माणसाच्या जीवनात आलेली अनिश्चितता आणि नैसर्गिक परिस्थिती, नैसर्गिक संकटे, दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारी जी तात्त्विक भूमिका लागते, ती तयार करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. विशेष म्हणजे शेतकºयांबरोबरच गाववाड्यातल्या बलुतेदारांचाही या संप्रदायाची भूमिका ठरवण्यात मोठा वाटा होता. कारण खºया अर्थाने ज्ञानेश्वरी अर्थात भगवतगीतेचा अर्थ या वारकºयांना समजलेला असतो. त्यामुळेच संकटांशी सामना करण्याची ताकद त्यांच्यात असते. महाराष्ट्रात लाखो शेतकºयांनी गेल्या दहा- वीस वर्षांत आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या करणाºयांमध्ये वारकरी संप्रदायातील शेतकरी नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. ही खरी श्रद्धा आहे.
पावसाची अनिश्चितता आणि त्यामागची तात्त्विक भूमिका म्हणजे दैववाद नव्हता. शहरी माणसांना हेच समजले नाही. कारण शहरी जीवनात अडकलेल्या या वर्गाला त्याचा पूर्ण अंदाज नव्हता. वेळ नसणारे लोक पंढरीच्या वारीला जातात, असाच समज त्यांच्यात रूढ झाला होता. वास्तविक ‘मढे झाकुनिया करती पेरणी’ हा तुकोबांचा अभंग वाचला तरी या वारकºयांना वेळेचे किती महत्त्व होते, हे आपोआपच कळेल. वेळेचा अपव्यय समजणाºया वर्गातले हेच लोक आयपीएलसारखे किंवा कोणतेही क्रिकेट सामने तासन्तास बघत राहतात. पण वारीने माणसांचे मनोबल वाढवण्याचे फार मोठे काम केले आहे. तसे आयपीएलसारख्या जुगारी खेळांनी केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
जगण्यातल्या अनिश्चितेबाबतची वारकºयांची भूमिका हा दैववाद नाही. ती अंधश्रद्धाही नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेली ती एक तात्त्विक जीवनसृष्टी आहे. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ या तुकोबांच्या अंभगाचा अर्थच ही भूमिका अधिक स्पष्ट करतो. एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला, तर व्यवसाय सोडायचा नाही, आशा सोडायची नाही हाच विचार त्यातून दिला जातो. आज नोकरी अथवा व्यवसायात अपयशाने वैफल्यावस्था प्राप्त झालेले दारूच्या आहारी जातात, तेव्हा त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. पण शेतकरी वारकरी हा संकटांशी सामना करतानाही व्यसनांच्या आहारी जात नाही, कारण माऊली आणि पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर आहे हा विश्वास फार महत्त्वाचा असतो.
गेल्या दोन-तीन दशकांत विशेषत: जागतिकीकरणानंतर आधुनिक काळात औद्योगिकीकरणाचा आणि शहरीकरणाचा अन्य संस्कृतीवर परिणाम झाला आहे. गाववाडा पद्धतही बदलून गेली आहे. असे असले तरीही हा पारंपरिक संप्रदाय लोकांच्या मनात टिकून राहिला. तो अधिक ग्लोबल होत चालला हे फार मोठे यश आहे. हा संप्रदाय आता कुळाचाराच्या स्वरूपात, जो आजही स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, गावातला सुतार आज दुसरीकडे सुतारकी करत असला तरीही तो वारी न चुकता करतो. वारीची रचना ही शेती आणि शेतकºयांची सोय डोळ्यांपुढे ठेवून करण्यात आली आहे. आषाढ शुद्ध एकादशी किंवा कार्तिक शुद्ध एकादशीच्या वाºयांपैकी किमान आषाढीची वारी आचारधर्म म्हणून बहुतेक जण पाळताना दिसतात.
मुळात वारीचा हंगामच असा पकडला आहे की, पहिला पाऊस पडून गेला आहे. पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तुलनेने शेतकरी तेव्हा मोकळा असून शेतीचे काम त्याला नसते. याच काळात हे लोक पंढरपुरात पोहोचतात. असे म्हणतात की, पंधरा दिवसांत माझ्या शेताचे काय झाले असेल असा विचार जर वारकºयांच्या मनात आला तर तो विठोबा सांगतो की, ही एवढी मोठी झाली असतील तुझी शेतातील पिके. म्हणजे विठोबाच्या कमरेवरचे हात हे जणू याचीच साक्ष देतात असा आभास वारकºयांना होत असतो. म्हणून विठोबाच्या विश्वासावर ही पिके सोपवून शेतकरी वारीला येत असतो. त्याचे फळ त्यांना निश्िचत मिळते. यातून सामूहिक, सहजीवन आणि सहकार्य या लौकिक जीवनातल्या गोष्टी शेतकरी परमार्थातही आणू शकत. म्हणूनच पंढरपूरला एकट्याने न जाता समूहाने जायचे, असा दंडक पडला.
पूर्वी प्रत्येक गावाच्या स्वतंत्र दिंड्या निघत असत. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या काळात पालखी नव्हती. तेव्हा हे लोक स्वयंत्स्फूर्तीने दिंडीत टाळ-मृदंग वाजवत, गात-नाचत पंढरपूरला जात. पालखीची पद्धत ही सतराव्या शतकाच्या शेवटी सुरू झाली. तुकोबांचे धाकटे चिरंजीव नारायणबाबा यांनी ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पादुका एकाच पालखीत नेऊन पालखीची प्रथा सुरू केली. त्यानंतर शंभर वर्षांनी ज्ञानेश्वरांची पालखी वेगळी निघू लागली. सर्व संतांच्या शिकवणीमध्ये शेतीचे उल्लेख आणि वर्णने केलेली आढळतील. महाराष्ट्राला तेराव्या शतकातला शेतकरी शेती कशी करायचा, हे जाणून घ्यायचे उत्तम साधन म्हणजे ज्ञानेश्वरीतील तेरावा अध्याय. यात शेतीसाठी जमीन तयार करण्यापासून ते शेवटी पिके काढून बलुतेदारांना वारीपर्यंतची साद्यंत वर्णने वाचायला मिळतील. म्हणजे ही वारी, हा वारकरी संप्रदाय आपल्या जीवनाचा किती अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले पाहिजे.
प्रफुल्ल फडके/पाऊले चालती
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा