गुरुवार, २६ जून, २०२५

भक्तांची कैवारी, पंढरीची वारी


भजन, कीर्तन, नामस्मरण हे वारीसाठी फार महत्त्वाचे आहे. वारीत ते सतत घडत असते. या भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या जयघोषातच वारी पुढे सरकत असते. या वारीमध्ये हरिनाम घेणे, हरिकथा निरूपण आणि हरिभजन याला फार महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वारकरी हा नित्यनेमाने हरिपाठ करीत असतो. अतिशय एकरूप होऊन हरिपाठाचे मनापासून वाचन करणारे भक्ततसे वास्तव जीवनात फारच कमी आहेत. पण रममाण होऊन जे करतात, त्यांना काळाचे भय राहत नाही. हरिपाठ वाचत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते, इतके ते त्यात रमून जातात. अशा प्रकारे हरिपाठ करतात त्यांना जीवनाचा अर्थ समजतो. हरिपाठाचे महत्त्व हे शिवशंकराला होते. काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर प्रसारित केलेल्या जय मल्हार मालिकेतही हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर यांच्या परस्परांवरील भक्तीचे वर्णन केलेले आहे. अनेकजण शिव आणि विष्णू असा भेदभाव करतात. शैव वेगळे, वैष्णव वेगळे असे समजतात ते खरे अज्ञानी आहेत. साक्षात शिवशंकरच हरिनाम जपत असतात. हरिपाठात, हरिनामात इतकी जबरदस्त ताकद आहे की, आपल्याला निजधामापर्यंत सहज पोहोचता येते. त्यामुळे ज्ञानदेवांनी हरिनामाचा जप तरी करा, असे सांगितले आहे. हा भेदाभेद दूर करण्यासाठी ही वारी जेव्हा सातारा जिल्ह्यात प्रवेश करते, त्यापूर्वी जेजुरीला खंडेरायाशी होणारी भेट हा एक अभूतपूर्व संदेश देणारा सोहळा असतो. म्हणूनच हरिपाठाबाबत ज्ञानदेव म्हणतात,


नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी। कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी॥

रामकृष्ण उच्चार अनंत राशी। तपे पापाचे कळप पळती पुढे॥


हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा। म्हणती जे वाचा तया मोक्ष॥

ज्ञानदेव पाठ नारायण नामे। पाविजे उत्तम निजस्थान॥


म्हणजे हरिपाठात जीवन जगण्याचे सार सांगितले आहे. जो हरिपाठ एकरूप होऊन वाचतो, त्याला जगण्याचे सार आपसुकच समजते. त्याला काळाचेही भय राहत नाही. अशा हरिपाठाचे वाचन, मनन, चिंतन आणि कीर्तन हे वारीमध्ये सातत्याने होत असते. त्यामुळे वारक‍ºयाला ही वारी नुसतेच पांडुरंगाचे दर्शन घडवीत नाही, तर त्याला मुक्तीचा मार्ग दाखवते. वैकुंठात नेवून पोहोचवते.

आज जगात एकही वस्तू अशी नाही की, जिला काळाचे भय नाही. त्यामुळे हरिपाठ वाचल्यावर काळाचे भय राहत नाही, यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे. हरिपाठ करतात त्यांच्यातला अहं ब्रह्मास्मी भाव जागृत झालेला असतो. द्वैत संपलेले असते. ‘भक्त आणि देव दुजा नाही भावे’ याची खात्री पटलेली असते. मी आणि देव वेगळा नाही, ही धारणा ज्यावेळेला पक्की होते, तेव्हा कळीकाळाचे भय उरत नाही.


जगात आलेल्या प्रत्येकाने जो आकार धारण केलेला आहे, तो आकार कधी ना कधी सोडावाच लागतो. हेच तर खरे गीतेचे सार आहे. ते समजणे नाही तर श्‍वासाश्‍वासात, रंध्रारंध्रात बिंबवण्याची ताकद या वारीमध्ये आहे. इथे कळीकाळाचे भय नाही किंवा कळीकाळ त्यांच्याकडे पाहत नाही, असे म्हणणा‍ºया ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथांमध्ये, जे निर्माण होते त्याचा नाश होतो, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो, हे भगवत गीतेमधील विचार ठामपणे सांगताना नमूद केले आहे की,

उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे


हे घटिका यंत्र, जैसे परिभ्रमे गा॥

म्हणजे उपजणा‍ºयाला नाश असली तरी हरिपाठ करणा‍ºयांना मात्र कळीकाळाचे भय राहत नाही. कारण धारण केलेला देह जरी कालपरत्वे नष्ट होत असला तरी आत्मा हा कधीही नष्ट होत नाही. तो अमर आहे. या विचारांवरची श्रद्धा पक्की झाली की, त्याला काळाचे भय राहत नाही. तो काळ आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, हा विचार पक्का होतो. आत्मा देहाची आदलाबदल कशी करतो, हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-


जैसे जीर्णवस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्रे लेईजे

तैसे जन्मांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे॥


हरिपाठावरील श्रद्धाभाव दृढ झाल्यावर ही भूमिका पटते. म्हणूनच मग रामकृष्ण नामाचा उच्चार केला की, अनंत राशी तप निर्माण होते. राशी म्हणजे संचय. रामकृष्ण नामाच्या उच्चाराने अनंत राशी तप निर्माण झाल्यावर काय होते? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘पापाचे कळप पळती पुढे’. नुसते पाप म्हणलेले नाही. तर त्याचे कळप म्हणजे समूह पळून जातो, महाराजांना विचारले, ‘या भगवंतांच्या नामाचे तुम्ही एवढे महत्त्व सांगता. परंतु यापूर्वी ते कुणी घेतले आहे का?’ तेव्हा महाराजांनी हरिनाम हे किती पुरातन आहे हे सांगताना चक्क शिवशंकराचाच दाखला दिला. साक्षात भगवान श्रीशंकरसुद्धा सतत हरिनामाचा जप करतात. जेवढी निष्ठा श्रीशंकाराची हरिनामावर आहे, खचितच ती दुस‍ºया कुणाची असेल. तितकीच श्रद्धा हरिचीही हरावर आहे. हा हरी हरातील भेद नष्ट करणारा भाव हरिपाठात आहे. याचा पाठ सतत केल्याने वारकरी हा भेदभाव विरहित असा स्वच्छ आणि निर्मळ असतो.

जय जय राम कृष्ण हरी


प्रफुल्ल फडके/पाऊलेचालती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: