सोमवार, ३० जून, २०२५

परिवर्तनाची वारी



‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम, ग्यानबा-तुकाराम’चा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोप‍ºयातून निघालेल्या दिंड्या आता सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. लवकरच त्या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहोचतील. अष्टमी ते अष्टमी या पंधरा दिवसांत पंढरपुराच्या दरवाजात वारकरी दाखल होत आहेत. ऊन-वारा अंगावर झेलत पांडुरंगाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला वारकरी आता त्या सावळ्या रूपाशी एकरूप होण्याच्या ओढीने झपाझप पावले टाकत आहेत. ‘भेटीलागी जीवा, लागलीसे आस’ या ओळीचा शब्दश: आनंद आता वारकरी घेत आहेत, त्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा आता मोठ्या प्रमाणात समाजजागृतीचे व्यासपीठ ठरू लागले आहे. पंधरा वीस दिवसांच्या प्रवासात महाराष्ट्राच्या कानाकोप‍ºयातील लाखो भाविक सहभागी होतात. यानिमित्ताने अनेक संस्था समाजातील वेगवेगळ्या अनिष्ट गोष्टींबाबत जागृती करण्यासोबतच व्यसनमुक्तीचा प्रचारही करताना दिसतात. या वारीत अनेक वारकरी हे केवळ समाजजागृतीसाठी आणि अंधश्रद्धेवर हल्ला करण्यासाठी येत असतात. हे समाजभान फार महत्त्वाचे असते.


संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा॥

जावे पंढरीशी आवडी मनाशी । कधी एकादशी आषाढी ये॥


अशा आर्त भावनेने वाटचाल करणारी लाखो पावले आता पंढरपूरच्या वेशीवर येऊन ठेपतील. प्रत्येकाच्या मनात विठ्ठल भेटीची ओढ लागलेली आहे. परंतु प्रत्येकाचे या पंधरा वीस दिवसांत परिवर्तनही घडलेले आहे. त्याच्यात जणू काही परकाया प्रवेश झाला आहे इतके अमूलाग्र बदल त्याच्यात जाणवतात. हा वारीचा महिमा आहे.

डोळे भरोनिया पाहीन तुझे मुख। हेचि मज सुख देई देवा॥ अशी हृदयापासून साद आता घातली जात आहे. खरोखरच त्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर डोळ्यातून येणारे आनंदाश्रू, ते भरून येणे हे फार दुर्मीळ असते. डोळ्यातून येणारे ते पाणी म्हणजे साक्षात माऊलींना घातलेला गंगेच्या पाण्याने अभिषेक असतो. ऊन-वाºयाची तमा न बाळगता या दिंडीत चालताना प्रत्येक क्षण एक वेगळी ऊर्मी देऊन जातो. कोणत्याही अपेक्षेविना इतक्या आर्त भावनेने केवळ आपल्या दैवताच्या दर्शनासाठी निघालेला भोळ्या भाविकांचा मेळावा हा जणू जगात एकमेव असतो.


वारीच्या या प्रवासात येणा‍ºया अनेक अडचणी, गैरसोयी, समस्या यांची तीळमात्र तमा न बाळगता ही वाटचाल होतच राहते. एकाच वेळी एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमत असल्याने काही सामाजिक संस्थांनी गेल्या काही दिवसांपासून वारीचा समाज जागृतीचे व्यासपीठ म्हणूनही उपयोग सुरू केला आहे. वारकºयांमध्ये बहुतेक लोक हे माळकरी असतात. माळकरी अभक्ष्य भक्षण (मांस-मच्छी) आणि अपेयपान (दारू) करीत नाहीत. मात्र यातील बहुतेक जण शेतकरी आणि कष्टकरी असल्याने त्यांना तंबाखू आणि विडीसारखी व्यसने मात्र असतात. कळत-नकळतपणे या दोन्ही व्यसनांचा त्यांच्या शरीरावर आणि संसारावर परिणाम होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व व्यसनांपासून मुक्तीसाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त संघाच्या वतीने दिंडीत समाज जागृती केली जाते. पंढरपूरची वारी हे सर्व दोष दूर करणारे माध्यम आहे हे वारंवार सांगितले ते यासाठीच. सर्व पापापासून मुक्त करणारी आहे हे सांगितले ते यासाठीच. म्हणजे दारू, गांजा, अफीम, गर्द या व्यसनांपासून ते तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट यांच्या सेवनाने होणा‍ºया दुष्परिणामांबाबत या वारीत जागृती केली जाते. अशी व्यसने म्हणजेच पापकर्म आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या व्यसनांपासून होणा‍ºया रोगांच्या परिणामाचे प्रदर्शन भरवले जाते. त्याशिवाय दिंडीच्या वाटेवर एका ट्रकमध्ये अखंड पथनाट्य सुरू असते. व्यसनाचा राक्षस कसा समाजाला गिळंकृत करतोय, ते या पथनाट्यातून दाखवले जाते.

त्याचप्रमाणे पर्यावरण ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची समस्या होऊ पाहत आहे. पर्यावरण जागृतीबाबत अनेक संस्थांच्या माध्यमातून जागृती केली जाते. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे तर गेल्या कित्येक वर्षांपासून पालखी सोहळ्यात पर्यावरणाची दिंडी काढतात. त्याशिवाय भारूड सम्राज्ञी चंदाबाई तिवाडी याही भारुडाच्या माध्यमातून समाज जागृती करतात. वारकºयांचा संत वचनांवर विश्वास असल्यामुळेच संत वचनांच्या माध्यमातूनच ही जागृती केली जाते. संत तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी सांगितले ते या पर्यावरणाच्या रक्षणासाठीच. त्यामुळे त्यांचीच दिंडी पंढरीला नेताना, त्यांचा जयघोष होत असताना पर्यावरणाचे महत्त्व हे दिलेच पाहिजे.


नगरेची रचावी। जलाशये निर्मावी। महावने लावावी। नानाविधे॥ असे ज्ञानेश्‍वरांनी म्हटले आहे. त्यांचा विचार हा समाजजागृती आणि सुधारणेचा होता. त्यामुळेच याचा प्रसार करणारे कार्य, प्रबोधन हे दिंडीतून होत असते. म्हणूनच वारी ही परिवर्तनाची आणि आत्मशुद्धीची वारी असते.

- प्रफुल्ल फडके/पाऊले चालती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: