदूळ, आयुष आणि हर्बल उत्पादने यांचा समावेश आहे. त्याच वेळी खाद्यतेल, साखर आणि ताज्या भाज्या आणि फळे देखील निर्यातीचा भाग आहेत. ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफचा भारतातील सीफूड उद्योगावर म्हणजेच सागरी उत्पादनांवर सर्वात जास्त परिणाम होईल असे मानले जाते.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी धमकी दिली आहे की, ते रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि ऊर्जा आयात करणाºया भारतावर टॅरिफ व्यतिरिक्त अतिरिक्त दंड लादू शकतात. सध्या ट्रम्प यांनी हा दंड किती असेल हे स्पष्ट केलेले नाही, परंतु भारतासाठी या दोन्ही क्षेत्रांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: