सोमवार, २३ जून, २०२५

सोडवण करा संसाराची



वारीमधील पालखी सोहळा हा एक अविस्मरणीय असा अनुभव असतो. या पालखी सोहळ्यास हैबतराव बाबांचे परिश्रम फार मोलाचे आहेत. त्यांच्यासोबत खंडोजी बाबा यांनीही या सोहळ्याची मनोभावे सेवा केली आहे. पुढे या सेवेत त्यांचे एक टाळकरी सोबती शेडगे यांचाही सहभाग होता म्हणून या दिंड्यांचा मान मोठा आहे. पहिली दिंडी असते ती आळंदीकरांची, दुसरी खंडोजी बाबांची, तर तिसरी शेडगे बाबांची असा हा दिंड्यांचा क्रम असतो. त्यामागे इतर दिंड्या असतात.


या वारीचे आणि दिंड्यांचे नियोजन इतके व्यवस्थित कसे होते? हा प्रश्‍न सर्वांना नेहमीच पडतो. छोटासा लग्नकार्याचा समारंभ असला तरी त्यात मानपान, रूसवे-फुगवे असतात. कोण आधी, कोण पुढे यावरून वाद होतात. पण इथे तसे कधीच होत नाही. कारण सर्वजण एकसमान असतात. सन १८५२ सालापासून पंच कमिटीने दिलेल्या क्रमानुसारच दिंड्या चालत असतात. वीणा मंडपात माऊलींची चांदीची पालखी ठेवलेली असते. त्यात माऊलींच्या चांदीच्या पादुका स्थानापन्न करतात. या वेळी संपूर्ण देऊळवाडा दिंड्या-पताका, टाळ, मृदुंग, वीणा आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामघोषाने दुमदुमलेला असतो. देऊळवाड्यात प्रदक्षिणा घालतेवेळी पालखी सिद्धेश्वराच्या देवळाजवळ थांबली की, हजारो वारक‍ºयांचे डोळे सिद्धेश्वराच्या कळसावर स्थिरावलेले असतात. कळस हलला की, पालखी झपाट्याने देऊळवाड्याबाहेर पडते.

देऊळवाड्याच्या महाद्वारात चौघडा, घोडे, दिंड्या आपल्या वर्षानुवर्षाच्या क्रमानुसार चालत असतात. पुढे प्रदक्षिणा मार्गावरून हजेरी लावत मारुती मंदिर, गावचावडी, शाळेचा मधला हॉल करत पालखी रात्री दहा वाजता आपल्या आजोळ घरी म्हणजे गांधी वाड्यात येते. तिथे आरती करून साखर, पान-विडा वाटला जातो. रात्री माऊलींचा मुक्काम गांधी वाड्यातच असतो. तिथे नित्याची भजने आणि जागर होतो. रात्रभर माऊलींचे भक्त इथे दर्शनासाठी येत असतात. या वेळी पालखीबरोबर असणारे चौपदार पुढील कार्यक्रम काय आहे हे जाहीर करतात. या सगळ्यांचे नियोजन फार महत्त्वाचे असते. त्यांची आज्ञा ही शिरसावंद्य मानून मोठ्या श्रद्धेने वारकरी त्याचे पालन करतात म्हणून कसलीही गडबड होत नाही.


वारीतील उभे रिंगण आणि गोल रिंगण या प्रथा अतिशय मानाच्या आणि आनंददायी अशाच असतात. यातील उभी रिंगण ही चांदोबाचा लिंब, बाजीरावाची विहीर आणि पादुकांजवळ होत असतात. तर वारीतील गोल रिंगण ही सदाशिवनगर, खुडुसफाटा, ठाकूरबुवाची समाधी, बाजीरावाची विहीर येथे होत असतात. या रिंगणाचे दर्शन घेण्यासाठीही गावोगावाहून भाविक येत असतात. या रिंगणात साक्षात माऊलींचे दर्शन होते.

दिंडीत वारक‍ºयांचे चालणे-बोलणे, खाणे-निजणे सारे काही माऊलींच्या संगतीत असते. माझी माऊली, आमची ज्ञानाई अगदी जवळ, होय अगदी सोबत असते. त्यामुळे या सा‍ºया वारक‍ºयांचे मन निश्चिंत आणि निवांत होते. शिकल्या-सवरल्या लोकांना या सगळ्याचे मोठे अप्रूप वाटते.


पंढरीच्या वाटेवर पुणे शहराचे महत्त्व मोठे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईने खरे तर हे शहर वसले आणि पेशव्यांच्या पराक्रमाने विस्तारले. अशा या पुण्यभूमीत माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या येऊन पोहोचतात. रस्त्याच्या दुतर्फा पुणे-मुंबईच्या श्रद्धाळू लोकांची गर्दी जमते. कुणी दिंडीतील लोकांवर फुले उधळत असतात, तर कुणी वारकºयांना बिस्किटे वा फळे वाटण्यात आनंद मानतात. बरीच पुणेकर मंडळी तर वेशीपासूनच दिंडीच्या बरोबर चालताना दिसतात.

यामध्ये मोठी मजेची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या शहरी लोकांना या वारक‍ºयांचा गाव-खेड्यातील लोकांचा हेवा वाटतो. बघा ना माऊली, शहरात चांगले सुखाचे जीवन जगणा‍ºयांना या ओबडधोबड साध्या अशा वारक‍ºयांचा हेवा वाटतो. का ठाऊक आहे का?, कारण हे सारे वारकरी घरादाराच्या जबाबदारीला काही काळासाठी तरी का होईना, दूर करू शकतात. प्रपंचातून बाहेर पडून अगदी मुक्तआनंद घेत असतात. त्यामुळे ज्यांना संपूर्ण वारी करणे शक्य नसते असे अनेकजण पुण्या-मुंबईहून गाडी करून ही रिंगण पाहण्यासाठी येत असतात. पंढरपुरात जाता येत नाही म्हणून लोणंद, फलटण, तरडगाव अशा ठिकाणी येऊन पालखीचे दर्शन घेत असतात. रिंगणाचा आनंद घेतात आणि समाधान मानतात. या वारीमधून जाणे शहरातील भल्या-भल्या लोकांना ते शक्य होत नाही. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे वारकरी संतांच्या संगतीत असतात. त्यामुळे हे सारे वारकरी खूप भाग्यवान आहेत याचा हेवा वाटतो सर्वांना. अहो दिंडीत वारक‍ºयांचे चालणे-बोलणे, खाणे-निजणे, सारे काही माऊलींच्या संगतीत असते. त्यांची माऊली, त्यांची ज्ञानाई अगदी जवळ, अगदी सोबत असते. त्यामुळे वारक‍ºयांचे मन निश्चित आणि निवांत होते. शिकल्या-सवरल्या लोकांना या सगळ्याचे मोठे अप्रूप वाटते, पण खरे सांगायचे तर संतांच्या उपदेशाने हे असे सोडता येणे शक्य असते. मायापाश किंवा मोहपाश सोडण्यासाठी नामदेव महाराज सांगतात,


सर्व सावधान होऊनी विचारी

सोडवण करा संसाराची //१//


प्रफुल्ल फडके/ पाऊले चालती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: