भजन कीर्तनाच्या तालावर वारी सरकत असते, तेव्हा या वारीचे अनेक ठिकाणी मुक्काम येत असतात. अशावेळी वारीचे स्वागत करण्यासाठी लाखो भाविक अक्षरश: धन्यता मानत असतात. वारीच्या मुक्कामासाठी अनेक मठ असतात. अनेक देवळे, मैदाने, शेताच्या कडेचे बांध, राहुट्या टाकून वारकºयांच्या तैनातीत असतात. ही तैनात करणाºयांना वारकºयांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असे वाटत असते. कोणीही कोणालाही विचारल्याशिवाय जेवत नाही. म्हणजे आपल्याबरोबर पावले टाकत येणारा वारकरी जेवला का याची विचारपूस केल्याशिवाय कोणीही जेवत नाही, ही खरी वारकरी संस्कृती आहे.
‘या जेवायला, या जेवायला’ असे प्रत्येक जण एकमेकांना बोलावून खावू घालत असतो. देव भावनेचा भुकेलेला असतोच, पण वारीतील अशा राहुट्यांमधून, वेगवेगळ्या गटांमधून तयार होणारे अन्न, एकमेकांची भाजी भाकरी, भात आमटी, चटणी भाकरी एकमेकांना देताना जो आनंद असतो तो अमृतानुभव असतो. व. पु. काळेंचे ‘हसरे दु:ख’ या कथेत एक वाक्य आहे. ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणजे आपण बºयाच वेळा म्हणतो की, एखाद्या पदार्थाला खूप छान चव होती. अमूक होते वगैरे वगैरे. पण चव काय त्या पदार्थाची असते? तो पदार्थ ज्या भावनेतून तुम्हाला दिला जातो त्या भावनेची ती चव असते. इथे याचे प्रत्यंतर येते. वारीतील जेवण हे अतियश रुचकर आणि चविष्ट असते. साक्षात पांडुरंगाने ते केलेले आहे, त्यामुळे तो प्रसाद खाण्याचा आनंद प्रत्येक जण लुटत असतो.
गोकुळात आपल्या सवंगड्यांना घेऊन गोपाळ काला करणारा कृष्ण म्हणजे सगळ्या गोपाळांनी आणलेली शिदोरी एकत्र करून सर्वांना वाटणारा तो अमृताचा घास असायचा. त्या अमृताचा घास प्राशन करण्यासाठी सगळे बालगोपाळच नाही तर आबालवृद्धही आतूर होत असत. स्वर्गातील इंद्रादी देवही परमेश्वाराचा स्पर्श झालेला तो गोपाळ काला खाण्यासाठी आतूर झालेले असायचे. पण हा प्रसाद फक्त माझ्या सवंगड्यांनाच मिळणार म्हणून गोपाळ कृष्ण देवांची फजीती करायचा. कृष्णाने केलेला काला खाऊन झाल्यावर त्यातील एक कण जरी आपल्याला मिळाला तरी आपले जीवन सार्थकी लागेल या भावनेने इंद्र, पवन, अग्नि आदी देव त्या काल्याकडे नजर ठेवून बसले होते. कृष्णाने सांगितले होते की, या काल्याचा एक कणही वाया घालवायचा नाही. त्यामुळे सगळे बाल गोपाळ खात होते. आता यांची पोटे भरल्यावर हे हात धुवायला यमुना तीरावर येतील. तेव्हा हात धुतल्यावर आपल्याला नदीच्या पानात पडणारे हे खरकटे मिळेल या भावनेने त्या प्रसादासाठी या सगळ्या देवांनी माशांचे रूप घेतले. कृष्णाने त्यांची गंमत करायचे ठरवले आणि गोपाळांना सूचना दिल्या. काला करून खाल्ल्यावर त्याचा हात कोणीही नदीत धुवायचा नाही. तो कपड्याला पुसा. पडलेले कण पक्षी, किटक खातील. पाण्यात खरकटे टाकून नदी खराब करू नका.
यामागचे कारण हा कृष्णभक्तीचा संप्रदाय आहे, तो समोर आलेल्या अतिथीला घासातला घास काढून दिल्याशिवाय जेवणार नाही. स्वत: अर्धपोटी राहील, पण अतिथीला विन्मुख पाठवणार नाही. असे असताना गोपाळांचा काला खाण्यासाठी इंद्र आणि देव आले असते तर त्यांना नक्की प्रसाद मिळाला असता. पण या गरीब गोपाळांकडे मागून आपले मोठेपण कमी होईल हा अहंकार या देवांना झाला होता. तो नष्ट करण्याचे काम कृष्णाने केले. वारीच्या रांगेतही कोणी विन्मुख जात नाही. कारण साक्षात भगवंतच विविध रूपे घेऊन आपली जेवणाची सोय करत असतो, हा भाव तिथे असतो. त्यासाठी कोण कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही, प्रत्येकात परमेश्वर आहे याचा विचार करून प्रत्येक जण इतरांना ‘जेवला का रे बाबांनु’ असे विचारल्याशिवाय तोंडात घास घेत नाही. त्यामुळे या जेवणाची चव वेगळीच असते. हा अमृतानुभव असतो. या अमृताचे ग्रहण करण्यासाठी तरी प्रत्येकाने एकदा वारी करावीच.
अशा या वारकºयांची भोजनाची, निवासाची सोय करणाºया अनेक संस्था, मठ अहोरात्र कार्यरत असतात. उर्वरित काळात या वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील महर्षी वाल्मिक मठ सामदा, दादा महाराज चातुर्मास मठ रुक्मिणी-पांडुरंग संस्थान, सखाराम महाराज अंमळनेरकर मठ, श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, जयरामस्वामी वडगावकर मठ, धुंडा महाराज देगलूरकर मठ, श्री गुंडा महाराज संस्थान, ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ, सदगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा मठ, असे शेकडो मठ हे कार्य करीत असतात. या मठांमधून वारकरी संप्रदायाचा प्रचार, प्रसार, महत्त्व आणि सेवा याचे काम सातत्याने केले जाते. त्यामुळे ही शतकानुशतके वारी व्यवस्थित चालली आहे. सेवाभाव हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ही सेवा फक्त परमेश्वराची नाही, तर परमेश्वराच्या दर्शनाच्या मार्गावरील प्रत्येकाची असते. म्हणूनच ती अहंकारशून्य अशी झालेली आहे.
प्रफुल्ल फडके/९१५२४४८०५५/ पाऊले चालती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा