मंगळवार, २४ जून, २०२५

लोणंदमधील माऊलींचे आगमन



आज आषाढ महिन्याची अमावास्या. ज्येष्ठ अमावास्येला लोणंद नगरीत माऊलींची पालखी दाखल होते. बघता बघता माऊलींसमवेत निम्मा टप्पा गाठला. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात माऊलींचा मुक्काम आला. आता सोलापूर जिल्ह्याकडे जाण्यापूर्वी लोणंदच्या रिंगण आणि मुक्कामाचे वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण आहे. ज्या पालखीचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यात करणार आहोत, त्या पालखीला कर्नाटकातूनही मानले जाते. ‘कानडाहू विठ्ठलू कर्नाटकू’ हे जे अभंगातील वर्णन आहे, त्याची साक्षच या वारीतील पालखीत मिळते. कारण काही वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथील श्रीमंत महाराज ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी काठेवाडी पठडीतील पंचकल्याणी जातीचा सहा फूट पाच इंच उंचीचा तरणाबांड तपकिरी रंगाचा नवीन अश्व पाठविला होता. त्या अश्‍वाला विशेष प्रशिक्षित करण्यात आले होते. याशिवाय माऊलींच्या रथाची तरणीबांड बैलजोडी ही फार लक्षणीय अशी असते. आता माऊलींच्या पालखीसाठी नवा रथ असला तरी जुना रथही तयार ठेवण्यात आलेला असतो. जुन्या रथासाठी श्रीक्षेत्र आळंदी ग्रामस्थांची बैल समिती आळंदीच्या पंचक्रोशीतील काही नामांकित वारकरी भक्तांना आपल्या बैलजोडी देण्याची संधी देण्याचे काम करते. सध्या या रथाला असलेली दोन्ही जनावरे पांढरीशुभ्र असून तरणीबांड अशी आहेत. उमद्या कर्नाटक जातीच्या खिल्लारी जोडीमुळे माऊलींच्या रथाची शोभा आणखीनच वाढली आहे. ज्यांना आळंदीत जाता येत नाही ते भाविक लोणंदला येऊन माऊलींच्या पादुकांचे पालखीचे दर्शन घेतात. या पालखीचे डोळे भरून दर्शन घेणे हा फार आनंद असतो. माऊलींच्या चांदीच्या पादुका ठेवण्यासाठी देवस्थानाची सुंदर, भक्कम पालखी असते. पालखीमध्ये गजनीची बैठक घालून त्यावर माऊलींच्या चांदीच्या पादुका वारीसाठी ठेवलेल्या असतात. पालखीच्या मागच्या-पुढच्या दांड्यांना चांदीची सिंहमुखाची ढापणे असतात. एक जरीपटका निशाण, सुंदर अबदागिरी, जरीबुट्यांची रंगीत छत्री, चांदीची चवरी पालखी बरोबर असते. हा सगळा डामडौल अतिशय तेजस्वी आणि आनंद देणारा असा असतो. हे सगळे भागवत धर्माच्या ज्ञानराजमाऊलींचे वैभव वारीत नजरेत भरते. प्रत्येक जण ते आपल्या नजरेत टिपून घेऊन आपले आयुष्य धन्य झाले म्हणून समाधानाने वावरत असतो.


अहो सातशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या माऊलींबरोबर आपण चालत आहोत आणि आता पंढरीचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत हा आनंदच वेगळा असतो. तो अनुभवच माणसाला सगळ्यांपासून सुटका करून वेगळ्या वातावरणात नेणारा असतो. स्वत्व विसरायला लावणारा हा आनंदसोहळा असतो. या आनंदासाठी येणा‍ºया वारक‍ºयांमध्ये प्रत्येक जण परमेश्‍वर शोधत असतो. त्याला तो भेटत असतो. अशा परमेश्‍वराचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण आतूर झालेला असतो. आज लोणंदमध्ये हाच आनंद ओसंडून वाहत असतो. लोणंदची बाजारपेठ एरवी लालबुंद कांद्यांनी भरलेली असते. पण या दोन दिवसांत या लाल केशरी आनंदाने वारक‍ºयांनी भरून गेलेली असते. बाजारपेठेत टनाने ओतलेले कांदे म्हणजे लाखोंची संख्या असते. त्या कांद्यांच्या संख्येपेक्षा या वारक‍ºयांची आणि त्याचे दर्शन घेणा‍ºया भाविकांची संख्या असते. संपूर्ण सातारा जिल्हा आजच्या दिवशी लोणंदमध्ये दर्शनला येत असतो. आळंदीहून पांडुरंगाच्या भेटीला माऊलींची जाणारी पालखी, दिंडी, लाखो वारक‍ºयांचे जाणे पाहणे म्हणजे आनंदसोहळा असतो. त्याचे पुन:पुन्हा स्मरण करावेसे वाटते. सिंह जसा आपल्या मार्गाचे अवलोकन करतो तसे आपण किती पावले चालत आलो याचे स्मरण अमावास्येला लोणंद मुक्कामी केले जाते. म्हणजे ते आपोआप होते. आता एकादशीला फक्त अकरा दिवस राहिले. आळंदीहून झालेले प्रस्थान आणि आज गाठलेला टप्पा यावर तो नकळत नजर मारतो. प्रस्थान म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली पंढरीच्या पांडुरंगास भेटण्यासाठी निघणार तो दिवस होता. ज्येष्ठ वद्य ८ हा असतो. काय काय पाहिले यादिवशी आपण? कुठेपर्यंत आलो आपण? या दिवशी प्रस्थानाचा मंगलमय कार्यक्रम दुपारी ४ वाजता पार पडला. सर्वप्रथम हैबतरावबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार आरफळकर यांनी माऊलींचे घोडे आणून त्यांची आरती करण्यात आली. नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्तांकडून आणि पालखी सोहळा प्रमुख यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. देवस्थानचे विश्वस्त, मानकरी, दिंडी प्रमुख, समाजातील प्रतिष्ठित मंडळींचे श्रीफळ, प्रसाद, हार देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांच्या पूर्वजांनी माऊलींची इमानेइतबारे सेवा केली, अशा सेवेक‍ºयांना मानाचे पागोटे देवस्थानाकडून बांधण्यात आले. सगळ्यांच्या तोंडावर आनंद देऊन माऊलीची पालखी निघाली. हे सगळे या दोन दिवसांच्या मुक्कामात वारक‍ºयांच्या नजरेसमोर असते.

लोणंदमधील होणारे रिंगण हा फार मोठा सोहळा असतो. आता प्रत्येकाची नजर त्या रिंगणाकडे लागलेली असते. शून्यातून निर्मिती झालेल्या या विश्वाचे दर्शन या रिंगणात घडते, म्हणून प्रत्येक जण शून्यात नजर लावून बसतो.


प्रफुल्ल फडके/पाऊले चालती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: