मंगळवार, १५ मार्च, २०२२

द फर्स्ट लेडी ‘देविका राणी’


भारतीय चित्रपट सृष्टीतील फर्स्ट लेडी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो. त्या देविका राणी यांचा ८ मार्च हा स्मृतिदिन. भारत सरकारने दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीपासून म्हणजे १९६९ पासून त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यास सुरुवात केली. हा पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाºया म्हणून देविका राणी यांचा उल्लेख करावा लागेल.


देविका राणी चौधरी असे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला होता. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी होत्या. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या, तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणी यांना आपल्या ‘लाइट आॅफ एशिया’ या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन ‘करमा’ नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर ‘स्टार लंडन’च्या समीक्षकाने लिहिले होते की, देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही. नंतर हिमांशु रॉय हे देविका राणी यांना घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले.

लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले आणि त्यांनी बॉम्बे टॉकीज नावाच्या, हॉलीवूडच्या दर्जाच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेत शशीधर मुखर्जींचे खांडव्याचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली, फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अछूत कन्या’ नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्याला भारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशु रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यातच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली.


संस्थेचे भागीदार शशीधर मुखर्जी यांनी हिमांशु रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बंगलोरमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान हे उल्लेखनीय म्हणूनच लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण ज्या काळात त्यांनी भारताबाहेर आणि भारतातही धाडसाने काम केले ते फार मोलाचे होते. त्यासाठीच पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने त्यांना दिला आणि गौरव केला. देविका राणी ८ मार्च १९९४ रोजी निधन पावल्या. कृष्णधवल सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या देविका राणी यांचा इतिहास आणि कृर्तत्व नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच त्यांचे झालेले निधन हे धक्कादायक होते.

देविका राणींची कामगिरी खूप मोठी असली, तरी त्यांचे नाव घेतल्यावर सर्वात प्रथम आठवतो तो अछूत कन्या हा चित्रपट. हा चित्रपट सध्या दूरदर्शनच्या संग्रहातच पाहायला मिळेल. १९८६ साली दूरदर्शनने असे जुने, स्वातंत्र्यपूर्व काळातील खूप चित्रपट रात्री दाखवले होते. त्यात बावरे नैन, अछूत कन्या हे चित्रपट पाहायला मिळाले. एरवी हे चित्रपट नाहीतर कधीच पाहायला मिळणार नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात तयार झालेला हा चित्रपट होता. हा १९३६ चा भारतीय हिंदुस्थानी चित्रपट आहे. बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या सुपर-हिट चित्रपटांपैकी हा चित्रपट दलित मुलींच्या सामाजिक स्थितीशी संबंधित आहे आणि तो एक सुधारणावादी कालखंड मानला जातो. त्या काळात असे चित्रपट बनवणे सोपे नव्हते.


हा चित्रपट फ्रांझ ओस्टेन, निरंजन पाल, हिमांशु रॉय आणि त्यांची प्रमुख महिला कलाकार देविका राणी या होत्या. बॉम्बे टॉकीजच्या अनेक यशस्वी उपक्रमांपैकी हा एक चित्रपट होता. या चित्रपटाचे संगीत सरस्वती देवी यांचे होते. ही नावेही आजकाल कोणाला माहिती नाहीत. या चित्रपटाचे गीतकार जे. एस. कश्यप होते. तर भारतीय चित्रपटसृष्टीतील दादामुनी अशी ज्यांची ओळख होती त्या अशोक कुमार यांचा हा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटात अशोक कुमार आणि देविका राणी मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट १९००च्या दशकावर आधारित होता. मोहन हा जातीने ब्राह्मण असून, तो गावकºयांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू विकतो. तो एक दयाळू आणि सज्जन असा मनुष्य असतो. खरोखर गरजूंना मदत करतो. एका गरीब माणसाने दुखिया पण जातीने मागास किंवा अस्पृश्य असलेल्या व्यक्तीने त्याचे प्राण वाचवलेले असतात. अस्पृश्य असूनही त्याने मोहनचा जीव साप चावण्यापासून वाचवला आणि तेव्हापासून मोहन आणि दुखियाची घट्ट मैत्री झाली. अशातच मोहन (अशोक कुमार) यांचा मुलगा प्रताप आणि दुखियाची मुलगी कस्तुरी (देविका राणी) यांचीही लहानपणापासून मैत्री होते. एकत्र वाढून ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. गावातील डॉक्टर बाबूलालला मोहनबद्दल तीव्र राग आहे आणि तो नेहमी गावात आपल्या प्रतिष्ठेला बदनाम करण्याची संधी शोधत असतो. प्रताप हा ब्राह्मण मुलगा आणि कस्तुरी एक अस्पृश्य मुलगी (अच्छूत) असल्याने त्यावेळची सामाजिक परंपरा या दोन प्रेमींच्या एकत्र येण्याची शक्यता नाकारते. त्यानंतर, नियतीच्या अनेक वाईट वळणांमुळे आणि प्रसंगांमुळे, प्रतापने मीराशी (मनोरमा) लग्न केले, तर कस्तुरीने मन्नूशी (अन्वर) लग्न केले. ते दोघेही त्यांचे पहिले प्रेम विसरू शकत नाहीत, परंतु आपापले लग्न यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. दुर्दैवाने, मन्नूला एक पहिली पत्नी कजरी देखील आहे, जिच्याशी तो त्याच्या सासरच्या लोकांच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे दुरावला आहे या वस्तुस्थितीमुळे परिस्थिती आणखी वाढली आहे. आतापर्यंत कजरीला तिच्या पतीच्या आयुष्यात एका नवीन स्त्रीच्या आगमनाने अचानक धोका जाणवतो आणि ती मन्नूच्या घरी पोहोचते. त्यातून बराच संघर्ष असलेला हा त्या काळातील चित्रपट होता. या चित्रपटाच्या नायिका देविका राणी होत्या. पण एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अनमोल असेच होते.


- प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: