मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गेली सहा दशके कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री निधन झाले. एक प्रसन्न, सभ्य आणि रुबाबदार व्यक्तिमत्व चित्रपटसृष्टीने गमावले. रमेश देव यांचाबाबत भरपूर लिहिण्यासारखे आहे. अभिनयाबरोबरच कट्टर देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते कलाकार होते. त्यांनी शिवसेनेतून कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. त्यात त्यांना फारसे यश आले नसले, तरी रमेश देव यांची रूपेरी पडद्यावरची कारकीर्द ही अत्यंत यशस्वी झाली होती; पण चित्रपटसृष्टीतील देवाचे देवाघरी जाणे हे वेदनादायीच आहे.
निधनापूर्वी तीन दिवस अगोदर म्हणजे ३० जानेवारीलाच त्यांचा ९३वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या; पण त्यानंतर बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठा झटका आहे.
रमेश देव यांनी दिग्दर्शन, तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. रमेश देव यांचा अभिनय हा थोडासा लाऊड किंवा भडक अशा स्वरूपाचा असायचा; पण ती त्यांची शैलीही प्रेक्षकांना खूप आवडायची. जशी हिंदी चित्रपटसृष्टीत राजकुमार, शत्रुघ्न सिन्हा यांची एक स्टाइल होती, तशीच रमेश देव यांची एक स्टाइल होती. स्टायलिश, रूबाबदार असे ते अभिनेते होते. आपल्या आवाजाचा योग्य वापर करून घेत. श्वासांचा योग्य वापर करत संवादफेक हे त्यांचं वैशिष्ट्य होते. १९७७च्या दरम्यान दादा नावाचा एक चित्रपट आला होता. यात रमेश देवना एक छोटी आंधळी मुलगी असते आणि रमेश देवचा अमजद खान हा सुपारी घेणारा गुंड खून करतो; पण त्या छोट्या मुलीची त्याला दया येते आणि त्याच्यातील गुंड स्वभाव मरतो असे कथानक होते. यामध्ये त्या मुलीला आपले वडील मेले आहेत, हे माहिती नसते. अमजद खानचा आवाज हा रमेश देवसारखाच असल्याने अमजद खान आल्यावर आपले वडीलच आले असे समजून त्या गुंडाशी ती अंध मुलगी बोलत असते. या कथानकासाठी रमेश देव आणि अमजद खान यांचा आवाज एकसारखा भासला पाहिजे. यासाठी अमजद खान हा शोलेसारख्या सुपरहिट चित्रपटानंतरही रमेश देव यांच्यापुढे नमला होता आणि त्याला रमेश देवचा आवाज दिला होता. हे रमेश देव यांच्या कारकीर्दीतील फार मोठे यश होते.
आपल्या अभिनयात लाऊडपणा आहे, हे कबूल करताना त्यांना कधी कमी वाटले नाही. सीमाचा अभिनय सहज आहे; पण आपला अभिनय थोडा लाऊड आहे, कृत्रिम आहे, हे ते मुलाखतीतून कबूल करत; पण नायक असो वा खलनायक असो रमेश देव यांनी आपल्याला झोकून दिले होते. खलनायक करताना त्यांनी आपले नाव देव आहे, हे विसरून काम केले होते. त्यामुळेच कसोटी चित्रपटात हेमा मालिनीवर बलात्काराच्या दृष्याला चित्रीकरणाच्यावेळी हेमा मालिनी घाबरून गेली होती. रमेश देव यांच्या डोळ्यात उतरलेला राक्षस आणि गायब झालेला देव हे परिवर्तन पाहून हेमा मालिनी आणि तत्कालीन खलनायकांचे देव असलेले प्राणही हतबल झाले होते.
रंगभूमीवर काम करताना मात्र प्रेक्षकांना आपलेसे करणे, आपल्या मस्त हसण्याने प्रेक्षकांवर छाप पाडणे, हे त्यांना प्रचंड आवडायचे. तुझं आहे तुजपाशीमध्ये काम करताना समोर दाजी भाटवडेकर, काशिनाथ घाणेकर होते; पण रमेश देव आल्यावर प्रेक्षकांना आनंद मिळत होता. प्रेक्षकांना जपणं हे त्यांना फार आवडायचं. एकदा गणेशोत्सवात सातारच्या भूविकास बँकेच्या नाट्यगृहात ‘कर्ता करविता’ या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगाची वेळ रात्री साडेनऊची होती. प्रेक्षकांनी थिएटर गच्च भरले होते. रमेश देव, सीमा देव, उज्ज्वला केणी, विजय गोखले अशी त्याकाळातली चांगल्या कलाकारांची नावे असल्याने प्रयोगाला तुफान गर्दी होतीच; पण त्यातही रमेश देव-सीमाला पाहण्याची प्रत्येकाला ओढ होती; पण १० वाजून गेले, तरी पडदा वर जात नव्हता. प्रेक्षकांनी दंगा करायला सुरुवात केली. आरडाओरडा करायला सुरुवात केली. १०:३० च्या सुमारास पडदा वर गेला आणि नाटकाला सुरुवात झाली; पण तरीही प्रेक्षकांचा गलका थांबेना. शेवटी रमेश देव यांनी नाटक थांबवले आणि प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘प्रयोग उशिरा सुरू झाला आहे, याबद्दल मी माफी मागतो; पण त्यामागचे कारण ऐकून घ्या. आम्ही रजताद्री हॉटेलवर उतरलो होतो. त्या रूमची कडी कोणी तरी बाहेरून लावली. त्यामुळे आम्हाला बाहेर येता आले नाही. ही घटना आॅगस्ट १९८२च्या दरम्यानची आहे. त्यावेळी मोबाइलच काय साधे फोनही नव्हते. त्यामुळे दरवाजा वाजवून जागे करण्याशिवाय पर्याय नव्हता. दरवाजा बाहेरून उघडून रमेश देव-सीमा यांना बाहेर काढेपर्यंत ९:३० उलटून गेले होते, तसेच वैतागून घाबरून दोघे भूविकास बँकेपाशी आले आणि मेकअप न करताच थेट रंगमंचावर एंट्री घेतली. हे ऐकल्यावर सगळे प्रेक्षक पिनड्रॉप सायलेन्स झाल्याप्रमाणे शांत झाले आणि रमेश देव यांनी कोचावर भिरकावलेला तो चष्मा डोळ्यावर चढवला आणि भूमिकेत शिरले. त्यानंतर नाटकाचा प्रयोग चांगलाच रंगला; पण अभिनय करताना असा प्रकार काही तासांपूर्वी घडला होता याची पुसटशी रेषाही त्यांच्या चेहºयावर नव्हती.
अजिंक्य देव यांना घेऊन त्यांनी बारा वर्षांपूर्वी वासुदेव बळवंत फडके यांच्यावर चित्रपट काढला होता. त्यासाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. सातारच्या जय विजय चित्रपटगृहात आम्ही सगळे कुटुंबीय हा चित्रपट बघायला गेलो होतो. त्यावेळी रमेश देव स्वत: तिथे हजर होते. आम्हाला त्याची कल्पनाही नव्हती; पण आमच्या कुटुंबातील २१ माणसे प्रेक्षक म्हणून एकाचवेळी हा चित्रपट पहायला आली आहेत, याचे त्यांना इतके कौतुक वाटले की, त्यांनी सर्वांबरोबर एक छान संवाद साधला होता. आपल्यावर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत, याची त्यांना फार मोठी श्रीमंती वाटायची. तो आनंद त्यांच्या चेहºयावर कायम दिसायचा. हा आनंद आज आपल्यातून निघून गेला आहे. ऋषिकेष मुखर्जींच्या आनंद चित्रपटातील राजेश खन्नाच्या जाण्याचे दु:ख जेवढे कायम हुरहुर लावणारे आहे, तेवढेच रमेश देव यांच्या आजच्या जाण्याचे आहे; पण या देव माणसाने या क्षेत्रासाठी केलेली कामगिरी मात्र अजरामर आहे.
प्रफुल्ल फडके/द स्क्रीन
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा