खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच मान्य केले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. रशियाकडून खनिज तेल विकत न घेणे हा त्याचा एक भाग आहे. त्यामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर १३० डॉलर्स प्रतिपिंप या पातळीवर पोहोचले आहेत. याच काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरणही सुरू आहे. या संघर्षामुळे आयात-निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यातून महागाईला निमंत्रण मिळणार हे स्पष्ट आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती आगामी वर्षात मंदावेल, अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचे पडसाद दिसूनही येत आहेत. गेल्या काही दिवसांत अन्न-धान्यांच्या किमती, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, खाद्यतेलांच्या किमती ज्या झपाट्याने वाढत आहेत हे पाहता अर्थव्यवस्थेला खिळ बसणार आहे. सर्वसामान्यांची क्रयशक्ती या महागाईने कमी होणार आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे.
२०२२-२३च्या अंदाजपत्रकात खनिज तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता गृहीत धरून तरतूद केली होती; पण ती तेलाचे सरासरी दर लक्षात घेऊन केली होती. आता तेलाचे दर त्यापेक्षा बरेच वाढले आहेत, त्यामुळे आता काय करायचे याचा विचार सुरू असल्याचे सीतारामन म्हणाल्या. खनिज तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि सर्वच वस्तूंच्या किमती वाढतात. त्याकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात दोन दिवसांपूर्वी सीएनजीवरचा कर दहा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत काही निर्णय घेतला नाही. ही तात्पुरती मलमपट्टी असते, पण कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. महागाईच्या संकटातून सर्वसामान्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे.
खनिज तेल मिळवण्याचे अन्य मार्ग शोधले जात आहेत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले असले, तरी सद्य:स्थितीत सरकार समोर पर्याय खूप कमी आहेत. रुपयाच्या घसरणीचा निर्यातवाढीसाठी किती उपयोग होऊ शकतो, हे सांगता येत नाही.
आज रशिया व युक्रेन हेही खनिज तेल उत्पादक देश असले, तरी भारत त्यांच्याकडून तेल घेत नाही. इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात व अमेरिका हे मुख्यत्वे भारतास खनिज तेल पुरवतात. पश्चिम आशियाई देशांवर जास्त अवलंबून राहावे लागू नये यासाठी कुवेत, मेक्सिको व कॅनडाकडूनही तेल घेण्यास भारतीय तेल कंपन्यांनी अलीकडे सुरुवात केली आहे, पण त्याचे प्रमाण कमी आहे. अन्य कोणा देशाकडून घेतले तरी खनिज तेल स्वस्तात मिळणार नाही. बाजारात असेल त्याच दराने ते घ्यावे लागणार आहे. त्यासाठी पैसे कोठून आणणार हा मुख्य प्रश्न आहे. जास्त दराने खनिज तेल घेतल्यावर आयात-निर्यातीतील तूटही वाढणार आहे. गेल्या जानेवारीतच ही तूट २०.२३ टक्के किंवा १७ अब्ज ४२ कोटी डॉलर्स झाली होती. सरासरीपेक्षा खनिज तेलाचे दर १० डॉलर्सने वाढले, तरी आयात-निर्यातीतील तूट अथवा चालू खात्यावरील तूट सुमारे १४ ते १५ अब्ज डॉलर्सने वाढेल, असे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आगामी वर्षात किमान पहिले काही महिने ती वाढण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. सूर्यफुलाच्या तेलाच्या एकूण आयातीपैकी ९० टक्के तेल भारत रशिया व युक्रेनकडून घेतो. खाद्यतेल, खते यांची ११ टक्के गरज रशिया, युक्रेन व बेलारूस हे देश भागवतात. युद्धामुळे त्यांची टंचाई जाणवेल व त्यांचे दरही भडकतील. खनिज तेल महागले की देशांतर्गत पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस ही मूलभूत इंधने महागणार. त्यापाठोपाठ वाहतूक महागेल आणि सर्व वस्तूंचे दर वाढतील. महागाईच्या दुष्टचक्रात सामान्यांची होरपळ होणार आहे. उद्योगधंदे, व्यावसायिकांचीही यात होरपळ होणार आहे. त्या तुलनेत व्यापारी सुस्त असतील. साठेबाजीला यातून प्रोत्साहन मिळेल. डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने भारतीय वस्तूंच्या किमती कमी होतील. त्यामुळे निर्यात वाढू शकते; पण सध्या ग्राहक देशांची आर्थिक अवस्था काय आहे त्याचाही विचार करावा लागेल. डॉलर अधिक महाग होऊ नये आणि बाजारातील जादा रोखता कमी करणे या दुहेरी हेतूने रिझर्व्ह बँक स्वत:कडील डॉलर्स विकणार का असा प्रश्न आहे. त्या निर्णयावरही जागतिक स्थितीचा विशेषत: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाचा दबाव राहील. युद्ध सुरू होण्यापूर्वीच महागाई वाढीचा दर ६ टक्क्यांवर गेला आहे. त्यात किमान अर्धा ते पाऊण टक्का वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या धक्क्यातून अजूनही अर्थव्यवस्था पूर्ण सावरलेली नाही. आगामी वर्षात विकासदर ८.८ टक्के असेल असे अंदाजपत्रकात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने हा दर ७.८ टक्के असेल असे १० फेब्रुवारी रोजी म्हटले होते. युद्धामुळे स्थिती पूर्ण पालटली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला खिळ बसली आहे हे स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा