मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

विकृतपणाला आळा घाला


रविवारी दिवसभर सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर प्रचंड चर्चा होती ती एका बॅनरची. औरंगाबादमध्ये एका विद्वानाने बायको पाहिजे आणि तीही निवडणुकीसाठी म्हणून जाहिरातवजा बॅनरबाजी केली, पण याकडे विनोद किंवा माकडचाळे म्हणून न पाहता विकृत मनोवृत्तीचे राजकारणी म्हणून पाहिले पाहिजे. सत्तेसाठी खालच्या थराला जाणा‍ºया या मंडळींना आता कायद्याचा बडगा दाखवण्याची वेळ आलेली आहे.

म्हणजे बॅनरबाजी हा गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील अविभाज्य भाग बनला आहे. अगदी आपल्या घरातील लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस असला, तरी त्याचे बॅनर लावणारे आणि त्या कुत्र्याला शुभेच्छा देणारे महाभाग आहेत. पण आतापर्यंत आपण अनेक बॅनर पाहिले असतील मध्यंतरी पुण्यात सस्पेन्स बॅनरचा ट्रेंड आला होता. चौकाचौकांत कुत्र्या- मांजरांचे वाढदिवस असलेले बॅनरही आपले लक्ष वेधून गेले असतील. दहावीत ३५ टक्के पडल्यानंतर गावभर बॅनर लावल्याचेही आपल्याला आठवत असेल, पण औरंगाबादमध्ये एक वेगळा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असल्याचे बॅनर लावले होते.


खरेतर औरंगाबाद गुलमंडी ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. पुण्यातली मंडई तशी औरंगाबाद गुलमंडी. औरंगाबादेतील असा एकही व्यक्ती नसेल की, ज्याने गुलमंडीमध्ये खरेदी केली नाही. याच गुलमंडीतले एक बॅनर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बॅनर आहे तीन अपत्य असल्यामुळे २०२२ची महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी आहे असे. याला बॅनर कम जाहिरात म्हटले तरी चालेल, कारण या व्यक्तीने संपर्कासाठी नंबरही दिला आहे.

हा बॅनर लावला आहे तो ३५ वर्षीय रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने. रमेश पाटील यांना औरंगाबाद महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक लढवायची आहे, पण नियमामुळे तीन अपत्य असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. त्यासाठीच त्यांनी आता दुस‍ºया पत्नीचा शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी हे बॅनर लावले, पण यामधून महिलांचे अवमूल्यन करण्याचा प्रकार असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. एक तर पहिली तीन अपत्ये पहिल्या पत्नीपासून असतानाही त्याला दुसरी पत्नी केवळ निवडणूक लढवण्यासाठी हवी आहे. त्याला स्वत:ला निवडणूक लढवता येत नाही म्हणून पत्नीच्या नावाने कारभार करायचा आहे. याचा अर्थ सरळसरळ आहे की, राजकारणात येणा‍ºया महिलांचा वापर अशा प्रवृत्तींकडून केवळ प्यादे म्हणून, सह्याजीराव म्हणून केला जातो. निर्णयक्षम महिलांनी राजकारणात न येता अशा महाभागांच्या हातचे बाहुले बनण्यासाठी यावे असे अनेकांना वाटत असेल, तर तो समस्त स्त्री जातीचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला जातो असे म्हटले जाते. त्या महाराष्ट्रात हे असले लोक असतील, तर तो समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे.


खरेतर या महाभागाचे वय अवघे ३५ आहे. त्यामुळे तो काही पूर्वीच्या काळातील नाही की, त्याला जास्त अपत्य असावीत. मर्यादित त्रिकोणी चौकोनी कुटुंबाच्या जमान्यात जन्माला येऊनही त्याने तीन अपत्य जन्माला घातली आणि आता तीच त्यांची कामगिरी राजकारणात आड येत असल्यामुळे आणखी एक बायको पाहिजे म्हणून बॅनर लावला जातो. हे अत्यंत विकृतपणाचे आणि स्त्रियांचे अवमूल्यन करणारे कृत्य आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.

विशेष म्हणजे रमेश पाटील म्हणतात मी समाजसेवक म्हणून माझ्या घरी नगरसेवक पद हवे आहे. तीन अपत्य जन्माला घालण्यात ज्यांचा वेळ गेला त्यांना समाजकार्याला किती वेळ मिळाला असेल, हा संशोधनाचा विषय आहे.


बरे रमेश यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवलेली नाही हे विशेष आहे.पण त्यांच्या मते ते वार्डात गेल्या काही वर्षांपासून काम करतात. अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहेत, असा त्यांचा दावा आहे. लोकांची इच्छा आहे की, त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उभे रहावे, पण नियमांची आडकाठी असल्यामुळे त्यांना उभा राहता येत नाही. ते ज्या भागात राहतात त्या भागातल्या पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी दावा केला आहे. त्यांनी उभ्या केलेल्या मनसेच्या उमेदवाराला चांगली मते पडली होती, असा त्यांचा दावा आहे. नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असली, तरी नियम आडवे येतात म्हणून त्यांनी दुस‍ºया बायकोचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी बॅनरबाजी केली. औरंगाबादेत लावलेले हे बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरला, तर आहेच शिवाय सोशल मीडियावरही बॅनर धुमाकूळ घालते आहे. अशा प्रकारचे बॅनर लावून हा प्रसिद्धीचा स्टंट म्हणा किंवा काही पण त्यांच्या मनात खरोखरच निवडणुकीत उभा राहण्याची इच्छा असल्यामुळे नियमांची आडकाठी आल्यामुळे लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा होतेय हे मात्र नक्की. पण यातून महिला रस्त्यावर पडलेल्या आहेत असा अर्थ होतो. त्यामुळे साहजिकच महिला वर्गातून संतापाची भावना प्रकट झाली आणि त्यांनी या बाबीचा निषेधही केला. पण या माणसाला माहिती नाही की, तीन अपत्ये जशी निवडणुकीत अपात्र ठरवतात तसेच दुसरी पत्नीपण अधिकृतपणे करता येत नाही. पहिली पत्नी जिवंत असताना केवळ निवडणुकीसाठी बायको हवी अशी जाहिरात देऊन आपली पहिली पत्नी अपात्र आहे असे ठरवले. पहिल्या पत्नीच्या मानसिकतेचा कसलाही विचार केला नाही. हाही एक अत्याचारच आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी याला वेळीच रोखण्यासाठी या महाभागावर कडक कारवाई केली पाहिजे. लोकशाही आणि सामाजिक मुल्यांना पायदळी तुडवणरी वृत्ती राजकारणात येताच कामा नये. आधीच राजकारण बरबटलेले असताना त्यात असले विकृत विचारांचे लोक आले तर त्याचे काय होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: