सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध जोरात सुरू आहे. तिसºया महायुद्धासाठी जगाला सामोरे जावे लागणार का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशियाकडून अनेक मिसाईल्स (क्षेपणास्त्रे) युक्रेनवर सोडली जात आहेत; पण रशियाने सर्वात पहिल्यांदा सोडलले मिसाईल म्हणजे रशियाचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हेच असावेत. सध्याच्या परिस्थितीला तेच कारणीभूत असू शकतात. रशियाची महासत्ता ही परिस्थिती संपुष्टात आणून नरम राष्ट्र अशी भूमिका निर्माण करणारे गोर्बाचेव्ह यांच्या काळातील परिस्थिती आजच्या युद्धाला कारणीभूत असू शकते.
मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव्ह यांचा आज जन्मदिवस आहे. २ मार्च, १९३१ ला त्यांचा जन्म झाला. हे एक माजी सोव्हिएत राजकारणी आहेत. ते सोव्हिएत संघाचे सातवे व अखेरचे राष्ट्रप्रमुख होते. मार्च १९८५ ते आॅगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव्ह सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. १९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना, गोर्बाचेव्ह यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच ते पक्षात कार्यशील बनले. १९७९ साली कार्यकारी समितीचे (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेले गोर्बाचेव्ह लिओनिद ब्रेझनेव्ह यांच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व सोव्हिएत संघाचे राष्ट्रप्रमुख बनले. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेव्ह यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनर्रचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्यांनी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले, ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला. यामुळे शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन अमेरिकेने गोर्बाचेव्ह यांना गौरवले गेले असले, तरी आज निर्माण झालेल्या अशांततेचे बीज त्यावेळेच्या निर्णयात होते. रशियाचे विघटन झाल्यामुळे आज युक्रेनवर ही लष्करी कारवाई आणि विध्वंस होत आहे; पण या विघटनाचे जनक म्हणूनच गोर्बाचेव्ह यांच्याकडे पाहावे लागेल. त्यामुळे ते खºया अर्थाने मिखाईल नाही, तर मिसाईल ठरले आहेत.
गोर्बोचेव्ह सोव्हिएतचे राष्ट्राध्यक्ष असताना भारतातला त्यांचा दौरा प्रचंड गाजला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधींच्या समवेत मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे डिनर हे त्या काळात गाजले होते. नव्यानेच संपूर्ण देशभर टीव्हीचे प्रक्षेपण सुरू झालेले असल्याने दूरदर्शनवर जे काही दाखवतील ते प्रेक्षक पाहायचे. त्यामुळे सलमा सुलतानच्या तोंडून गोर्बाचेव्ह यांच्या नावाचा उच्चार तिने ओठांची हालचालही न करता केलेला उच्चार तेव्हा खूप गाजला होता. भांडवलशाहीच्या विरोधात वागणारे लाल बावटे, तेव्हा उजवीकडे झुकलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. संपूर्ण जगावर आणि भारतातील कम्युनिस्ट, डाव्या पक्षांवरही रशियाचा तोपर्यंत प्रचंड प्रभाव होता. इतका की रशियात पाऊस पडला, तर इकडचे भारतातील कम्युनिस्ट लोक छत्री उघडत होते, असे वर्णन केले जायचे. पण ही एकनिष्ठता, विचारांची बांधिलकी गोर्बाचेव्ह यांनी कुठे तरी संपुष्टात आणली. जगभरातील डाव्या पक्षांचे मातेरे तिथून झाले. भारतातील डावे पक्षही यानंतरच क्षीण पडू लागले होते. त्यामुळे आजच्या या परिस्थितीला ते कुठे तरी जबाबदार असावेत, असे वाटते.
भारतातील फाळणीनंतर जसा भारतातील काही नेत्यांच्या विरोधात नाराजी निर्माण झाली तशी नाराजी मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याबाबत झाली, तर त्यात नवल नाही. शांततेचे नोबेल मिळवून रशियाचे वर्चस्व संपुष्टात आणत, रशियाचे १५ देशांमध्ये विघटन करणे आणि अमेरिकेपुढे शरणागती पत्करणे हे काहींच्या दृष्टीने गोर्बाचेव्ह यांचे पाप असू शकते. व्लादिमीर पुतीन यांच्या मनात हीच सल असेल, तर ते या युद्धातून अमेरिकेला आणि जगाला वेठीला धरण्याचा प्रयत्न करतील हे मात्र नक्की.
मिखाईल गोर्बाचेव्ह हे रशियाचे सोव्हिएत रशियाचे ज्याचा उल्लेख यूएसएसआर असा होत असे अशा रशियाचे शेवटचे अध्यक्ष होते. यूएसएसआरचे सातवे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९९१ पर्यंत कारभार पाहिला. याच काळात आखाती युद्ध भडकले. इराण-इराक युद्ध सुरू झाले. या युद्धात अमेरिका, फ्रान्सने उडी घेतली. आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. त्याचवेळी रशिया हा देश मात्र विघटनाच्या संकटात सापडला. रशियाचे पंधरा तुकडे झाले. रशिया, युक्रेन, उझबेकिस्तान, कझागस्तान, बेलारुस, अझरबैजान, जॉर्जिया, ताझिकीस्तान, मोल्दोव्हा, किर्गिझस्तान, लिथुएनिया, तुर्कमेनिस्तान, आर्मेनिया, लात्व्हीया, एस्टोनिया असे पंधरा तुकडे झाले.
एकेकाळी हाच सोव्हिएत संघ हा एक अभूतपूर्व देश होता. सोव्हिएत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली होती. २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा १/३ भाग आणि युरोप खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या.
सोव्हिएत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेना व अमूर या ४ मोठ्या नद्या सोव्हिएत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील द्विना नदीद्वारे बाल्टिक समुद्र, द्नीपर व डॉन या नद्यांद्वारे काळा समुद्र आणि अझोव समुद्र, वोल्गा नदीने कास्पियन समुद्र तर उत्तरेकडील नद्यांद्वारे श्वेत समुद्र जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोव्हिएत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हकोर्यान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला कॉकेशस पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच पामीर, तिआनशान आणि अलताई पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोव्हिएत संघाचे विभाजन करणाºया उरल पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोव्हिएत संघास लाभल्या होत्या.
१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोव्हिएत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील रशिया राज्य सगळ्यात मोठे होते, सोव्हिएत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोव्हिएत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटांचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म आॅर्थोडोक्स ख्रिश्चन हा होता. तीन गटांत मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) ग्रेट रशियन्स - रशियात राहणारे, (२) लिटल रशियन्स - युक्रेनमध्ये राहणारे, (३) व्हाइट रशियन्स - बेलोरशियात राहणारे असे प्रमुख लोक राहत. हे सगळं वैभव संपुष्टात आले. त्याला कुठे तरी मिखाईल गोर्बाचेव्ह जबाबदार असल्याची भावना आता उफाळून येत आहे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा