शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

प्रजा खूश, मग चिंता कसली?


हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करूननंतर तिला जाळून मारल्याचा या चार आरोपींवर आरोप होता. पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरचे सर्वसामान्य जनता आणि महिलावर्गांनी स्वागत केले. अनेकांनी जल्लोषही केला. हा आनंद कसला होता? तर समाधानाचा होता. आपल्या न्याय आणि गृह विभागाला चपराक मारणारा हा आनंद होता, हे लक्षात घेतले पाहिजे. बलात्कार आणि खून करून टाकणारे आरोपी वर्षानुवर्षे पोसले जातात आणि पीडिताना न्याय मिळत नाही. त्यामुळे प्रजेमध्ये एक प्रकारची संतापाची लाट होती. त्यामुळेच पोलिसांनी केलेल्या या कृतीचे सर्वसामान्य जनतेला समाधान मिळाले आहे. अर्थात, आता याला राजकीय वळण दिले जाईल आणि चौकशा, चर्चा होतील, पण जे झाले, त्यात प्रजा खूश आहे, तर चिंता कसली? असाच विचार करायला पाहिजे.शुक्रवारी पहाटे या ४ आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते, मात्र दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अर्थात, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलीस इतक्या पहाटे का नेत होते? हे अनाकलनीय आहे. कदाचित दिवसाढवळ्या नेल्यावर जनतेचा रोष पत्करावा लागला असता, म्हणून रात्रीच्या अंधारात हा प्रकार झाला असेल, असे आपण मानायला हरकत नाही.
जेमतेम आठच दिवस झाले आहेत या घटनेला. ज्या घटनेतील हे आरोपी होते. हैदराबादमध्ये २७ वर्षीय पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप या चौघांवर होता. बलात्कारविरोधी कायद्यांमध्ये कठोर सुधारणा केल्यानंतरसुद्धा अशा घटना घडत असल्याने भारतात मुली किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. कायद्यात सुधारणा करून झाले काय? सात वर्षे झाली. तरी अजून दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली गेलेली नाही. राष्ट्रपतींकडून त्यावर स्वाक्षरी होत नाही. हा कसला फास्ट ट्रॅक आहे? सामान्य जनतेला हेच वाटते आहे. त्यामुळेच हा हैदराबादचा झालेला प्रकार सर्वांना आवडला.हे जे चार आरोपी होते, त्यातील तीन आरोपी हैदराबादपासून १६० किमी अंतरावर असलेल्या गावात राहतात, तर चौथा आरोपी शेजारच्या गावातील आहे. ज्या गावातील हे आरोपी आहेत, तेथील गावकरी म्हणतात की, आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आमच्या गावातील कुणी तरी इतकं निर्घृण कृत्य करेल, असं वाटलंही नव्हतं. या गावात बहुतांश लोक शेतमजूर आहेत. छोटी छोटी कामं करून आम्ही आपला उदरनिर्वाह चालवतो.’
एका उघड्या गटाराच्या शेजारी असलेल्या घरात यातील एक आरोपी आणि त्याचे कुटुंबीय राहतात. आरोपीची आई म्हणते की, मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. उद्या असं काही माझ्या मुलीच्या बाबतीत घडलं, तर मी शांत बसणार नाही, म्हणूनच ते जे म्हणत आहेत, तसं माझ्या मुलाने खरंच काही केलं असेल, तर त्याला फासावर चढवा.’ एक स्त्रीच स्त्रीचे दु:ख समजून घेऊ शकते. त्यामुळे त्या आरोपीच्या आईची ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती, पण न्यायालयात केस जाण्यापूर्वीच त्यांचा न्याय करण्याची वेळ आली. पोलिसांनी या चारही नराधमांचा खात्मा केला. अर्थात, यातील एका आरोपीच्या मातेने व्यक्त केलेल्या भावनाही तितक्याच खºया आहेत. आपल्या गुन्हेगार मुलाला पाठीशी घालण्याची तिची तयारी नाही. या प्रकाराबाबत तिची मते आहेत की, २८ नोव्हेंबरला तो कामावरू घरी आला, त्या रात्री आपण त्याच्याशी शेवटचं बोललो होतो. त्याने मला काहीच सांगितलं नाही. तो फक्त झोपून होता. मध्यरात्रीच्या जवळपास पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. तेव्हासुद्धा मला माहिती नव्हतं की, असं काही तरी घडलं आहे. पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं, तेव्हा मला प्रकरण कळलं. माझ्या मुलासाठी वकील करण्याचीही माझी ऐपत नाही. तसं करायची माझी इच्छाही नाही. माझ्या मुलाने खरंच तसं केलं असेल, तर मी त्याच्यावर पैसा आणि मेहनत खर्च करू इच्छित नाही.’ म्हणजे त्याच्या आईनेच त्याचा न्याय केलेला होता.यातील दुसरा आरोपी हा तिथेच जवळ राहणारा होता. तिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहतो. दुसºया आरोपीची पत्नी ही सात महिन्यांची गरोदर आहे. ती म्हणते की, आमचा प्रेमविवाह आहे. मी त्याला जवळपास दीड वर्षापासून ओळखते. आठ महिन्यांपूर्वी आमचं लग्न झालं. त्याच्या आई-वडिलांचा सुरुवातीला विरोध होता, मात्र नंतर ते तयार झाले. म्हणजे एकीकडे प्रेम करायचे आणि दुसरीकडे शेण खायला जाणारा तो नराधम आज पोलिसांच्या हातून मेला असला, तरी खरी शिक्षा ही त्याच्या पत्नीलाच मिळाली आहे. अजून दोन महिन्यांनी जन्माला येणारे त्याचे मूल एका बलात्कारी आणि पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या बापाचे बीज आहे, असा शिक्का घेऊन येणार. त्यात तो जन्माला आलेला जीव मुलगी असेल तर? म्हणजे एन्काऊंटर होऊन दुसरा आरोपी सुटला, पण शिक्षा कुटुंबीयांना झाली, असेच म्हणावे लागेल. या आरोपीच्या आईचे मत तर खूपच वेगळे आहे. ती म्हणते की, त्याला किडनीचा आजार आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून तो उपचार घेत आहे. दारूच्या नशेत कुणी तरी त्याच्यावर दबाव टाकून या गुन्ह्यात गोवलं असणार, असंच मला वाटतं.
तिसºया आरोपीच्या वडिलांनी याबाबत आणखी एक कथा सांगितली. ते म्हणतात की, २८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्यांचा मुलगा घरी आला. त्याच्या ट्रकला अपघात झाल्याचं त्यानं सांगितलं. त्याने सांगितलं की, तो चालवत असलेल्या ट्रकने स्कूटरवर जात असलेल्या एका मुलीला धडक दिली आणि त्यात ती दगावली. मी त्याच्यावर चिडलो आणि त्याला म्हटलं की, त्याने जबाबदारीने वागायला हवं होतं. ती पहिलीच वेळ होती, जेव्हा त्याने आम्हाला काही तरी सांगितलं. त्या रात्री पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले, तेव्हाच त्याने काय केलं हे आम्हाला कळलं, पण एकूणच सगळेच आरोपी हे सदाचारी नव्हते. व्यसनी होते. पशुवैद्यक तरुणीवर त्या पशूंनीच पाशवी बलात्कार करून नंतर तिला जाळून टाकले होते. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. देशभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेपाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशातही अशाच घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या होत्या. त्यामुळेच अशा गुन्हेगारांना जाहीर फासावर लटकवा, हाल हाल करून मारा अशा अनेक मागण्या संतप्त नागरिकांकडून येत होत्या. त्यामुळेच शुक्रवारी पहाटेच पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे वृत्त येताच सर्व देशात आनंद व्यक्त केला गेला. तरुणाई, महिला खासदार, महिला लोकप्रतिनिधी या सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे, म्हणूनच प्रजा खूश, तर चिंता कशाची? असे वातावरण तयार झाले आहे.

जल्लाद होण्यास अनेक जण तयार

गुरुवारी ५ डिसेंबरच्या बिटवीन द लाइन्स या लेखाचेही ‘दै. मुंबई चौफेर’च्या वाचकांनी प्रचंड स्वागत केले. जल्लाद नसेल, तर आम्ही हे काम स्वखुशीने करायला तयार आहोत, असे फोन संपूर्ण महाराष्ट्रातून दिवसभर येत होते. परभणी, अकोला, वरणगांव, नाशिक आणि मुंबईतून असंख्य फोन आले. यात काही निवृत्त पोलीस अधिकारीही होते. त्यांनी आपण अशा आरोपींना फासावर लटकवण्यासाठी जल्लाद होण्यास तयार असल्याचे कळवले. परभणीचे शरद कुलथे, वरणगांवचे सुरेश मोयके, अहमदनगरचे निवृत्त कॉन्स्टेबल माळी यांनी आपण हे कृत्य करण्यास आणि फासावर लटकवण्याचे पूण्यकर्म करू अशा भावना व्यक्त करून या लेखाचे भरभरून कौतुक केले. मुंबईतील पवई आयटीमध्ये काम करणारे तरुण समाधान कडव यांनी तर आपण हे काम करण्यास तयार असल्याचे कळवून फोटोही पाठवला. त्यामुळे अशा घटनांची समाजात किती चीड आहे, हे दिसून येते. अशा गुन्हेगारांना किती तातडीने फासावर दिले पाहिजे, असे समाजात वाटते. बलात्कार करणाºया ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्याची गरज आहे. जल्लाद नसल्याचे आणि अन्य कारणाने मानवी हक्क आयोगाच्या दबावाने अशा फाशीच्या शिक्षा लांबणीवर पडू नयेत. देशकार्य, समाजकार्य, समाजकंटकांना संपवण्याचे काम करण्यासाठी भारतातील असंख्य तरुण, ज्येष्ठ नागरिकही तयार आहेत, हे दिसून येते.

आता त्याचे राजकारण नको

या प्रकरणाने संपूर्ण देशभर संतापाची लाट आलेली होती. आता याची चौकशी आणि राजकारण करण्याची गरज नाही. या आरोपींना पोलिसांनी पकडले होते, त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिलेली होती. पीडितेचा भयानक मृत्यू झाला होता. अशा पशूंना मृत्युदंडाचीच शिक्षा अभिप्रेत होती. त्यामुळे याचे कसलेही राजकारण न करता त्या पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. राजकारण करून जर आता पोलिसांनी कायदा हातात घेतला आणि पोलीसांना दोष देण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यामुळे असे गुन्हेगार सोकावतील. राजकारणात आपण मोकाट सुटू शकतो, असा संदेश पोहोचेल. त्यामुळे गुन्हेगारांना भीती बसण्यासाठी याचे राजकारण थांबले पाहिजे आणि स्वागत केले पाहिजे.

बंदीशाळा

सहाच महिन्यांपूर्वी मुक्ता बर्वे हिने अभिनय केलेला बंदीशाळा हा चित्रपट आला होता. त्यात मुक्तावर असाच सामूहिक बलात्कार केला जातो. त्या आरोपींना वाचवण्यासाठी इतकी धडपड चाललेली असते. शेवटी त्यांना शिक्षा होते पण पोलीस शिक्षा ठोठावल्यावर त्यांना कस्टडीकडे घेऊन जात असताना त्यांना पळायला भाग पाडतात आणि एन्काउंटर केले जाते. हा प्रेक्षकांना आनंद देणारा भाग असला तरी पूर्ण शिक्षा मिळण्यासाठी असे वास्तवात झाले तरी लोक त्याचे स्वागत करतात, पण या चित्रपटात बलात्कार पीडितेला कोर्टात किती नागवले जाते आणि मानसिक बलात्कारही कसा कायदेशीरपणे केला जातो, हे दाखवून दिले आहे. बलात्काराची प्रत्यक्ष घटना आणि पीडा सहन केल्यानंतर न्यायालयीन चौकशीत जो छळ होतो, तो त्या बलात्कारापेक्षा भयानक असतो. त्यामुळे असे मानसिक बलात्कार होत असतील, तर एन्काऊंटर केलेले योग्यच, असे म्हणावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: