मंगळवार, २९ मार्च, २०२२

महायुद्धाच्या छायेत


रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा धसका संपूर्ण जगाने घेतलाय. या दोन्ही देशांमधील युद्ध आणखी चिघळले तर पूर्ण जगासाठी ही धोक्याची घंटा असेल, असे म्हटले जातेय. या युद्धाची झळ बसायला सुरुवातही झालीय. या दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू असताना आता इराण आणि इराकमध्ये पुन्हा एकदा संघर्ष चिघळला आहे. त्यामुळे संपूर्ण जग हे महायुद्धाच्या छायेत आलेले आहे. युद्धाच्या झळा मागच्या आठवड्यापासून भारताला जाणवायला लागल्या आहेतच. यामध्ये सर्वात मोठा भडका हा महागाईचा झालेला दिसून येतो आहे.


इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर चक्क १२ क्षेपणास्त्रे डागली आहेत. या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून, आखाती देशामधील या ठिणगीचे नंतर युद्धाच्या भडक्यात रूपांतर होते की काय?, असा प्रश्न सर्वांना पडतो आहे. अमेरिकी दूतावासावर हल्ला झाल्यामुळे अमेरिका गप्प बसणार नाही हे नक्कीच. त्यामुळे अमेरिका आखातातील युद्धात पडली, तर दुसरीकडून रशिया-युक्रेन हे युद्ध वेग घेईल. रशियाचे विघटन झालेल्या देशांपैकी आणखी काही देश यात पडतील. भारत आणि चीनला यात ओढले जाईल की काय अशी भीती आहे, पण एकूणच हे युद्ध कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे, त्यामुळे आपल्याला चिंता आहे हे नक्की.

रविवारी सकाळी आलेल्या वृत्तानुसार इराकमधील ईरबील या शहरामधील अमेरिकी दूतावासाच्या परिसरात शेजारील देश इराणने तब्बल १२


क्षेपणास्त्रे डागली आहेत. याची पुष्टी अमेरिकेच्या संरक्षण अधिकाºयांनी दिल्याचे असोशिएटेड प्रेसने सांगितले आहे. त्याचरोबर या हल्ल्यात अजूनतरी कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे इराणच्या शासकीय वृत्तसंस्थेने इराककडून इराणवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला जातोय. मात्र हे हल्ले नेमके कोठून झाले याची माहिती इराण देत नाहीये, असे म्हटले आहे; पण एकूणच या कुरापती वाढलेल्या आहेत हे नक्की. त्यातच दोनच दिवसांपूर्वी भारतातून एक क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडल्याची घटना घडली आहे. अशा किरकोळ घटना या युद्धाची ठिणगी टाकण्यास पुरेशा असतात.

दुसरीकडे पंधरा दिवस झाले तरी युक्रेन नमले नाही म्हणून रशिया चिडले आहे, चवताळले आहे. त्यांना लवकरात लवकर युक्रेनला नमवायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अधिक आक्रमकता वाढली आणि त्याला अमेरिकेने अन्य मार्गांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर हे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला आता या युद्धाच्या छायेची चिंता लागलेली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळतोय. रशियाने क्यिव शहराच्या सीमेवरील हल्ले वाढवले आहेत, तर दुसरीकडे इराण आणि इराक यांच्यातील तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ही लक्षणे महायुद्धाच्या दिशेने जाताना दिसत आहेत.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: