गुरुवारपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले असले, तरी रशियाचे मुख्य लक्ष्य हे अमेरिका आहे. याचे कारण युक्रेन हे अमेरिकेच्या हातातील बाहुले आहे. किंबहुना अशी टीका पुतीन नेहमीच करत असतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी केलेल्या या हल्ल्याद्वारे पाश्चात्य देश व अमेरिकेला धडा शिकवणे हा पुतीन यांचा उद्देश आहे हे लपून राहिलेले नाही. ४८ तास उलटून गेले, तरी अमेरिका गप्पच आहे. याचे कारण रशियाविरुद्ध एकत्रित लष्करी कारवाई करणे अमेरिकेला अवघड आहे. त्यामुळे अमेरिकेला दणका देणे हे या युद्धाचे उद्दिष्ट आहे. ज्या प्रकारे जगभरातील भांडवली बाजार या युद्धानंतर कोसळला ते पाहता भांडवलशाहीला लाल बावट्याने दिलेला तो दणका म्हणावा लागेल.
भारतीय वेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री रशियाने युक्रेनमध्ये सैनिक आणि रणगाडे व अन्य अवजड लष्करी वाहने घुसवली. युक्रेनची राजधानी क्यिववर रशियाची लढाऊ विमाने घिरट्या घालत होती. या शहरातून स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांनी वृत्त दिले. असे आवाज अनेक शहरांमधून ऐकू येत होते. तिथे बॉम्बफेक सुरूआहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. युक्रेनच्या सीमा रशियन सैनिकांनी ओलांडल्याचे युक्रेनच्या सीमा रक्षक दलाने म्हटले आहे, पण एकूणच हा हल्ला होण्यापूर्वीची अमेरिकेची भूमिका आणि प्रत्यक्षात हल्ला झाल्यानंतरची अमेरिकेची भूमिका ही अनाकलनीय आहे. त्यात जमीन असमानाचा फरक आहे. अमेरिकेच्या नुसत्याच गुरगुरण्याला रशियाने भिक घातली नाही, असेच यातून दिसून येते. या युद्धात नाटो सहभागी होणार नाही, असे शुक्रवारी अमेरिकेने जाहीर केले इथेच अमेरिकेची हतबलता दिसून येते. आता आपला बफर स्टॉक खुला करून जगाची तेलाची गरज पूर्ण करण्याचे धोरण अमेरिकेने जाहीर केले असले, तरी अमेरिकेला या दोन दिवसांत जेरीस आणण्याचे काम रशियाने केले हे नक्कीच.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी याला युद्ध असे संबोधलेले नाही. ते याला लष्करी कारवाई म्हटले असले, तरी हे आक्रमण आहे यात शंका नाही. रशियन दूरचित्रवाणीवरून देशास उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी त्याचे समर्थन केले व त्यासाठी कारणेही दिली. पूर्व युक्रेनमधील डॉनेत्स्तक व लुहान्स्क या प्रांतांत युक्रेन हत्याकांड घडवत आहे, तेथील स्वतंत्रतावादी नेत्यांनी आपल्याकडे युक्रेनच्या आक्रमणापासून वाचवण्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे प्रांत रशियावादी आहेत. गेल्या आठवड्यात रशियाने सुमारे दीड ते दोन लाख सैनिक युक्रेनच्या सीमेवर आणले, तेव्हाच आक्रमण होणारे हे स्पष्ट झाले होते. युक्रेनच्या लष्करी तळांना रशियाने लक्ष्य केले आहे. पुतीन यांनी युक्रेनच्या सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. हे सगळे होत असताना अमेरिका गप्प बसली होती. सगळ्या देशांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेने दुसºयाच्या चपलेने विंचू मारण्याचा खूप प्रयत्न केला असला, तरी त्यांना फारसे यश आलेले नाही. रशियन आक्रमणापुढे आपले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे अमेरिकेला जाणवू लागले आहे. इराण, इराक या देशांना ज्याप्रमाणे अमेरिकेने बाहुले बनवले आणि बेचिराख करण्याचे धोरण अवलंबले, त्याप्रमाणे रशियाला छळणे सोपे नाही याची जाणिव अमेरिकेला झालेली आहे. कारण रशियाचे विघटन झालेले असले, एकेकाळी असलेले महासत्तेचे अस्तित्व शाबूत नसले तरी तो निद्रिस्त ज्वालामुखी आहे हे अमेरिकेने ओळखले आहे. ही ज्वालामुखीची आगच पुतीन यांनी पेटवून अमेरिकेला इशारा दिलेला आहे.
युक्रेनमधील अनेक बंडखोर म्हणजे ज्यांचा रशियाला विरोध आहे असे आणि पत्रकार यांची हत्या करण्याची रशियाची योजना आहे. अशा रशियाविरोधी व्यक्तींची मोठी यादी तयार असल्याचे पाश्चात्य राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. रशियाने अशी यादी असल्याचे साफ नाकारले असले, तरी पुतीन यांचा इतिहास बघता त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. खुद्द रशियातील नोबेल विजेत्या पत्रकारालाही त्यांनी धमकावले आहे. त्या वृत्त संस्थेतील काही पत्रकारांचा संशयास्पदरित्या मृत्यूही झाला आहे. पुतीनविरोधी नेते अलेक्सी नवाल्नी यांच्यावार विषप्रयोग झाला, त्यातून ते वाचले; पण आता ते तुरुंगात खितपत पडले आहेत. युक्रेनवर आक्रमण करण्याचे निमित्त पुतीन शोधत होते, असे त्यांची विधाने बघता जाणवते. आठवडाभरापूर्वी त्यांनी एक भाषण केले होते त्यात मुख्यत्वे नाटोवर आगपाखड होती. हा पाश्चात्य देशांचा लष्करी सहकार्य गट आहे. त्यात युरोपीय देश जास्त आहेत. युक्रेनचे वर्तन नव नाझींप्रमाणे असल्याचा पुतीन यांचा आरोप आहे. रशिया विरुद्ध द्वेषभावना व भयगंड पसरवत असल्याची टीकाही त्यांनी पाश्चात्य देश व नाटोला उद्देशून केली आहे. त्यामुळे एकूणच या युद्धाला सुरुवात करताना अमेरिकेला इशारा देण्याचे धोरण आखलेले दिसते.
युक्रेनवर पुतीन यांचा राग असण्याचे कारण म्हणजे त्या देशाची पाश्चात्य विशेषत: अमेरिकेशी वाढत असलेली जवळीक. हा देश आता अमेरिकेची वसाहत झाल्याची टीका त्यांनी केली आहे. नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा युक्रेनने व्यक्त केल्याने पुतीन यांचे पित्त अधिक खवळले. युक्रेनला नाटोकडून थेट आदेश मिळत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पूर्वीच्या सोव्हिएत रशियाची अण्वस्त्रे युक्रेनमध्ये आहेत की नाही? हा अजून संदिग्ध मुद्दा आहे. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर १९९४ मध्ये युक्रेनने अण्वस्त्रे नष्ट करण्यास मान्यता दिली. अण्वस्त्र प्रसार बंदी करारही त्यांनी मान्य केला. त्यावेळी एका तज्ज्ञाने ही चूक असल्याचे मत व्यक्त केले. आता युक्रेन अण्वस्त्र बनवत असल्याचा आरोप पुतीन यांनी केला आहे. नाटोद्वारे अमेरिका आपल्याभोवती लष्करी फास निर्माण करत आहे, असे त्यांना वाटते. बेलारूसचा हुकूमशहा लुकाशेन्को याच्याकडून तेथे रशियाच्या सैनिकांचा तळ बेमुदत ठेवण्याची परवानगी पुतीन यांनी मिळवली. ही सगळी कारणे पाहता आपले उपद्रव मूल्य दाखवणे योग्य असल्याचे पुतीन यांना वाटते. अर्थात ही सुरुवात काही एकाएकी झालेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते त्यांची मुदत वाढवणे या धोरणापर्यंत एक दीर्घकालीन कार्यक्रम त्यांनी योजल्याचे दिसते, पण युक्रेन हे निमित्त आहे. त्यांना नेहमीप्रमाणे अमेरिकेला धाक दाखवायचा आहे हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा