काळ बदलला म्हणजे नेमके काय बदलते? तर सगळंच बदलतं. अगदी विचारही माणूस वेगळा करायला लागतो. त्यामुळेच काळाबरोबर बदलताना आपली कमजोरीही स्वीकारणे आणि ती भूषणावह किंवा आभूषण म्हणून मिरवणे हा झालेला बदल खरोखरच लक्षणीय म्हणावा लागेल. असेच एक स्वीकारलेले कमजोरीचे आभूषण म्हणजे चष्मा.
एक काळ असा होता की, एखाद्याला चष्मा असणे हे कमजोरीचे वाईट लक्षण समजले जात असे. माणसाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. चष्मा लागला म्हणजे तो अधू झाला असाच समज होता. चष्मा हा म्हातारपणीच लागला पाहिजे. त्यावेळी म्हातारपणही लवकरच येत होतं कदाचित. कारण चष्मा हा चाळिशीत लागावा, त्या अगोदर असणे म्हणजे अपंगत्व समजलं जात होतं. त्यामुळेच पूर्वी चष्म्याला आपल्याकडे चाळीशी म्हणायचे. चष्मा सापडत नसेल, तर घरातील माणसं माझी चाळीशी दिसली का कुठे?, असा प्रश्न विचारत होते. वयाची चाळीशी उलटल्यानंतरच डोळे कमजोर होत असत; पण आता जन्माला आलेल्या बालकांनाही चष्मा असतो. पण त्याचे कोणाला दु:ख वाटत नाही, कारण आता सरसकट सर्वांनाच चष्मा लागत आहे.
एक काळ असा होता की, एखादी मुलगी किंवा मुलगा लग्नाचा असेल, तर त्याला केवळ चष्मा आहे म्हणून नकार यायचा. वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवताना मुलाला किंवा मुलीला चष्मा आहे किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख केला जायचा. मुलीला चष्मा आहे, म्हणून तिचे लग्न जमत नाही अशी तक्रार असायची. मग अनेक विवाह हे मुलीला दाखवताना चष्मा काढून दाखवली जायची. लग्नानंतर पुन्हा चष्मा वापरला जायचा, मग त्यासाठी निमित्त हे बाळंतपणाचं असायचं. बाळंतपणात चष्मा लागला, असा बहाणा काही लोक करायचे; पण चष्मा हे व्यंगाचे, कमजोरीचे लक्षण मानले जात असायचे. वधू-वर सूचक मंडळात फॉर्म भरून घेतानाही चष्मा आहे/नाही असा रकाना असायचा.
पण गेल्या काही वर्षांत हा विचार पूर्णपणे मागे पडला आहे. आजकाल चष्मा हा असावाच लागतो. तो आता शरीराचाच एक भाग आहे, असे रूढ होताना दिसत आहे. माणसाची शारीरिक कमजोरी त्याच्या अंगवळणी पडताना दिसत आहे. त्यामुळे आता वापरायच्या कपड्यांप्रमाणे चष्म्याच्या जाहिराती सर्रास होताना दिसत आहेत. सोनी मराठीवरील एका लोकप्रिय अशा इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाचे प्रायोजक हे लेन्सकार्ट आहेत. याची जाहिरातच तुमच्या एका मिसकॉलवर तुमचे डोळे तपासायला आणी तुमच्या योग्य नंबरचा चष्मा देण्यासाठी प्रतिनिधी घरी येईल अशी केली जाते, म्हणजे चष्मा ही तुमच्या कपड्यांप्रमाणे अत्यावश्यक बाब झालेली आहे. माणसात कमजोरी ही असणारच हे गृहीत धरून ती आता अंगवळणी पडली जात आहे. चष्मा असणे याची आता लाज वाटत नाही, तर ती स्टाइल झालेली आहे. हा चष्मा तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतो आहे, हा विचार कालानुरूप बदलताना दिसतो आहे. खºया अर्थाने विचार बदलल्याने कमजोरीतील कुरूपता न दिसता आता नवी दृष्टी समाजाला आलेली दिसते.
आणखी एक दुर्बलता म्हणजे केस पांढरे होणे. पूर्वी केस पांढरे होणे हे वृद्धपणाचे लक्षण होते. म्हातारपणीच ते पांढरे व्हायचे. त्यामुळेच तर अनुभवाचे बोल आहेत, हे सांगताना आमचे काळ्याचे पांढरे झाले ते उगाच नाही, असे म्हटले जायचे; पण आजकाल आठ-दहा वर्षांच्या मुलांचेही केस पिकलेले दिसतात. पूर्वी चाळिशीच्या अगोदर एखाद्याचे केस पांढरे झालेले दिसले की, लोक नाकं मुरडत असायचे. केस पांढरे आहेत, म्हणून तो म्हातारा व्हायचा. एखाद्याचे केस पांढरे असले, तर लग्न होणे कठीण होते; पण आजकाल त्याचे कोणाला काही वाटत नाही. पूर्वी केस पांढरे झालेला माणूस सलूनमध्ये जाऊन चोरून काळे केस करून यायचा आणि आपले केस रंगवलेले नाहीत, तर ओरिजनल आहेत, असे भासवायचा. केसाला कलप केला असे म्हटले जायचे. पण आजकाल सर्वांचेच केस हे पांढरे असतात, हे गृहित धरले जाते. एखाद्याचे खरोखरच ओरिजनल केस काळे असतील, तर त्याला कोणता रंग मारला असे सहज विचारले जाते. कलर शांपू, स्ट्रेक्स अशा जाहिराती तरुण मुले करताना दिसतात. त्यामुळे ही कमजोरी नाही तर स्टाईल आहे, असे भासवून कमजोरीशी मैत्री केली जाते. हा झालेला बदलही कौतुकास्पद म्हणावा लागेल.
नजर कमजोर असणे, केस पांढरे होणे या कमजोरी पूर्वीच्या काळात पोषण नीट न होण्यामुळे होतात असे बोलले जात होते. आपला आहार चौरस असेल, सगळे पदार्थ जेवणात असतील तर असे विकार होणार नाहीत असे सांगितले जायचे. त्यासाठी पपई, गाजर खावीत असे सांगितले जायचे. केस स्वच्छ राहण्यासाठी, काळेभोर राहण्यासाठी वेगवेगळी तेले वापरली जायची. आवळा, कैरी, लिंबू अशा पदार्थांचे सेवन असायचे. हे पदार्थ आपण आजही खातो. पण तरीही कमजोरी रहात असेल तर आपल्या आहारातील फळे, भाज्या आता निकृष्ठ किंवा सकस नाहीत असे मानावे लागेल.
बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा