मंगळवार, १५ मार्च, २०२२

सुट्टी वैकल्पिक असावी


कोरोनाच्या संकटातून आता आपण बाहेर पडत आहोत. निम्मा महाराष्ट्र आता अनलॉक झालेला आहे. देशाचीही पावले त्याच दिशेने आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आता जास्त काम करून कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढता आले पाहिजे. त्यासाठी विनाकारण सुट्टी घेणे, दांडी मारणे यांवर नियंत्रण ठेवतानाच काही अनावश्यक सुट्ट्या वगळता आल्या पाहिजेत.


साधारणपणे एप्रिल आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत जास्त सुट्ट्या येतात. बँकांना सलग सुट्टी असल्यामुळे व्यवहार आजच उरकून घ्या, अशा बातम्या या काळात येतात. पण हे आपण कुठेतरी थांबवले पाहिजे. अर्थात आजकाल आॅनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग असल्यामुळे बँकांना सुट्टी असली काय, नसली काय काही फरक पडत नाही. पण तरीही सुट्टी किती असावी याचे भान असले पाहिजे.

बँकांच्या आणि शासकीय कार्यालयांतील कर्मचाºयांना दुसºया, चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे सलग तीन-चार दिवस सुट्टी जोडून येण्याचे प्रकार आपल्याला सातत्याने बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडे किती कामाचे तास वाया जातात आणि किती आर्थिक उलाढाली ठप्प होतात याचे कोणी गणितच करताना दिसत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून भारतीय बँकिंग धोरण, व्यवस्था आणि यंत्रणा ही सातत्याने चर्चेत राहिली आहे. बँकांचे घोटाळे आणि बहुराष्ट्रीय बँकांची असणारी स्पर्धा या तुलनेत भारतीय बँकांना असणाºया सुट्ट्या या जास्त आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे नियोजन केले जावे आणि त्या वैकल्पिक असल्या पाहिजेत. त्यासाठी तसे कायदे करून बँका ३६५ दिवस सुरू कशा राहतील हे बघितले गेले पाहिजे. आपल्याकडे नेट बँकिंग, आॅनलाइन बँकिंग, एटीएम या यंत्रणा कार्यरत होऊन बारा वर्षे झाली, पण अजूनही त्यात आपण शंभर टक्के यशस्वी झालेलो नाही. याचे कारण सक्षम यंत्रणा नाही. आवश्यकते इतकी तरतूद नाही. बँकेत पैसा सुरक्षित आहे याचा विश्वास जोपर्यंत ग्राहकांना मिळत नाही आणि केव्हाही पैसे काढता येतील अशी यंत्रणा जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत आॅनलाइन, नेटबँकिंग आणि एटीएमवर आम्हाला अवलंबून राहता येणार नाही. तोपर्यंत बँकांना इतक्या सलग सुट्टी घेता येणार नाहीत. म्हणून त्याबाबत कायदा होण्याची गरज आहे. आर्थिक कोंडी आणि अर्थव्यवस्था ठप्प करण्याचे बँकांनी थांबवले पाहिजे आणि जास्तीत जास्त काळ बँका कशा सुरू होतील हे पाहिले पाहिजे. सुट्टी हे बँकांच्या अंदाधुंद कारभाराचे कारण असू शकते. खरे म्हणजे असे सांगितले जात होते की, बँकांची सुट्टी ही निगॉशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टनुसार ठरवली जाते. या कायद्यानुसार सलग तीन दिवसांपेक्षा जास्त बँका बंद राहू शकत नाहीत. असे असताना सलग चार दिवस या सुट्ट्या कशा दिल्या जातात. सुट्टीचा हा कायदा कधी, कोणी, केव्हा बदलला हे कोणीही सांगू शकत नाही. सुट्टी सलग आली की आपल्याकडे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी आणि बँकांमधील एटीएमचा खडखडाट झाल्याने आर्थिक कोंडी हे प्रकार सातत्याने होताना दिसत आहेत. आजच्या गतीमान युगात इतकी सुट्टी कशी परवडेल या अर्थव्यवस्थेला याचा कोणीच विचार करत नाही. वाढती लोकसंख्या, वाढती गर्दी, वाढते व्यवहार या तुलनेत बँकांचे असणारे कमी कामाचे तास हे विकासास मारक आहेत. कारण अजूनही आपण आॅनलाइन व्यवहाराला सक्षम आणि साक्षर झालेलो नाही. कर्मचाºयांचा विचार करायचा असेल, तर त्यांना वैकल्पिक सुट्टी देण्याचा पर्याय आहे. त्याचा विचार केला तरच देश पुढे जाईल.


बहुराष्ट्रीय बँका आपले जाळे भारतातल्या कानाकोपºयात पसरवत असताना आणि त्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांची संख्या कमी करण्याचे धोरण आखण्याचे सरकार ठरवत आहे. पण बँकांचे विलिनीकरण, संख्या कमी करून परराष्ट्रीय बँकांना आपण तोंड देऊ शकणार नाही, तर जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन आपण ग्राहकांना आकर्षित करू शकतो याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला सुट्टीचे नियोजन करावे लागेल. कोणत्याही कर्मचाºयाला सध्या ५२ रविवार, २६ शनिवार आणि अन्य १५ अशा ८५ सुट्टी मिळतात. तर त्याच्या हक्काच्या रजा मिळून तो वर्षातील १०० ते १२० दिवस कामावर असत नाही. म्हणजे चार महिने काम न करता त्याला वेळेवर पगार मिळतो, महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी खात्यात जमा होतो. त्याचवेळी बारा बारा तास काम करणाºया असंघटीत कामगारांना विनावेतन सुट्टी घ्यावी लागते, पगार वेळेत होत नाही, त्यात अशा सुट्ट्यांचे निमित्त मिळाले तर त्यांचे वेतन आणखी रखडते. ही विषमता कधी दूर होणार? त्यांना सुट्टी द्यायची तर द्या पण सगळ्यांना एकदम सुट्टी कशासाठी. ती वैकल्पिक ठेवा. पर्यायी ठेवा. बँकिंग यंत्रणा बंद न पाडता देता आली तर पाहा. ईद, पतेती, ख्रिसमस, गणपती, बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती या सुट्टी त्या त्या समाजाच्या लोकांना देऊन बाकीच्यांनी कामावर येण्यास काय हरकत आहे? ज्या कार्यालयात एकही मुस्लीम कर्मचारी नाही त्या कार्यालयातील कर्मचाºयांना ईदची सुट्टी कशाला. बकरी ईद, रमजान ईद, मोहरम या सुट्टी फक्त मुस्लीम कर्मचाºयांना द्याव्यात आणि बाकीच्यांनी कामावर यायला काय हरकत आहे. जैन कर्मचाºयांसाठी महावीर जयंतीची सुट्टी देऊन बाकीच्यांनी कामावर येण्यास काय हरकत आहे? पारशी न्यू इयर किंवा पतेतीची सुट्टी दरवर्षी आॅगस्ट महिन्यात येते. बºयाचवेळा १५ आॅगस्ट, शनिवार रविवारला जोडून येते. ही सुट्टी सर्वांना कशासाठी दिली जाते? मुळात पारशी लोकच इतके कमी झालेले आहेत की त्यांचे कर्मचारी औषधालाही सापडत नाहीत. त्यामुळे असतीलच कुठे तर त्यांना ती सुट्टी द्या बाकीच्यांनी कामावर येऊन यंत्रणा सुरू ठेवण्यास काय हरकत आहे? एसटी, रेल्वे कर्मचारी, सैन्यदल, पोलीस दल यांना असते का कधी सुट्टी? त्यांना ना दिवाळी, ना गणपती, ना ईद, ना नाताळ. बारा महिने यंत्रणा सुरूठेवावी लागतेच ना. त्यांना पाहिजे तेव्हा ते आपल्या सुट्टीचे नियोजन करून घेतात. तसे बँक कर्मचाºयांबाबत का केले जात नाही. २४ तास सेवा देण्याचे दिवस असताना बँका कधी सक्षम होणार आहेत? एटीएम म्हणजे अ‍ॅटोमेटीक टेलर मशिन असे सांगितले जाते, पण हे अ‍ॅटोमेटीक टेलर काऊंटर कायम सलग सुट्टीचे काळात रोकड अभावी बंद पडते. मग त्याच्या अ‍ॅटोमेटीकला अर्थ काय राहिला? इंटरनेट आणि अन्य बँकिंग यंत्रणाही कोलमडून पडताना दिसतात. कार्ड स्वाइप यंत्रणाही बंद पडताना दिसते. अशा परिस्थितीत सलग सुट्टी ही अर्थव्यवस्थेला घातक असल्याने ती वैकल्पिक केली जावी.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: