मंगळवार, ८ जुलै, २०२५

महाराष्ट्र बंद नको, खरेदी सेवा बंद करा


आज गुजराती आणि परप्रांतीय महाराष्ट्रात मराठी बोलण्यावरून आणि परप्रांतीयांच्या दादागिरीवरून महाराष्ट्रात वातावरण जरा गरम आहे. यात काही पक्ष राजकारण करत असले, तरी यावर मोर्चा आणि महाराष्ट्र बंद, मुंबई बंद हा कधीच उपाय होऊ शकत नाही. या परप्रांतीयांना वठणीवर आणायचे असेल, तर सर्वात प्रथम त्यांच्याकडून खरेदी करणे आणि त्यांच्याकडून सेवा घेणे बंद केले पाहिजे हाच त्यावर एकमेव उपाय आहे.


खरेच आपण यावर विचार केला पाहिजे. आता आम्हाला महिन्याचा किराणा माल भरायचा आहे. पण एक तरी मराठी माणसाचे किराणा मालाचे दुकान आम्ही शिल्लक ठेवले आहे का? त्यामुळे खरेदी बंद केली तर होणार काय? यासाठी आम्ही आॅनलाइन खरेदी करू शकतो. सगळा किराणा माल, वाणसामान आपण आॅनलाइन खरेदी करू शकतो. पण ते मार्केटही जीओमार्ट अंबानींचे आहे. बिग बास्केट टाटांचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी करणे हे अपरिहार्य असणार आहे. तरीपण स्थानिक व्यापारी जर मराठी बोलत नसतील तर त्यांची मस्ती जिरवण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे.

मुंबईत मराठी माणसांच्या जागा होत्या, दुकाने होती त्या जागा, ती दुकाने आम्हीच परप्रांतीयांना विकल्या आहेत. मग आता बोंबलून काय उपयोग? एकही महाराष्ट्रीयन बिल्डर डेव्हलपर तयार झाला नाही आमच्या जागा विकसित करायला. आमचे डी. एस. कुलकर्णी यांच्यासारखे विकासक असतील तर ते तुरुंगात जातात, ते का गेले? त्यांच्या पाठीशी कोणी का उभे राहिले नाही याचाही विचार आपण केला पाहिजे. ही परप्रांतीयांची मुजोरी आहे की आमचा मूर्खपणा आहे याचा विचार केला पाहिजे.


आज मुंबईत विरार-वसई, मीरा-भार्इंदर लोकलने चर्चगेटला यायचे आणि जायचे म्हटले तर हे गुजराती, मारवाडी लोक डब्यांमध्ये जागा अडवून बसलेले असतात. मांडीवर सुटकेस टाकून पत्ते खेळत असतात. त्या जागी दुसरा कोणी बसला तर त्याला उठवले जाते. उठला नाही तर दादागिरी करतात. याकडे कोणत्याच मराठीचा पुळका असलेल्या पक्षाचे आजवर लक्ष गेलेले नाही. पण लोकलमधून पत्ते खेळणाºया आणि शेअर मार्केटवर चर्चा करत येणाºया या मुजोरांनाही लोकल तुमच्या बापाची नाही हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे.

मुंबईतल्या माणसाचे सगळे जीवनच परप्रांतीयांवर अवलंबून आहे. हे परप्रांतीय आम्हीच घुसवले आहेत. म्हणून तर या दुबेंसारख्या खासदाराची चरबी वाढते. आज आम्ही आमच्या हातात काय ठेवले आहे? संजय राऊत यांनी रोज सकाळी येऊन १०६ हुतात्मे आम्ही दिले आहेत हे सांगून काय उपयोग आहे? हुतात्मे गमावले त्यापेक्षा आम्ही आमचे व्यवसाय, रोजगार आणि मराठीपण गमावले याचा शोक करण्याची वेळ आलेली आहे. सगळी मुंबई परप्रांतीयांच्या ताब्यात जात असताना मुंबईत सत्ता कोणाची होती? मुंबईचे रखवाले म्हणून कोण मिरवत होते आणि आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर ओरडून काय उपयोग आहे?


सकाळी उठल्यावर पूर्वी आपण बाटलीची लाईन धरत होतो दुधाची, आरेचे दूध घेत होतो. आता सगळे यूपीचे भय्ये नाहीतर गुजराती दुधवाले आहेत. आमचा मराठी गवळी गेला कुठे? गवळी फक्त नावापुरते राहिले आणि काही अरुण गवळी झाले, मग दूध त्यांच्याशिवाय घेणार कुणाकडून? एकूण एक सलून आणि पार्लर यूपी, बिहारच्या लोकांची आहेत. बांधकाम कामगार, फर्निचर बनवणारे, सुवर्णकारागीर, केमिस्ट, भाजीवाले, किराणावाले, कापड व्यापारी सगळेच परप्रांतीय. मग आमचे व्यावसायिक गेले कुठे? मूर्तिकारही गुजराथी आहेत. आमचा नाभिक धंदा करत नाही. आमचा चर्मकार उपलब्ध नाही, त्यामुळे बाटाशिवाय आणि परप्रांतीयांशिवाय पर्याय नाही. आमचा सुवर्णकार नाही, तोही गुजरातीच. काय शिल्लक आहे आमच्या हातात? सगळे धंदे त्यांच्या घशात घालत असताना आमचे नेते, मराठीचे प्रेमी पक्ष, संघटना झोपले होते आणि आता गळा काढत आहेत.

यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे त्यांच्याकडून खरेदी बंद करा. त्यांच्या सेवा घेणे बंद करा. आमच्या गोशाळा, डेअरी उभ्या करून दूध विकायला मराठी तरुणांना प्रवृत्त करा. मराठी माणसांची वाणसामानाची दुकाने असली पाहिजेत. कापड व्यापारी मराठी निर्माण करा. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसांनी आपले स्थान निर्माण केले पाहिजे. किती दिवस आम्ही ग्राहक राहणार आहोत? मोर्चा आणि बंद हा त्यावर उपाय नाही, तर त्यांच्याकडून खरेदी करणे बंद करा. त्यांच्या सेवा घेणे बंद करा तरच ही मुजोरी थांबेल.


महाराष्ट्रातील कोणत्याही व्यवसायात ४० टक्के भाग हा मराठी लोकांचा असला पाहिजे. आज प्रत्येक बाजारसमितीत एपीएमसीमध्ये सगळे गुजराती, बिहारी आणि अन्य परप्रांतीय आहेत. आमचे मराठी लोक फक्त माथाडी कामगार. ओझी वाहणार हमाल आहेत. या हमालांच्या जीवावर अनेकजण आमदार झाले, नेते झाले पण मराठी माणसांसाठी कोणी पुढाकार घेतला नाही. प्रत्येक बाजारसमितीत काही भाग, काही गाळे ठराविक अंतर ठेवून मराठी माणसांचे असले पाहिजेत. मराठी माणसांकडे खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. वाहन, टॅक्सी, कॅब यामध्येही आता परप्रांतीयांना परमिट देणे बंद केले पाहिजे आणि फक्त मराठी रोजगाराला प्रोत्साहन दिले तरच हा प्रश्न सुटेल. गुजराती, मारवाडी आणि परप्रांतीयांकडून सेवा घेणे, त्यांच्याकडून खरेदी न करणे हाच उपाय आहे, मोर्चाने प्रश्न कधीच सुटणार नाही, त्यासाठी कृती हवी.

प्रफुल्ल फडके/अन्वय



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: