उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभांचा निवडणूक निकाल गुरुवारी आला. हा निकाल अपेक्षित असाच होता. कोणत्याही ठिकाणी धक्कादायक, आश्चर्यकारक निकाल लागला नाही. त्याचप्रमाणे अनेक पत्रपंडित, एक्झीट पोल आणि अंदाज वर्तवणारे तज्ज्ञांचा अंदाज हा नेहमीप्रमाणेच खोटा ठरला आहे. कोणाचाही अंदाज बरोबर आला नाही, त्यामुळे छातीठोकपणे दावे करणाºयांचे फुगे फुटले आहेत. या निवडणुकीत द्वेषाच्या राजकारणाला मतदारांनी थारा दिलेला नाही, सूड, आकस मनात ठेवून निवडणुकीच्या मैदानात आलेल्यांना मतदारांनी आमटीत पडलेल्या झुरळासारखे चिमटीत धरून बाजूला काढलेले दिसत आहे. भाजपने आपल्या महत्त्वाच्या राज्यात सत्ता राखून विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे; पण या निकालाचा सर्वात मोठा अर्थ हा निघतो की, भविष्यात भाजपचा खरा स्पर्धक आणि मोठा विरोधक आम आदमी पार्टी हा पक्ष असेल. विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी आप हाच एकमेव पर्याय ठरू शकतो, बाकीचे कोणतेही पक्ष नेतृत्व करू शकत नाहीत.
महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखण्यात विरोधी पक्षांना यश आले, म्हणून तोच फॉर्म्युला अन्य राज्यातही वापरण्याचे विरोधी पक्षांचे मनसुबे या निकालाने उधळून लावले आहेत. महाराष्ट्रात आलेले सरकार हे युती तोडून निर्माण केलेले आहे, तो फॉर्म्युला अन्य कोठेही चालवता येणार नाही हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आता समजले असेल. काँग्रेसची उत्तर प्रदेशात काय अवस्था आहे हे पण दिसून आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अजूनपर्यंत पक्ष स्थापनेपासून कधी शंभरीही गाठता आलेली नाही, स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशा राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश, गोवा अशा राज्यांत निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना कोणी निवडून देणे दूरच पण विचारातही घेतलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पंजाबात काँग्रेसच्या हातून आम आदमी पार्टीने सत्ता खेचून आणली आहे. त्याचे कारण त्यांचे स्वबळावर दिल्ली हे प्रमुख राज्य होते. अशाप्रकारे कोणतेही राज्य स्वबळावर हातात नसताना, आपल्या राज्यात पक्षवाढ करता येत नसताना दुसºया राज्यात लुडबूड करायला गेलेल्यांना मतदारांनी खिसगणतीतही ठेवलेले नाही. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काय होईल याचा इशारा तिनही सत्ताधारी पक्षांना या निकालातून मिळालेला आहे. उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब लांब राहिले; पण मराठी भाषिक राज्य असलेल्या गोव्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना विजय सोडा, डिपॉझीट वाचवणेही सोडा; पण तीन अंकी मतेही मिळाली नाहीत, असे चित्र आहे. यावरून या दोन पक्षांनी आपण महाराष्ट्रात मोठे होणे आवश्यक आहे. आपल्याला एका राज्यात अगोदर पाय मजबूत रोवावे लागतील, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात हा निकाल अपेक्षितच होता. तृणमूल काँग्रेस, आप यांना बाकीच्या राज्यांत खाती उघडता आली, सत्ता मिळवता आली, याचे कारण या दोन पक्षांकडे एकेक राज्य स्वबळावर मजबूत स्थितीत असे आहे. लांबून येऊन आप आणि तृणमूल काँग्रेसने गोव्यात खाती उघडण्याचे कारण त्यांना स्वबळावर सत्ता आणण्याचा अनुभव आहे; पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे तसे नसल्याने त्यांना कोणी विचारातही घेतले नाही. अर्थात हा मतदारांना अपेक्षित असाच निकाल होता.
योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश भाजपवर विरोधकांनी प्रचंड टीका केली; पण योगी आदित्यनाथ यांनी फक्त आपले काम दाखवले आणि हत्तीची चाल करत राहिले. विशेषत: कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातून, मुंबईतून उत्तर प्रदेशात माघारी गेलेल्या परप्रांतियांना आदित्यनाथ यांनी योग्य प्रकारे वागणूक दिली. तिथे रोजगाराची संधी निर्माण केली. कोरोना काळात परत गेलेले ४० टक्के लोक परत का आले नाहीत, म्हणून आपल्याकडे कांगावा झाला. पण त्यांना तिकडे रोजगार मिळाला म्हणून ते परत आले नाहीत, याचा विचार केला नाही. संकट आल्यावर इथून पळून गेले, असा त्यांच्यावर शेरा मारला. पण ते महाराष्ट्रात असले, तरी त्रास, नसले तरी गैरसोय असले राजकारण केले गेले. फिल्मसिटी, चांगले रस्ते, रोजगार निर्मिती याबरोबरच अयोध्येतील राममंदिर, कॉरिडोर अशी अनेक कामे त्यांनी ठसठशीतपणे केलेली आहेत. मतदार आता नेत्यांच्या, विरोधी पक्षांच्या भाषणावर नाही, तर काम पाहून मतदान करतो. टीव्ही वाहिन्यांच्या रिपोर्टरच्या अंदाजावर, अँकरच्या आक्रस्ताळेपणावर मतप्रवाह बदलत नाही, तर वास्तव पाहून लोक मतदान करतात, हे या निकालातून दिसून आले आहे. त्यामुळे हा निकाल अपेक्षित असाच होता.
या निवडणुकीत आणखी एक दिसून आले की, मतदारांनी जनतेचा कौल नाकारणाºयांना, गद्दारी करणाºयांना स्वीकारलेले नाही. पंजाबमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून हटवल्यावर अमरिंदर सिंग यांनी स्वत:चा पक्ष काढला, भाजपच्या जवळ गेले; पण त्यांना मतदारांनी नाकारले. त्याचप्रमाणे पक्षात राहूनच दरी निर्माण करणाºया नवजोत सिंग सिद्धू यांनाही मतदारांनी नाकारले. भाजपची साथ सोडून गेलेल्या सगळ्यांची अवस्था काय होते, हे चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर शिरोमणी अकाली दलालाही त्याचा फटका बसलेला आहे. एनडीएपासून दूर गेल्यावर शिरोमणी अकाली दलाला पंजाबात जनाधार मिळवता आलेला नाही. आम आदमी पार्टी हा नवा पर्याय मतदारांनी दिला आहे. याचा बोध बाकीच्या पक्षांनी घेतला पाहिजे.
ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीने पंजाबात यश मिळवले आहे, ते पाहता दिल्लीनंतर पंजाबची सत्ता मिळवणे हे फार मोठे काम आहे. आजवर कोणत्याही पक्षाला अशाप्रकारे इतक्या लवकर नवीन राज्यात सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे भविष्यातला मोठा विरोधी पक्ष अशाप्रकारे आम आदमी पार्टी मोठी होत जाणार हे नक्की आहे. हा निकाल काही अनपेक्षित नव्हता. पंजाबात भाजपची सत्ता नव्हती, तर त्यांचा मित्र पक्ष असलेला शिरोमणी अकाली दल तिथे कधीकाळी सत्तेत होता; पण शिरोमणी अकाली दलाने त्यांची साथ सोडली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही साथ सोडली, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साथ सोडली होती. शेतकºयांचे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. राहुल गांधी कृषी कायद्यांच्या विरोधात उतरले होते; पण तरीही काँग्रेसला पंजाबात साफ नाकारले. भाजपने आम आदमी पार्टीचा झाडू हातात घेतला आणि काँग्रेसचा सफाया केला हे त्यामागचे वास्तव आहे. साहजिकच आम आदमी पार्टी हा भविष्यात आणखी मोठा होणारा राष्ट्रीय पक्ष असेल. जसजशी काँग्रेस संपुष्टात येत आहे, तसतसा हा पक्ष मोठा होताना दिसतो आहे, हे या निकालाने दाखवून दिले आहे.
या पाच राज्यांतील निवडणुकांकडे विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्याकडे २०२४च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणून विरोधी पक्ष नशीब आजमावत होते. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी करण्याचे प्रयत्न होत होते. कधी ममता बॅनर्जींनी केले, कधी शरद पवारांनी बैठका घेतल्या; पण या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न होता. भाजप विरोधी आघाडी पाहिजे होती; पण काँग्रेसचे वर्चस्व कोणाला नको होते. काँग्रेसशिवाय आघाडी करायची तर कोण मोठा, कोण छोटा हा प्रश्न होता; पण आता हा पर्याय आम आदमी पार्टीच्या रूपाने समोर येताना दिसत आहे. हे सगळे पक्ष जर आपली पडती बाजू विचारात घेऊन आप बरोबर गेले आणि केजरीवाल यांचे नेतृत्व मान्य केले, तर देशात दुसरा पर्याय देता येईल. बिगर काँग्रेस, बिगर भाजप असे सरकार देण्याची ताकद आम आदमी पार्टीतून निर्माण होईल, असे हे चित्र आहे. पण त्याचबरोबर आप मोठा होईल आणि बाकीचे साफ होतील हे पण तितकेच खरे आहे. पण या निकालातून हे चित्र स्पष्ट झाले आहे, हे नक्की.
गोवा या राज्याकडे राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पाहिले गेले. त्यादृष्टीने अनेक पक्ष इथे उतरले. भाजपने मागच्या पाच वर्षांत बहुमत नसताना सत्ता स्थापन केली. आता त्यांना सत्ता मिळवता येणार नाही, यासाठी शर्थीने प्रयत्न केले गेले. भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उत्पल पर्रिकर याला बंड करण्यास प्रोत्साहन देऊन आपली उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला गेला. ते अपक्ष म्हणून उभे असताना त्यांना पाठिंबा जाहीर केला गेला; पण गोव्यातील सुशिक्षित मतदारांनी व्यक्ती केंद्रीत राजकारणाला नाकारले आणि पक्षाला संधी देण्याचा विचार केला. त्यामुळे एक्झीट पोल आणि राजकीय पत्र पंडितांना अनपेक्षित असला, तरी हा निकाल अपेक्षितच होता.
उत्तर प्रदेशात निवडणुका जाहीरही झाल्या नव्हत्या, तेव्हापासून म्हणजे जवळपास सहा महिने अगोदरपासून प्रियंका गांधींनी प्रचाराला सुरुवात केली होती. ४० टक्के महिला उमेदवारांना संधी देणार असे जाहीर केले होते. पत्रकार परिषदा काय घेतल्या होत्या. पक्षाने सांगितले, तर आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू असेही बोलायला त्या कमी पडल्या नाहीत; पण काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशातून पूर्णपणे नाकारले. राहुल गांधींप्रमाणेच प्रियंका गांधींचीही जादू चालली नाही. त्यांना कोणी विचारातही घेतले नाही. ना मतदारांनी स्वीकारले ना कोणत्या राजकीय पक्षांनी युतीसाठी विचार केला. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ ही घोषणा आकर्षक होती; पण त्याला यश आले नाही. त्यामुळे या निवडणुकीत प्रियंका गांधी भविष्यात काँग्रेस अध्यक्षा होतील, असे स्वप्न पाहणाºया गांधी निष्ठांचाही भ्रमनिरास झाला असेल. २०१९च्या निवडणुकीपासून काँग्रेसचे अध्यक्षपद रिकामे आहे. त्या पदाची निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात आहे.
एकूण पाच राज्यांपैकी चार ठिकाणी आम्ही सत्ता मिळवू हा भाजपने सातत्याने दावा केला होता. पंजाबचा त्यांनी कधी विचारच केलेला नव्हता. तो शब्द भाजपने खरा करून दाखवला आहे. उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदींचे भाषण आणि योगींनी कोरोना काळात दिलेले मोफत रेशन आणि केलेले चांगले शासन याचा विजय झालेला आहे. विरोधी पक्षांनी त्यावर सतत टीका केली, तरी मतदारांना जो अनुभव आला आहे, तो त्यांनी मतदानातून व्यक्त केला. त्यामुळे हा अपेक्षित निकाल आहे. मागच्या तुलनेत संख्याबळ कमी झाले असले, तरीही भाजपचे उत्तर प्रदेशातील हे घवघवीत यश आहे. भाजपला बदनाम करण्यासाठी लखीमपूर खेरी, उन्नाव या प्रकरणांचा कुप्रचार विरोधकांनी केला; पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. या दोन्ही भागांतील सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे चिखलफेकीच्या राजकारणाला मतदार नाकारत आहेत, हे आता लक्षात घेतले, तरी बाकीच्या पक्षांना पुढील वाटचालीसाठी नवी दृष्टी मिळेल.
प्रफुल्ल फडके/निवडणूक विश्लेषण
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा