आळंदीतून निघताना ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस हलतो आणि जवळच असलेला सोन्याचा पिंपळ जोराने सळसळतो. ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ या नामगजराने सारा आसमंत दुमदुमून जातो. हा गजर ऐकण्यासाठी ढग जमू लागतात. नाचत नाचत आनंद साजरा करू लागतात. मंद बारीक अशी रिपरिप, रिमझिम शिडकावा मिळाला की वारीत चैतन्य भरते.
वारीला सुरुवात झाली तेव्हा पावसाने चांगलीच उघडीप दिलेली होती. पण जसजशी वारी पुण्यातून पुढे सरकते आहे तसतसे पुन्हा हे चैतन्य फुलू लागले आहे. वातावरण ढगाळ आहे. पाऊस पडत नाहीये म्हणता म्हणता तोही माऊलीच्या दर्शनाला आलाच. माऊलींनी या वारकºयांची काळजी घेण्यासाठीच हे नियोजन केले आहे. पाऊस पडला तर वारकरी भिजेल. उन्हाचा त्याला त्रास होईल. म्हणून पाऊस न पडता वारकºयांच्या डोक्यावर ढगांचे छत्र धरून ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव, चोखा अशा संतांचा मेळा चालला आहे, असाच भास आता होऊ लागला आहे. विठूनामाच्या ढगांची आकाशामध्ये दाटी झाली होती. आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरापासून सुरू झालेला वारकºयांच्या नामगजराचा स्वर जणू आता गगनाला भिडत आहे. ओढ जरी पंढरीची असली तरी ज्ञानोबांची स्वारी आपल्याबरोबर आल्याशिवाय ही वारी पुढे सरकत नाही. त्यामुळे पुण्याची सीमा ओलांडेपर्यंत ही ज्ञानोबा माऊली आपल्याबरोबर आहे ना याची प्रत्येक जण खात्री करून घेत असतो. त्या प्रत्येकाला आठवत असतो आळंदीतून निघतानाचा तो क्षण. माऊली कसे पालखीत बसले, कसा त्यांचा भास झाला आणि प्रत्येकाचे अंत:करण कसे भरून आले हे प्रत्येक जण पुन:पुन्हा आठवत राहतो. म्हणजे पालखी निघण्याची तयारी होते. अचानक तो क्षण येतो की, ज्याची सारे जण डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत असतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस हलतो आणि वारी नेण्याचा होकार देतात. त्या होकारात होकार मिळवण्यासाठी सोन्याचा पिंपळ कसा जोराने सळसळला आणि साºया आसमंतात ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ या नामगजराने अवघे आकाश दुमदुमून गेले. हा क्षण प्रत्येकाच्या नजरेसमोरून जात नाही. त्या नादात पुढे किती अंतर चालत आलो हेही लक्षात येत नाही. म्हणजे त्या सोन्याच्या पिंपळात झालेली सळसळ म्हणजे एक छानशी फुंकर होती. त्या फुंकरीने हा भक्तिभाव जणू तरंगत तरंगत पुढे आला. कुठपर्यंत आला? तर पुण्याची हद्द मागे टाकून आता सातारा जिल्ह्याच्या दिशेने जाऊ लागल्याचेही भान राहिले नाही. आता सासवडचा घाट, जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन, नीरा नदीतील स्नान करताना सातारा जिल्ह्यात कधी वारी येते हे समजतही नाही. बघता बघता पाच दिवस उलटले. कसे गेले हे दिवस, तर देहभान हरपून पुढे गेले. गेल्या चार दिवसांपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी आतुर झालेल्या महाराष्ट्र आणि लगतच्या अन्य राज्यांतील लक्षावधी वारकºयांच्या भक्तीला जणू आनंदाचे उधाण आले आहे.
समुद्रात भरतीच्या वेळी उसळणाºया लाटांना जसा पांढरा शुभ्र चंदेरी वर्ख लाभलेला असतो, तसा आळंदीत उठलेल्या भक्तीच्या लाटांना ‘माऊली..माऊली’ या आर्त हाकेची जोड होती. खरे म्हणजे आळंदीत दरवर्षी रंगणारा आषाढी-कार्तिकी वारीच्या प्रस्थानाचा हा सोहळा गेली अनेक शतके सुरू आहे.
तेराव्या शतकात माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या वयाने कोवळ्या, परंतु आत्मज्ञानाने परिपक्व असलेल्या तरुण संताने एक वेगळेच स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साधेसुधे नव्हते. माऊली म्हणाली होती, ‘माझे जीविची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले’. ज्ञानेश्वर माऊलीच्या या अनोख्या प्रतिज्ञेमुळे मधल्या काळात लुप्त झालेली दिंडीची परंपरा खºया अर्थाने पुनरुज्जीवित झाली. तसे पाहिले तर माऊलींच्या काळात देवगिरीच्या रामचंद्र रायाचे राज्य महाराष्ट्र भूमीत होते. त्यानंतरच्या काळातच परकीय आक्रमणांनाही सुरुवात झाली होती. परंतु ज्ञानोबा माऊलींनी सुरू केलेली ही वैष्णव भक्तीची दिंडी आजही इतक्या शतकांनंतर अव्याहत सुरू आहे. त्यामागे विठ्ठल दर्शनाची आस आहे. नामस्मरणाचा ध्यास आहे आणि आताच्या आधुनिक काळात जेव्हा सर्व प्रकारची वाहने उपलब्ध आहेत तरीही पायी विठुरायाच्या दर्शनाला जाण्याचा अट्टाहास आहे. म्हणून पंढरीची वारी तुमच्या आमच्या जगण्याची वारी बनली.
‘चला माऊली पाय उचला. चला माऊली पाय उचला’ असे म्हणत वारकरी एकमेकांना प्रोत्साहन देत असतात. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वार्थी जगाच्या विरोधी वातावरण इथे असते. स्वार्थी जगात प्रत्येक जण एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुढे जातो. पण वारीमध्ये मात्र सर्व जण आपल्यामागे कोणी राहिला नाही ना हा विचार करतो आणि सर्वांना बरोबर घेऊनच जातो. आपल्या बरोबर आलेल्या कोणाचे पाय दुखत नाहीत ना? त्याचे पाय अडखळत नाहीत ना याचा विचार करून ‘चला माऊली पाय उचला’ असे प्रत्येक जण म्हणतो. इवल्याशा मुक्ताबाईला जणू ज्ञानदेव म्हणत आहेत असा साक्षात्कारच यावेळी होतो.
प्रफुल्ल फडके/ पाऊले चालती
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा