खरे तर हा विषय न संपणाराच आहे. पण सोमवार, मंगळवारच्या ३२ तासांच्या चर्चेत विरोधकांनी आॅपरेशन सिंदूरवरून जे प्रश्न उपस्थित केले, त्यातून त्यांचा पोरकटपणा दिसून आला. परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता आपण काय भाषा वापरतो आहे याचे भान विरोधकांना राहिलेले नाही हे केवळ या देशाने नाही तर जगाने पाहिले. त्यामुळे यातून उथळ वक्तव्ये करणाºया विरोधकांचीच नाचक्की झाली. कारण अशा अभ्यास न करता बोलणाºया विरोधकांना का संधी द्यायची असा विचार आज मतदार करत आहे, हे या चर्चेतले खरे वास्तव आहे.
खरे तर काँग्रेसने यापूर्वीही केंद्र सरकारकडे आॅपरेशन सिंदूरदरम्यान किती भारतीय विमाने पाडण्यात आली हे स्पष्ट करण्याची मागणी केली होती. पण उत्तर देताना पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने आतापर्यंत या प्रश्नाचे कोणतेही थेट उत्तर दिलेले नाही. लोकसभेत या मुद्द्यावर उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याचे कौतुक केले आणि म्हणाले की, काही विरोधी सदस्य किती विमाने पाडण्यात आली असे विचारत आहेत. मला वाटते की, हा प्रश्न आपल्या राष्ट्रीय भावनेला अनुरूप नाही. कारण त्यांनी किती शत्रूची विमाने पाडण्यात आली हे विचारले नाही. हे उत्तर बिनचूक होते. अमर अकबर अँथनी या चित्रपटात विनोद खन्नाकडून मार खाल्यानंतर कस्टडीतील अमिताभ विनोद खन्नाला विचारतो की , मैने दोही मारे लेकीन सॉलीड मारे ना? याचा अर्थ अमिताभची भूमिका बरोबर आहे असे होत नाही. जो स्मगलर रॉबर्टला सहाय्य करत आहे त्याचे कौतुक कसे करता येईल? आज विरोधक तिच चूक करत आहेत. त्यांना पाकिस्तानचा पुळका आला आहे, यासारखे दुर्दैव कोणते? आपण भारतातील विरोधी पक्ष आहोत की पाकिस्तानचे प्रतिनिधी हे अजून विरोधकांनी स्पष्ट केलेले नाही.
विरोधी पक्ष सरकारकडून हे देखील जाणून घेऊ इच्छितो की, भारतापेक्षा पाकिस्तानसोबत जास्त देश का आहेत? कारण भारत-पाक संघर्षादरम्यान तुर्की, अझरबैजान आणि चीनने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर फक्त इस्रायल भारताच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. रशियानेही उघडपणे भारताला पाठिंबा दिला नाही. या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, जगातील कोणत्याही देशाने भारताला त्याच्या सुरक्षेत कारवाई करण्यापासून रोखलेले नाही. संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ देश आहेत आणि आॅपरेशन सिंदूरदरम्यान फक्त तीन देशांनी पाकिस्तानच्या समर्थनात निवेदन दिले. क्वाड, ब्रिक्स, फ्रान्स, रशिया आणि जर्मनी... कोणत्याही देशाचे नाव घ्या, भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला. यात सगळे आले आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा भारत युक्रेनविरुद्ध रशियाला उघडपणे पाठिंबा देणार नाही, तर रशियाने पूर्वीप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध भारताला उघडपणे पाठिंबा देण्याची अपेक्षा का करावी! अशाच काही गोष्टी इतर देशांनाही लागू होतात. या प्रकरणात इस्रायल अपवाद आहे, कारण तो भारतासारख्या इस्लामिक कट्टरतावादाशी देखील झुंजत आहे. म्हणूनच त्याने कोणत्याही अटीशिवाय भारताला पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत संबंधित प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले की, परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, सर्व देशांनी दहशतवादाचा निषेध केला आहे, हे अगदी बरोबर आहे. परंतु त्यांनी हे सांगितले नाही की, पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जग पाकिस्तानची बाजू घेत आहे. त्यांनी पुढे जोर देऊन म्हटले की, जेव्हा यूपीए सरकार सत्तेत होते, तेव्हा जगातील विविध देश दहशतवादाबद्दल पाकिस्तानवर टीका करत असत. पहलगाम हल्ल्यामागे असलेली व्यक्ती- जनरल मुनीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत जेवण करत आहेत. आपले पंतप्रधान तिथे जाऊ शकत नाहीत, परंतु जनरल मुनीर जेवण करत आहेत. या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक देश आपले हित लक्षात घेऊन भारताला पाठिंबा देईल, कारण त्यांना जागतिक व्यवस्थेचाही विचार करावा लागेल. अनेक देशांनी भारताचा निषेध केलेला नाही. याला भारताचा पाठिंबा म्हणून पाहिले पाहिजे. ही एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय प्रश्न असा आहे की, भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहे? हे योग्य आहे का? उत्तर असेल अजिबात नाही. हे ताबडतोब थांबवले पाहिजे. ‘आॅपरेशन सिंदूर’ या विषयावर संसदेत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न उपस्थित केला की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती, तर १४ सप्टेंबर रोजी आशिया कप क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कसा खेळेल? ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानशी व्यापार बंद आहे. तिथून विमाने येथे येऊ शकत नाहीत. जहाजे जलक्षेत्रात येऊ शकत नाहीत. तुमचा विवेक का जिवंत नाही? कोणत्या परिस्थितीत तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळाल? भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) अलीकडेच आशिया कप २०२५चे वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर आणखी दोन सामनेदेखील खेळले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, ज्वलंत प्रश्न असा आहे की, जेव्हा आपण राजनैतिक संबंध निलंबित केले आहेत, तेव्हा आपण क्रिकेट सामना का खेळत आहोत? जेव्हा भारत म्हणतो की व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालणार नाहीत, व्यापार आणि चर्चा एकत्र चालणार नाहीत, रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही, तर खेळ आणि रक्त एकत्र कसे चालेल? त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीत भारताने खेळता कामा नये. किक्रेटचे दीर्घकाळ सूत्र हाती घेणारे, बीसीसीआय, आयसीसीआयचे पद भूषवणारे शरद पवार यांनी याबाबत बोलणे अपेक्षित होते ते का यावर काही बोलले नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. बीसीसीआय ही स्वतंत्र संघटना आहे ती देशाच्या सरकारच्या माध्यमातून चालवली जात नाही, पण शरद पवार यांनी याबाबत पाकिस्ताशी सामने खेळू नयेत असे सुचवणे अपेक्षित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
प्रफुल्ल फडके/अन्वय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा