सोमवार, १४ जुलै, २०२५

ओळख लपवण्याचे कारण काय?



महाराष्ट्रातील हिंदू महिने आणि उत्तर भारतातील कालदर्शिका यात फरक आहे. आपल्याकडे श्रावण महिना २५ जुलैला सुरू होणार असला तरी भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण उत्तरेत ११ जुलैपासून सुरू झाला आहे. श्रावण किंवा सावन सुरू होताच कांवर (कावड) यात्रा सुरू होते. कावड यात्रेत शिवभक्त हातात कावड घेऊन अनवाणी पायांनी लांबचा प्रवास करतात आणि शिवलिंग किंवा ज्योतिर्लिंगाजवळ जातात आणि पवित्र नद्यांच्या पाण्याने त्यांना अभिषेक करतात.


उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात कावड यात्रा काढण्याची परंपरा आहे. कावड यात्रेचे मोठे स्वरूप पश्चिम उत्तर प्रदेशात दिसून येते. हरिद्वारहून कावडला घेऊन जाणारे कावड यात्रेकरू या मार्गाने जातात. या मार्गावर भगवान शिवाची अनेक मोठी प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत. येथे भाविक भगवानांचा जलाभिषेक करतात. भाविक या मार्गावरून गंगाजल घेऊन मुझफ्फरनगर, शामली, मेरठ ते गाझियाबाद, हापूर अशा शिवमंदिरांमध्ये कावड यात्रा काढतात. परंतु कावड यात्रा सुरू होण्यापूर्वीच पश्चिम उत्तर प्रदेशातील कावड यात्रा मार्गावर तणाव वाढला आहे.

खरे तर, मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बाघरा गावातील योग साधना आश्रमाचे संचालक आणि सनातन धर्माचे उपदेशक स्वामी यशवीर महाराज गेल्या काही वर्षांपासून कावड मार्गावरील दुकाने आणि ढाब्यांवर नावाच्या पाट्या लावण्याची मागणी करत आहेत. ते म्हणतात की, कावड मार्गावरील काही लोक हिंदू देवतांच्या नावाने ढाबे आणि दुकाने चालवून शिवभक्तांची फसवणूक करत आहेत. गेल्या वर्षी ओळख लपवून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने आदेश जारी केले की, कावड यात्रेच्या मार्गावरील ढाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकानदार, फेरीवाले यांनी स्पष्ट नावाचे फलक लावावेत. सरकारचा हेतू असा आहे की, कांवरीयांच्या श्रद्धा आणि भक्तीला बाधा येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती. तथापि, या वर्षीही उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे आदेश जारी केले आहेत.


ताजी घटना अशी आहे की, स्वामी यशवीर महाराज आणि हिंदूवादी संघटनेचे कार्यकर्ते दिल्ली-दून महामार्गावर कावड मार्गावरील पंडित वैष्णो ढाब्यावर पोहोचले. खरे तर, हा ढाबा एका मुस्लिमाचा होता, परंतु बोर्डवर लिहिले होते- ‘पंडित का शुद्ध वैष्णो ढाबा.’ म्हणजेच ओळख लपवण्याचा गुन्हा करण्यात आला. पंडित वैष्णो ढाबा हा सनवर नावाचा एक मुस्लीम माणूस चालवतो. त्याचा मुलगा आदिल आणि जुबैरसह इतर दोन लोकही या ढाब्यात काम करतात. असे म्हटले जात आहे की, यशवीर महाराज आणि इतरांनी ढाब्याच्या मालक आणि कर्मचाºयांना त्यांची धार्मिक ओळख तपासण्यासाठी त्यांची पँट काढायला लावली. येथूनच वाद निर्माण झाला. आगीत तेल ओतत समाजवादी पक्षाचे माजी खासदार एसटी हसन यांनी या मुद्द्याचा संबंध पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी जोडला. हसन म्हणाले की, मला विचारायचे आहे की, सामान्य नागरिकांना दुकानदाराची पँट काढायला लावून त्याची पँट तपासण्याचा अधिकार आहे का? पहलगाममधील दहशतवाद्यांनी त्याला पँट काढायला लावले नव्हते का? हे करणाºयांमध्ये आणि पहलगाममधील दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे?

ही घटना त्या ढाब्यावर घडली की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटनेला ‘सांप्रदायिक वळण’ देण्यात आले. पहलगाम हे सुनियोजित दहशतवादी कृत्य होते. या दोन्ही घटनांची तुलना करणे केवळ तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे नाही तर धार्मिक आधारावर समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि लपण्याचा किंवा फसवण्याचा प्रश्न आहे तर हा व्यवसाय बºयाच काळापासून सुरू आहे. जुलै २०२१ मध्ये गाझियाबादमध्ये असे दोन मुस्लीम दुकानदार आढळले, जे हिंदू नावांनी दुकाने चालवत होते. यापैकी एक दुकान जुन्या भाजी बाजारात आहे, ज्याचे नाव ‘न्यू अग्रवाल पनीर भंडार’ आहे. या दुकानाचे मालक मंजूर अली आहेत. दुसºया दुकानाचे नाव ‘लालाजी पनीर भंडार’ आहे. त्याचे मालक ताहिर हुसेन आहेत. दोघांनीही सांगितले की, हिंदू नाव ठेवून ग्राहक कमी चौकशी करतात आणि व्यवसाय चांगला चालतो. म्हणजेच ते व्यवसायासाठी हिंदूंची फसवणूक करत होते. काही लोकांना त्यांचा जीएसटी क्रमांक त्यांच्या खºया नावासोबत असल्याचे कळताच त्यांचे रहस्य उघड झाले. स्थानिक दुकानदारांनी त्यांना विरोध केला, तेव्हा या लोकांनी त्यांच्या दुकानांची नावे बदलली.


गेल्या वर्षी कावड यात्रेदरम्यान नावाच्या पाट्या लावण्याचे आदेश देण्यात आले, तेव्हा बराच गोंधळ उडाला होता. त्यावेळी सोशल मीडियापासून ते वर्तमानपत्रांपर्यंत आणि वृत्तवाहिन्यांपर्यंत बरीच चर्चा झाली होती की, एका आदेशामुळे मुझफ्फरनगरचे ‘संगम शुद्ध व्हेजिटेरियन हॉटेल’ रातोरात ‘सलीम ढाबा’ कसे झाले. ‘माँ भवानी ज्यूस कॉर्नर’चे नाव ‘फहीम ज्यूस सेंटर’ असे ठेवण्यात आले. ‘टी पॉइंट’चे नाव ‘अहमद टी स्टॉल’ असे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे ‘नीलम स्वीट्स’चे मालक मोहम्मद फजल अहमद होते. ‘अनमोल कोल्ड ड्रिंक्स’ याचे मोहम्मद कमर आलम मालक आहेत. खतौली येथील ‘चीतल ग्रँड’च्या बाहेर एक बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर लिहिले आहे- शारिक राणा संचालक. सहारनपूरमध्ये चालणारा ‘जनता वैष्णो ढाबा’ मोहम्मद अनस सिद्दिकी यांच्या मालकीचा आहे. मुझफ्फरनगरमधील बझेरी गावातील रहिवासी वसीम अहमद यांनी गेल्या वर्षी त्यांची ओळख उघड झाल्यानंतर त्यांचा ‘गणपती’ ढाबा विकला.

एका वृत्तानुसार, देहरादून-नैनीताल महामार्गावर २० हून अधिक ढाबे आहेत, ज्यांची नावे हिंदू देव-देवतांच्या नावावर आहेत, परंतु त्यांचे मालक मुस्लीम आहेत. हरिद्वार नजीबाबाद रोडवर चिदियापूर आणि समीरपूर गँग कॅनाल रोडवर हिंदू नावाचे ढाबेदेखील आहेत, ज्यांचे मालक मुस्लीम आहेत. मेरठ, गजरौला, गढमुक्तेश्वर, मुंड येथे अनेक ढाबे आहेत. ए पांडे हायवेवर असे डझनभर ढाबे सुरू आहेत ज्यांचे मालक मुस्लीम आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, फसवणूक करण्यासाठी हे लोक हॉटेलमध्ये हिंदू देव-देवतांचे फोटो देखील ठेवतात, जेणेकरून हिंदू प्रवाशांना असे वाटेल की, ते हिंदू हॉटेलमध्ये जेवत आहेत. पण जेव्हा एखादा ग्राहक आॅनलाइन पैसे भरतो, तेव्हा मालक मुस्लीम असल्याचे उघड होते. या ढाब्यात आणि हॉटेलमध्ये काम करणाºया लोकांची नावे राजू, विकी, गुड्डू, सोनू अशी आहेत. हे लोक तिलक लावतात आणि कलावा बांधतात. जर ही फसवणूक नाही तर ते काय आहे? मुझफ्फरनगरमधील पंडित वैष्णो ढाब्यात काम करणाºया तजामुलने स्वत:ची ओळख गोपाळ अशी करून दिली होती. हरिद्वारमधील गुप्ता चाट भंडार येथे गुलफाम नावाच्या खात्यात स्कॅनरवरून पैसे जाण्याचे प्रकरण अलीकडेच समोर आले आहे.

इथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ओळख लपवून व्यवसाय करण्यामागे काही सक्ती किंवा कट आहे का? मुस्लीम व्यक्तीला त्याच्या नावाने दुकान किंवा ढाबा उघडण्यात काय अडचण आहे? जर लोक त्यांच्या धर्मानुसार नावे लिहून दुकाने उघडतील किंवा व्यवसाय करतील, तर ग्राहक स्वत:च्या मर्जीने दुकानात जाईल आणि ज्याला कुठून काही खरेदी करायचे असेल, तो तिथून खरेदी करेल. परंतु ओळख लपवून व्यवसाय करणे किंवा इतर कोणतेही काम करणे हे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि गुन्हा आहे. अन्न सुरक्षा कायदा २००६ मध्ये स्पष्ट तरतूद आहे की, अन्न दुकानदारांना त्यांचा अन्न परवाना अशा ठिकाणी लावावा लागेल जिथे तो सहज दिसून येईल.


तरीही, हा मुद्दा हिंदू-मुस्लीम, धार्मिक भेदभाव किंवा कोणाच्याही उपजीविकेपेक्षा थेट ग्राहकांच्या भावना आणि अधिकारांशी संबंधित आहे. हरिद्वारहून गंगाजल घेऊन त्यांच्या गंतव्यस्थानावर जाणाºया लाखो कावड्या, वाटेत त्यांना कोणत्या प्रकारचे अन्न मिळावे? त्यांनी कोणत्या प्रकारचे अन्न खावे? हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. जेव्हा एखादा मुस्लीम हलाल प्रमाणपत्र तपासल्यानंतरच वस्तू खरेदी करतो, तर मग हिंदू असे का करू शकत नाही? म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की, ओळख लपवण्याचे नेमके कारण काय?

प्रफुल्ल फडके/अन्वय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: