भारत आणि न्यूझीलंडमधील वाढत जाणारे संरक्षण संबंध केवळ द्विपक्षीय सहकार्याच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाहीत तर इंडो-पॅसिफिक प्रदेशातील उदयोन्मुख भूराजकीय आव्हानांच्या संदर्भात ते धोरणात्मकदृष्ट्याही अतिशय प्रासंगिक आहेत. आजच्या जागतिक व्यवस्थेत, सागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, सायबर धोके आणि बहुपक्षीय सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर भागीदारीचे महत्त्व सतत वाढत आहे. न्यूझीलंड भौगोलिकदृष्ट्या भारतापासून दूर असू शकते, परंतु दोन्ही देशांची सामायिक लोकशाही मूल्ये, मुक्त आणि नियमआधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची वचनबद्धता त्यांना नैसर्गिक धोरणात्मक भागीदार बनवते. आज जागतिक सत्ता संघर्षाचे केंद्र बनलेल्या इंडोपॅसिफिक प्रदेशात, भारताची भूमिका एक प्रमुख स्थिरीकरण घटक म्हणून उदयास येत आहे. त्याच वेळी, न्यूझीलंड त्याच्या शांततापूर्ण, सहकारी धोरणामुळे आणि सागरी सुरक्षेत सक्रियतेमुळे एक विश्वासार्ह भागीदार आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी दोन्ही देशांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.
आज भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला संरक्षण धोरणात्मक संवाद या वाढत्या धोरणात्मक सहकार्याचे स्पष्ट संकेत आहे. प्रशिक्षण, क्षमता निर्माण, सागरी माहिती सामायिकरण आणि बहुपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रातील संवादाने द्विपक्षीय संरक्षण संबंधांना नवीन चालना दिली आहे. म्हणूनच, असे म्हणता येईल की, भारत आणि न्यूझीलंडमधील संरक्षण सहकार्य केवळ धोरणात्मक भागीदारीपुरते मर्यादित नाही, तर ते प्रादेशिक स्थिरता, जागतिक सुसंवाद आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या दिशेने एक दूरदर्शी पाऊल आहे. भविष्यात, हे सहकार्य दोन्ही देशांसाठी धोरणात्मक संतुलन आणि जागतिक नेतृत्वाच्या संधींना आणखी बळकटी देऊ शकते.
खरे तर भारत-न्यूझीलंड संरक्षण धोरणात्मक संवादाची पहिली आवृत्ती ५ आॅगस्ट २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा उपक्रम होताच, परंतु इंडोपॅसिफिक प्रदेशातील उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांच्या संदर्भात नवीन धोरणात्मक समन्वयाची सुरुवातही मानली जाऊ शकते. भारताच्या संरक्षण मंत्रालयातील संयुक्त सचिव (आंतरराष्ट्रीय सहकार्य) अमिताभ प्रसाद आणि न्यूझीलंड संरक्षण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय शाखेच्या प्रमुख मिस कॅथलीन पियर्स यांनी या संवादाचे सहअध्यक्षत्व केले. चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीत सहकार्य वाढवणे, सागरी सुरक्षा आणि संरक्षण उद्योगात भागीदारी मजबूत करणे, बहुपक्षीय सहकार्याचे क्षेत्र वाढवणे, ग्लोबल कॉमन्सशी संबंधित मुद्द्यांवर (जसे की सागरी क्षेत्र, सायबरस्पेस इ.) सुसंगतता वाढवणे आणि व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंजद्वारे माहिती सामायिकरणाची प्रक्रिया अधिक मजबूत करणे यावर चर्चा केली.
याशिवाय, सीटीएफ-१५० (कम्बाइंड टास्क फोर्स-१५०)चे यशस्वीपणे नेतृत्व केल्याबद्दल भारताने न्यूझीलंडचे कौतुक केले, ज्यामध्ये पाच भारतीय नौदलाचे कर्मचारीही कर्मचारी म्हणून तैनात होते. ही वस्तुस्थिती दोन्ही देशांमधील परस्पर कार्यक्षमता आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मार्च २०२५ मध्ये दोन्ही देशांदरम्यान एक सामंजस्य करार झाला होता, ज्याअंतर्गतही संवाद स्थापित करण्यात आला होता. या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य औपचारिक आणि संस्थात्मक झाले आहे. खरे तर, हा संवाद केवळ द्विपक्षीय चर्चा नव्हता, तर इंडोपॅसिफिक प्रदेशात नवीन शक्ती संतुलन आणि सामायिक रणनीती तयार करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. भारत आणि न्यूझीलंड दोघेही लोकशाही मूल्यांवर, खुल्या समुद्री मार्गाची सुरक्षा आणि कायद्यावर आधारित जागतिक व्यवस्थेवर विश्वास ठेवतात.
या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की, राजनैतिक आणि संरक्षण सहकार्याबरोबरच, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा-. विशेषत: क्रिकेटद्वारे दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत. आॅगस्ट २०२४ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींची न्यूझीलंड भेट आणि मार्च २०२५ मध्ये दोन्ही पंतप्रधानांची बैठक यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवीन उंची मिळाली आहे. तरीही, भारत-न्यूझीलंड संरक्षण धोरणात्मक संवाद हे एक असे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, जो केवळ सुरक्षा सहकार्यापुरता मर्यादित नाही तर जागतिक नेतृत्व, प्रादेशिक स्थिरता आणि धोरणात्मक लवचिकतेसाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो. हा संवाद दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षा, लोकशाही मूल्ये आणि जागतिक जबाबदाºयांचे साक्षीदार आहे.
अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर एकीकडे चर्चा सुरू असताना जागतिक पातळीवर अन्य देशांशी सुधारत असलेले संबंध हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अमेरिका हा देश कधीही विश्वासार्ह नव्हता. तो फक्त स्वार्थापलीकडे कोणालाही सहकार्य करत नाही. संपूर्ण जगावर आपले अधिकार असावेत या हेतूने साम्राज्यवादाची भूमिका त्यांची कायम राहिली आहे. त्यामुळे सर्व छोट्यामोठ्या देशांवर दबाव टाकण्याचे तंत्र त्यांनी कायमच आखले आहे. तो कुणाचाही कायमचा मित्र होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भारत संपूर्ण जगातील विविध देशांशी आपले संबंध दृढ करत आहे ही जमेची बाजू आहे. त्यादृष्टीने वैचारिकदृष्ट्या प्रबळ अशा न्यूझीलंडबरोबर वाढत चाललेला स्नेहसंबंधांचा हा सिलसिला नक्कीच आशादायी आहे. हेकोणतेही देश अमेरिकेचे समर्थन करणारे नाहीत. कारण अमेरिकेचा दुटप्पीपणा सर्वाना माहिती आहे. अन्य कोणत्याही देशाचे वर्चस्व सहन न होणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. नेतृत्व कोणतेही असले तरी त्यांची वृत्ती एकच राहते. अशा वेळी जगभरात भारताचे विविध मित्र तयार होणे हे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा