भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक-आयएसएसमध्ये प्रवेश करून एक नवा इतिहास रचला. ते अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग आहेत. हे अभियान नासा, इस्रो आणि युरोपियन अंतराळ संस्थेचा समन्वित प्रयत्न आहे. या मोहिमेदरम्यान ६० वैज्ञानिक चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमध्ये ३१ देश योगदान देतील, त्यापैकी सात चाचण्यांमध्ये इस्रोची सक्रिय भूमिका आहे.
या चाचण्या सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, भौतिक विज्ञान, मानवी शरीरविज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान अशा विविध विषयांशी संबंधित आहेत. हे अभियान केवळ अंतराळ संशोधकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेणे, स्थलांतर करणे किंवा अंतराळात प्रयोग करणे इतकेच मर्यादित नाही. त्यात अशा भविष्याची गुरुकिल्ली आहे, जिथे अवकाश केवळ शोधाचे केंद्र राहणार नाही, तर ते एक व्यापक धोरणात्मक आणि आर्थिक आघाडी म्हणूनदेखील स्थापित होईल.
त्यामुळे हे स्पष्ट आहे की, येत्या काही दशकांमध्ये भूराजनीती, जागतिक शक्ती समीकरणे आणि आर्थिक वाढीला आकार देण्यात अवकाश हे महत्त्वाची भूमिका बजावेल. उपग्रह संप्रेषण ते संरक्षण प्रणाली किंवा संसाधने काढणे तसेच अवकाश पर्यटन असो, देशांच्या अवकाश क्षमता ठरवतील की, कोण पुढाकार घेईल आणि कोण त्याचे अनुसरण करेल. अवकाशातील नियंत्रण म्हणजे संप्रेषणावर नियंत्रण? ही परिस्थिती युद्ध आणि संघर्षात खूप उपयुक्त ठरते. लष्करी संप्रेषण ते रिअल टाइम नेव्हिगेशन आणि हवामान देखरेखीच्या आघाडीवर उपग्रह नेटवर्कचे महत्त्व आधीच सिद्ध झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध हे त्याचे उदाहरण आहे. जेव्हा रशियाने युक्रेनच्या संप्रेषण पायाभूत सुविधा नष्ट केल्या, तेव्हा एलोन मस्कची स्टारलिंक उपग्रह सुविधा युक्रेनच्या मदतीला आली.
आधुनिक युद्ध धोरणाचा अवकाश हादेखील एक महत्त्वाचा पैलू आहे. मजबूत अवकाश कार्यक्रम असलेल्या देशांना स्वाभाविकपणे धोरणात्मक फायदा मिळतो. अलीकडच्या इराण-इस्रायल युद्धातही हे सिद्ध झाले, जिथे इराणच्या अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना पृथ्वीच्या वातावरणाच्या सीमेबाहेर इस्रायलच्या एअरो-३ संरक्षण प्रणालीने निष्क्रिय केले. यावरून असे दिसून येते की, अंतराळ मालमत्तेवरील नियंत्रण आधुनिक युद्ध धोरणावर कसा निर्णायक परिणाम करू शकते. अलीकडेच, भारताच्या आॅपरेशन सिंदूरमध्ये उपग्रह कॅमेºयांची उपयुक्तता दिसून आली, ज्याने लक्ष्ये चिन्हांकित करण्यात आणि नुकसानाचे मूल्यांकन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे पैलू लक्षात घेता, अमेरिकेने आपल्या अवकाश मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी स्पेस फोर्स नावाची एक स्वतंत्र लष्करी तुकडी तयार केली आहे. भारतदेखील ही संकल्पना साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
आर्थिक आघाडीवर अवकाशदेखील एक नवीन क्षेत्र बनत आहे. अवकाश पर्यटन आता कल्पनारम्य राहिलेले नाही. काही कंपन्या आणि संस्थांनी अंतराळवीरांसाठी सेवा सुरू केल्या आहेत. इस्रोदेखील या दिशेने काम करत आहे आणि २०३० पर्यंत अंतराळ पर्यटन सुरू करण्याची योजना आखत आहे. २०३० पर्यंत जागतिक अंतराळ पर्यटन व्यवसाय ८५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
भारत हा विश्वासार्ह आणि परवडणाºया प्रक्षेपण क्षमता असलेला देश म्हणून ओळखला जात असल्याने, या बाजारपेठेत त्याला मोठा वाटा मिळणार आहे असे मानण्याची चांगली कारणे आहेत. विस्तारणाºया अंतराळ अर्थव्यवस्थेत, फक्त तेच देश यशस्वी होऊ शकतात, जे स्वत:हून मानव आणि यंत्रे अवकाशात पाठवू शकतील. या उच्च-स्तरीय शर्यतीत, भारत योग्य वेळी पुढे येत आहे. अॅक्सिओम-४ मोहीम ही जागतिक अवकाश महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. हे थेट भारताच्या गगनयान कार्यक्रमाशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या वाहनाद्वारे भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्याची योजना आहे.
२०२७ पर्यंत हे शक्य होऊ शकते. तथापि, भारताचे हेतू यापेक्षा खूप मोठे आहेत. भारत २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक-बीएएसच्या स्वरूपात स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. हे केंद्र अत्याधुनिक संशोधन, नवोन्मेष आणि दीर्घकालीन मोहिमांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. यासह भारत अवकाशात कायमस्वरूपी मानवी उपस्थिती असलेल्या निवडक देशांमध्ये सामील होईल. अॅक्सिओम-४ मोहिमेदरम्यान जीवन विज्ञान, कक्षीय आॅपरेशन्स आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या आघाडीवर मिळालेले धडे बीएएसच्या डिझाइन आणि आॅपरेशनल फ्रेमवर्कला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
अवकाशात मौल्यवान संसाधनांचा एक भांडारदेखील लपलेला आहे. या संदर्भात, मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान असलेला लघुग्रह पट्टा सर्वात श्रीमंत आहे. यामध्ये प्लॅटिनम, सोने, कोबाल्ट, लिथियमसारखी दुर्मीळ संसाधने आहेत, जी बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासारख्या आधुनिक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. पृथ्वीवरील कमी होत चाललेल्या संसाधनांना पाहता, भविष्यातील अर्थव्यवस्थेत अंतराळ खाणकामाचे महत्त्व वाढेल. संपूर्ण जगाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सुमारे १०० ट्रिलियन डॉलर्स आहे हे समजून घेतले, तर केवळ लघुग्रह पट्ट्याची स्थिती जगाच्या उत्पादनापेक्षा सुमारे ८,००० पट जास्त आहे. म्हणजेच, तिथे असलेल्या खनिजांचे मूल्य इतके जास्त आहे की, संपूर्ण जग पुढील काळाची तयारी करत आहे, जे देश या क्षेत्रांमध्ये प्रथम पोहोचतील आणि त्यातील काही भागावर नियंत्रण स्थापित करतील ते भविष्यातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठा साखळी नियंत्रित करू शकतील. ते किमती निश्चित करतील, नवीन उद्योग स्थापित करतील आणि जागतिक बाजारपेठांना आकार देतील. म्हणूनच भारताच्या भविष्यासाठी अवकाश प्रवेश महत्त्वाचा आहे. आपल्या क्षमता आणि कौशल्याच्या सहाय्याने, भारत विविध देशांसोबत भागीदारी आणि प्रशिक्षणाद्वारे अवकाशात विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे नेतृत्व करू शकतो. ही रणनीती राजनैतिक संबंध मजबूत करेल आणि अवकाश संशोधन अधिक समावेशक आणि न्याय्य बनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा