जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे नुकतेच दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सत्यपाल मलिक यांच्या वैयक्तिक सहकाºयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असण्याव्यतिरिक्त गोवा, बिहार, मेघालय आणि ओडिशाचे राज्यपालपद भूषवणारे सत्यपाल मलिक यांचे सोमवारी दुपारी १.१२ वाजता राम मनोहर लोहिया रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या सहकाºयांनी सांगितले की, ते बराच काळ रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये होते आणि विविध आजारांवर उपचार घेत होते. सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये याच दिवशी म्हणजेच ५ आॅगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले, नेमके याच दिवशी सत्यपाल मलिक यांचे निधन झाले हा निव्वळ योगायोग होता.
तसे पाहिले तर, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे अशा दुर्मीळ भारतीय राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी सत्तेच्या सर्वोच्च आसनांवर असतानाही सत्तेविरुद्ध बोलण्याचे धाडस दाखवले. त्यांचे जीवन आणि कारकीर्द भारतीय राजकारणाचा गुंतागुंतीचा थर उघड करते, जिथे वैचारिक बांधिलकी, विवेक आणि राजकीय दबाव एकमेकांशी भिडतात. सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास सामाजिक न्याय आणि शेतकरी राजकारणापासून सुरू झाला. ते १९७०च्या दशकात भारतीय क्रांती दलातून राजकारणात आले आणि नंतर जनता पक्ष, लोकदल, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शेवटी भारतीय जनता पक्ष (भाजप)मध्ये सामील झाले.
ते उत्तर प्रदेशचे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले. त्यांच्या कारकिर्दीवरून असे दिसून येते की, ते कोणत्याही एका विचारसरणीशी बांधलेले नव्हते, परंतु काळानुसार राजकीय संधी स्वीकारत राहिले- परंतु शेतकरी, भ्रष्टाचार आणि पारदर्शकता यांसारख्या काही प्रमुख मुद्द्यांवर त्यांची भूमिका तुलनेने स्थिर राहिली. याशिवाय सत्यपाल मलिक यांनी बिहार, जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालयाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. परंतु जम्मू आणि काश्मीरमधील त्यांचा कार्यकाळ सर्वात चर्चेत आणि वादग्रस्त होता. २०१८ मध्ये त्यांनी पीडीपी-काँग्रेस-एनसी युतीला राज्यात सरकार स्थापन करण्यास परवानगी देण्यास नकार दिला, ज्यामुळे राज्यपाल राजवट लागू झाली आणि नंतर जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा (कलम ३७०) काढून टाकण्यात आला. सत्यपाल मलिक यांनी नंतर या संपूर्ण घटनेवर एक विधान केले, ते म्हणाले की, ‘मला दिल्लीकडून युती थांबवण्याचे निर्देश मिळाले होते.’ त्यांनी कबूल केले की हा निर्णय घटनात्मक विवेकबुद्धीच्या आधारावर नाही तर राजकीय दबावाखाली घेण्यात आला होता.
राज्यपालपदावरून पायउतार झाल्यानंतर, सत्यपाल मलिक मोदी सरकारचे सर्वात स्पष्ट टीकाकार बनले. सत्यपाल मलिक वारंवार म्हणाले की, मोदी सरकारने शेतकºयांचा अपमान केला आणि जर सरकारने वेळीच ऐकले असते तर ७०० हून अधिक शेतकºयांचे प्राण वाचवता आले असते. पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी गंभीर दावा केला की, सीआरपीएफ जवानांना विमानाने हलविण्याची मागणी नाकारण्यात आली, ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने शहीद झाले. त्यांनी असाही आरोप केला की, ‘पीएमओ भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करतात’ आणि सत्य ऐकण्यासाठी जागा उरलेली नाही. मेघालयचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी एका मोठ्या निविदा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा आरोप आहे.
तथापि, सत्यपाल मलिक यांच्या शब्दांचे कौतुक होत असताना, त्यांच्या हेतूंवरही प्रश्न उपस्थित केले गेले. त्यांचे टीकाकार म्हणतात की, ते राज्यपाल म्हणून काम करताना गप्प राहिले आणि पद सोडताच ते बोलके झाले, जे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा दर्शवते. परंतु त्यांचे समर्थक त्यांना, ‘आतून तुटलेले पण खरे राष्ट्रवादी’ म्हणून पाहतात ज्याने अधिकाराच्या शक्तीला न घाबरता विवेकाचा आवाज उठवला.
गेल्या दहा वर्षांत या देशभरात राज्यपाल आणि राज्यकर्ते विशेषत: राज्य सरकार यांच्यात वाद निर्माण होत राहिले. त्यामध्ये सर्वात वादग्रस्त असे राज्यपाल म्हणूनच सत्यपाल मलिक यांची कारकीर्द असली, तरीही त्यांचे वेगळे असे व्यक्तिमत्त्व जपण्यात त्यांनी यश मिळवले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या पत्थ्यावर पडतील अशी वक्तव्ये करून सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. एरव्ही कधीही त्यांच्याबाबत मत व्यक्त करण्याची वेळ आलेली नसताना केवळ मोदींना विरोध करत आहेत म्हणून सकाळी रोज पत्रकार आणि कॅमेºयांपुढे बडबडणारे संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यांचा आधार घेऊन खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मलिक यांची अखेरच्या काळातील अवस्था ही माकडाच्या हातीत कोलीत देणारे व्यक्तिमत्त्व अशीच झाली होती. पण या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली आहे, त्यामुळे आता सर्व वादांवर पाणी पडले आहे.
प्रफुल्ल फडके/अन्वय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा