26/10/2019महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता नेहमीप्रमाणेच एक्झिट पोलचे आकडे चुकलेले आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते चुकले होते आणि आत्ताही ते चुकले आहेत. त्यामुळे असे अंदाज वर्तवणारे नेहमीप्रमाणेच किंवा ज्योतिषांप्रमाणेच नापास होतात हे लक्षात घेतले पाहिजे. केवळ निकालापर्यंत चॅनेलवर चर्चा करून टवाळक्या केल्याप्रमाणे एरंडाची गुºहाळे चालवायची त्यासाठी हे अंदाज व्यक्त केले गेले होते, असे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत एक चाणक्य सोडला तर कोणीही भाजपला २०० ते २२० पेक्षा जास्त जागा देत नव्हते आणि एनडीएला जेमतेम काठावर पास असे २७२ पर्यंत नेऊन सोडत होते, पण प्रत्यक्षात भाजपने ३०३ चा बार उडवला आणि रालोआने ३३० चा आकडा पार केला. तसाच प्रकार या अंदाजाबाबत उलटा ठरला. भाजप आणि महायुतीला २०० पार करणारे आकडे पंडित आता गप्प कसे आहेत? एकालाही भाजप १०० च्या आसपास रेंगाळेल आणि युतीला निसटते बहुमत मिळेल हे का सांगता आले नाही? त्यामुळे वाहिन्यांवरून चालवल्या गेलेल्या चर्चा म्हणजे फक्त एरंडाची गुºहाळे राहिली. त्यातून अत्यंत सपक पांचट असा रस आला, त्यात कोणालाही आता रस वाटेनासा झाला आहे.म्हणजे गेले दोन आठवडे विविध माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण व चर्चा होत राहिल्या आहेत. त्यानंतर प्रचाराची मुदत संपल्यामुळे राजकीय पक्षांनी करायचा प्रचार थांबला असला, तरी माध्यमे व अन्य साधनांनी निवडणूक प्रचार वा अपप्रचार चालूच ठेवला होता. उद्या मतदान होईल आणि गुरुवारी मतमोजणीने हा निवडणूक मोसम संपुष्टात येईल. तेव्हा कुठल्या पक्ष व नेत्यांनी केलेल्या वल्गना खºया ठरल्या वा कोणाचे बार फुसके ठरले, त्याचा खुलासा दिवाळीपूर्वीच होऊन जाणार होता. लोकसभा निवडणुकीत बहुतांश माध्यमे व राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पडावे लागलेले होते. याहीवेळी अनेकजण पुन्हा तोंडघशी पडायला पुढे सरसावलेले होते हे आधीच स्पष्ट होते, पण न्यूज चॅनेलवर कोणतीही न्यूज नसल्याने या फालतू चर्चांची गुºहाळे चालवली गेली. त्यातून पांचट सपक असा रसही बाहेर पडला नाही हे दिसून आले.इथे व्यक्त झालेली विश्लेषणे व त्यातून व्यक्त केलेले अंदाज कशामुळे फसतात, हे मात्र सामान्य प्रेक्षकाला कधी उलगडत नाही. त्याला एक प्रश्न पडतोच. आपण सामान्य माणूस वा मतदार असताना आपल्याला दिसणारे सत्य अभ्यासक वा विश्लेषक कशाला बघू शकत नाहीत? त्यांना दिसलेले मान्य कशाला करता येत नाही? तिथेच सगळी गफलत होऊन जात असते. कारण सामान्य माणूस सामान्य बुद्धीचा असतो आणि सत्याकडे पाठ फिरवून त्याला जगता येत नसते, पण अभ्यासकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना सत्याशी कसलेही कर्तव्य नसते. म्हणूनच त्यांना सत्याशी सामना करता येत नाही आणि कल्पनांचे झोके घेताना घसरगुंडी अपरिहार्य असते. म्हणूनच प्रत्यक्ष मतदान करून निवडणुकीचा निकाल निश्चित करणारा मतदार आणि विश्लेषक, नेते व अभ्यासक यांच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. मला तर एक प्रश्न नेहमी पडतो. हे एक्झिट पोलचे असो वा मतदानपूर्व चाचणी घेणारे सर्व्हे करणारे लोक आमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? ते नक्की कोणाला भेटतात? आमच्या मतदारसंघात कधी गुपचूप फिरून जातात हे कळतच नाही. त्यामुळे ते खरंच फिरतात की अंदाजपंचे ठोकून देतात? तसे ठोकून द्यायला सोपे असते, पण या वाहिन्या आपली इज्जत पणाला लावत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. ती जपण्यासाठी कुठल्यातरी दुसºया एजन्सीज्चा अंदाज आहे असे नाव सांगून माझा नोहे, धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही, अशी भूमिका घेत असावेत. पण भारवाही असले तरी त्यांची विश्वासार्हता संपुष्टात येते. कारण वारंवार चुकीची वृत्त दाखवली जात असतील. जनतेच्या हातात रिमोट आहे हे लक्षात घेतले पाहिजे.गंमत म्हणजे मराठीतल्या एका वृत्तवाहिनीने विविध जिल्ह्यात बाजार वा चौकात रस्त्यावर फिरणाºया फेरीवाल्यांशी चर्चा करून त्यांचे विविध राजकीय पक्षांवर मत आजमावले आणि कुठे कुणाचा जोर आहे त्याचा अहवाल प्रेक्षकांसमोर जसाच्या तसा सादर केला. त्यावरून असे दिसले की, आपल्या देशातील व राज्यातील मतदार खूपच सुबुद्ध झालेला आहे. त्याला राजकीय पक्ष, त्यांचे नेते किंवा सत्ताधारी व विरोधक यांच्या धोरणांविषयी पक्के ज्ञान आहे. त्याने आपापल्या हिताशी संबंधित अशा विषयांचा अभ्यास केलेला आहे. परंतु त्यातील बहुतेक जण सोशल मीडियावर लाइक करतात त्याप्रमाणे कुठलीही बाजू माध्यमे सांगतील तशी मांडत होते असे दिसून आले. कुणीतरी लिहून दिलेली स्क्रीप्ट किंवा मते त्यांनी व्यक्त केल्याचे दिसून आले. त्याचीच पुन्हा पोपटपंची केलेली होती. म्हणूनच मतमोजणी होते, त्यादिवशी अशा सर्व गोष्टी खोट्या पडतात. त्यातून व्यक्त झालेला संताप किंवा कौतुक यांचे कुठलेही प्रतिबिंब मतमोजणीत पडत नाही. त्यामुळे वाहिन्यांवरील वृत्तांवर किती अवलंबून राहायचे हे प्रेक्षकांनी आता ठरवल्याचे दिसून येते. वृत्तवाहिन्या या करमणुकीच्या वाहिन्या आहेत. म्हणजे एकीकडे सासवा-सुनांचा संघर्ष, एकमेकांना शह-काटशह देणाºया मालिका असतात, तर दुसरीकडे बातम्यांमधून असेच काही करमणुकीचे प्रकार केले जात असतात. म्हणजे एखादी सासू-सुनेची मालिका पाहून घरातील वृद्ध लोक जसे आपली सूनही तशीच वागणार नाही ना, अशा चिंतेत असतात. एवढा मालिकांचा परिणाम त्यांच्यावर होतो. तसेच काही लोक या वाहिन्यांवरील बातम्यांमुळे आपली मतं तयार करत असतात. तेच चुकीचे दातात अडकलेले बोलत असतात. या वाहिन्यांवरून त्या ईव्हीएमवर एवढी चर्चा केली गेली. अगदी भाजप अशा प्रकारे घोटाळे करतेच असे बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला, पण या निकालानंतर एकदाही या ईव्हीएमवर टीका झाली नाही हे विषेष, कारण जर असा घोटाळा भाजप करत असतीच तर आज त्यांचे संख्याबळ घटले नसते. शरद पवार, राज ठाकरे आणि त्यांचे समर्थक आता काहीच बोलत नाहीत. म्हणजे भाजप जिंकली की ईव्हीएम घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या की सगळं काही ठिक आहे. एकाही वाहिनीने यावर भाष्य केले नाही. त्यामुळे या राजकीय पक्ष आणि वाहिन्यांची सत्यासत्यता या निकालाने समोर आलेली आहे.या वाहिन्यांवर जितके राजकीय खुमखुमी असलेले मूठभर लोक राजकारणाविषयी तावातावाने बोलतात, त्याच्या पलीकडल्या ९५ टक्के लोकांना त्याचा गंध नसतो की, त्यावर चर्चा चघळण्याची इच्छा नसते. तरीही त्यांना त्यावरच प्रश्न विचारले जातात. त्यांच्या जगण्यातले प्रश्न विचारले जात नाहीत. कारण अशा प्रश्न समस्यांचा पत्रकार माध्यमांनाही थांगपत्ता नसतो. त्यांनाही कोणी अर्थशास्त्री वा राजकीय विश्लेषकाने मांडलेले मुद्देच सामान्य माणसाच्या जगण्याचे विषय वाटतात आणि मग त्यावरच जनतेचे मत समजून घेण्याचे कार्यक्रम योजले जातात. गेले दोन-तीन महिने अतिवृष्टीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे, पण त्या महापुराने बुडालेली जनता वा त्यांचे उद्ध्वस्त झालेले जीवन याची कितीशी चर्चा अशा माध्यमांतून करण्यात आली? पण त्या पावसाचा आणि पुराचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. पावसाकडे, पुराकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष, महाजन यांनी सेल्फी काढला, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून फिरले याला जितके महत्त्व दिले तितके सरकारच्या कामगिरीला दिले गेले नाही. त्या काळात पोलीस वा विविध शासकीय यंत्रणांनी केलेल्या मदतीचे कुठे कौतुक झाले नाही. या महापुराचा फायदा विरोधकांना कसा करून देता येईल यासाठी वाहिन्यांनी त्यात रंजकता, भयावहपणा आणण्याचा प्रकार केला. मुंबई वा अन्यत्रच्या रस्त्यातले खड्डे किंवा आरे कॉलनीतील तोडलेल्या झाडांचा प्रचंड उहापोह झाला, पण पुराने उद्ध्वस्त झालेली अंदाजे दहा-वीस लाख घरे म्हणजे किमान पन्नास लाख पूरग्रस्तांच्या निवडणूक विषयक मतांचा उहापोह कुठे किती झाला? कारण मुंबई, दिल्लीच्या वातानुकूलित केबिनमध्ये बसून पूरग्रस्त जनतेची कल्पना करता येऊ शकते, पण त्यामधली दाहकता, भीषणता समजूही शकत नाही. मग त्यावरून चर्चा उहापोह करण्याचा मुद्दा येतोच कुठे?अर्थात आपल्या देशातीलच नव्हे, तर जगभरच्या अभ्यासक व विश्लेषकांची आज ती दुर्दशा झालेली आहे. त्यांचा सामान्य जनतेशी कुठलाही संबंध उरलेला नाही, तर त्यांना जनतेच्या मनाचा सुगावा लागणार कसा? सामान्य जनतेच्या समस्या, भावना यापेक्षाही त्याविषयी विविध अभ्यास अहवाल किंवा जाणकारांनी व्यक्त केलेली मते; हाच आधार झालेला आहे. सहाजिकच त्यांची विश्लेषणे किंवा मीमांसा पूर्णपणे निराधार असतात अथवा वल्गना होऊन गेल्या आहेत. जनतेला भेडसावणाºया समस्या, प्रश्न आणि माध्यमातून उडवले जाणारे फटाके, यातली तफावत मग मतमोजणीतूनच समोर येत असते. या निवडणुकीत शरद पवार यांच्या ईडीला खूप महत्त्व मिळाले, पण माध्यमांसह विरोधकांनी अतिवृष्टी वा त्यातून उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना ढुंकून पाहिले नाही. शरद पवारांनी पावसात भाषण केल्याचे कौतुक केले गेले, पण पावसात भिजत मदत करणाºया पोलिसांचे, विविध सेवाभावी संस्थांचे कोणी कौतुक केले नाही. त्यामुळे वाहिन्यांचा फोलपणा या निवडणुकीत दिसून आला. त्यांच्या चर्चा, अंदाज, सर्वेक्षण आणि बातम्या देण्याची पद्धत अत्यंत चुकीची आणि अभ्यास न करता केलेली असते हे पुन्हा दिसून आले आहे.
शनिवार, १४ डिसेंबर, २०१९
एरंडाची गुºहाळे आणि पांचट रस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा