मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

कर आणि प्रेम गोळा करणारा कलाकार


खरंतर विक्रीकर आणि कलाकार हे दोन भिन्न प्रांत; पण राहुल सोनवणे या कलाकाराने कर आणि कलाकारी याची सांगड घालत संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप पाडली. कर गोळा करण्यात आनंद मिळवता-मिळवता करमणूक करण्याचा वसा हाती घेतला आणि एका रुक्ष आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने नको असलेल्या खात्यात राहून सर्वांना त्यांनी आपलेसे केले. कर कोणालाच भरायला नको असतो; पण कर भरायला डर कशाला, असा विचार खात्यात प्रामाणिकपणे काम करत असताना, रुजवण्याचे काम राहुल सोनवणे यांनी केले. करमणूक करता-करता कर वसुलीचे काम करणाºया कार्यालयात आपली उत्तम सेवा दिली आणि आता ते त्यातून निवृत्त होत आहेत. अर्थात विक्रीकर खात्यातून निवृत्ती असली, तरी कलाकार म्हणून त्यांची निवृत्ती नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आता त्यांच्यातील कलाकार अधिक तरुण होऊन करमणुकीसाठी सज्ज झाला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे.


राहुल सोनवणे यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आहेत. अष्टपैलू असे त्यांचे व्यक्मित्व आहेच; पण त्याहीपेक्षा माणूस म्हणून ते एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. कोणीही डॉक्टर होईल, इंजिनीअर होईल, कलाकार होईल नाही, तर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करून मोठे होईल. पण माणसाला माणूस बनता आले पाहिजे. हे माणूसपण राहुल सोनवणे यांच्यात दिसून येते. त्यामुळेच कलाकारी व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सातत्याने समाजकार्यात भाग घेतलेला आहे.

स्वातंत्र्याच्या हिरकमहोत्सवी वर्षात कनार्ळा टि.व्ही.साठी बनविलेला ‘60 वर्षात काय घडले’ या विबयावरील माहितीपट त्यांच्या राष्ट्रप्रेमाची साक्ष देतो. आजही त्यांच्या सप्तसूर संगीत अकादमीच्या माध्यमातून कनार्ळा स्पोर्टस अकॅडमी चे कलाविभागाचे कार्य करोनाकाळात अगदी अमेरिका,इंग्लंड,न्यूझिलंड या देशात पोहोचले आहे.त्यांच्या या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांचे मार्गदर्शक, कनार्ळा स्पोर्टस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष  विवेकानंद पाटील आणि गुरुवर्य सईद उस्मानी यांचे आहे असे ते जाहिरपणे सांगतात. विक्रीकर विभागातील त्यांची कारकिर्द माजी अपर विक्रीकर आयुक्त प्र. ज्ञा. बोधडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बहरली असे ते प्रामाणिकपणे कबूल करतात.


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयाशी सुसंवाद साधण्याची त्यांची खासीयत आहे. खासगीकरणाविरोधी आंदोलनात त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे होते. त्यावेळी त्यांनी लिहिलेले पथनाट्य राष्ट्रीय पातळीवर गाजले होते, हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या कारकिर्दीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याचे काम त्यांनी केले होते. याशिवाय आपल्या कार्यालयात सायंकाळी गाण्याचे वर्ग घेणे, अनेक शासकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती करणे, त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे, हे त्यांचे कार्य अनमोल आहे. विशेष म्हणजे बंगलोर येथील दाक्षिणात्य आंतरराज्यीय सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यावेळी अमराठी रसिकांसमोर भारूड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले होते. याशिवाय त्यांच्या महाराष्ट्र गीतास द्वितीय पारितोषिकासह महाराष्ट्रास ४ पारितोषिके मिळवून देण्याचे काम राहुल सोनवणे यांनी केले.

चळवळीचा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आहे. मागासवर्गीय संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रत्येक प्रबोधनात्मक कार्यक्रमातून बाबासाहेबांचे कार्य फक्त मागासवर्गीयांसाठीच नसून, संपूर्ण भारतीयांना प्रेरक आहे. हे ठसविण्याचे अनमोल काम राहुल सोनवणे यांनी केले आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे.


विक्रीकर खात्याच्या माध्यमातून त्यांनी विक्रीकर जिमखान्याचे सामान्य सदस्य ते उपाध्यक्ष, अशी मजल मारली होती. यात त्यांच्या नियोजनाचा भाग फार महत्त्वाचा होता. प्रत्येक स्पर्धेची आखणी व संयोजनात सिंहाचा वाटा हा राहुल सोनवणे यांचा होता. राहुल कुठे नाही?, सगळीकडे आहे. अगदी क्रिकेट, कबड्डी समालोचक, क्रिकेट, कॅरम, टेबल-टेनिस खेळाडू म्हणूनही त्यांनी नावलौकीक मिळवण्याचे काम केले.

जे-जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते-ते या उक्तीप्रमाणे प्रत्येक सर्वश्रेष्ठ आणि उत्तम अशा गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यादृष्टीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर सांगितिक व्याख्याने देण्याचे काम त्यांनी केले. सर्वगुण संपन्न, अष्टपैलू या उपमा खºया अर्थाने ज्यांना शोभतील, असे हे व्यक्तिमत्व आहे. मानवी कल्याणासाठी मनाचा अभ्यास या विषयावर व्याख्याने, तसेच कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी घेतल्या आहेत. अभ्यासातील अडचणी आणि उपाययोजना या कार्यक्रमातून १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांनी केले आहे. हे कार्य अनमोल आहे.


कोरोना काळात सगळे लॉकडाऊन असतानाही राहुल गप्प बसले नाहीत. कोरोना कालावधीत जवळपास १५ आॅनलाइन कार्यक्रमातून, संगीताच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन व त्यामुळे शेकडोंना आत्मविश्वास वाढविण्यात मदत, डिप्रेशनातून बाहेर काढण्यात सहकार्य केले. लोक अस्वस्थ असताना, प्रत्येकाचा काँफिडन्स जात असताना, आत्महत्येचा विचार करत असताना, त्यापासून लोकांना धीर देण्याचे केलेले हे काम खूप अनमोल असे आहे. त्यांना माणूस खºया अर्थाने कळला आहे. माणसावर प्रेम करणारा हा कलाकार असल्याने माणुसकीचा धर्म जपत त्यांनी सातत्याने लोकांना मदतीचा हात दिला आहे. गतवर्षी २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय उद्योग मेळ्यात, महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी लिखित, दिग्दर्शित ‘महाराष्ट्र लोक कलादर्शन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. राहुल सोनवणे स्वत: गायक, लेखक, निवेदक, व्याख्याता, खेळाडू, निर्माता, दिग्दर्शक, समुपदेशक, प्रेरक असे खºया अर्थाने चतुरस्त्र आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत.

राहुलना आजवर अनेक पुरस्कार आणि गौरव प्राप्त झालेले आहेत. यामध्ये भिवंडी दंगलीत उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे. याशिवाय उत्कृष्ट निरीक्षक म्हणून महाराष्ट्राचे मा. विक्रीकर आयुक्तांचे सन्मानपत्र त्यांना मिळाले आहे. उत्कृष्ट राजपत्रित अधिकारी म्हणून ते सन्मानित आहेत. प्रशिक शिक्षण संस्थेचा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्काराने ते सन्मानित आहेत. अँटीकरप्शन फाऊंडेशन आॅफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संगीत विषयक उपक्रमात त्यांची दोनदा नोंद झालेली आहे.


असे हे व्यक्तिमत्व विक्रीकर कार्यातून निवृत्त होत असले, तरी आता कला प्रांतात नव्याने झेप घेण्यासाठी त्यांना चौफेर शुभेच्छा.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: