गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय संघर्षानंतर सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपतील साडेतीन जणांच्या नावाचा उल्लेख केला; पण या महाराष्ट्राला आजच नाही तर साडेतीनची परंपरा फार मोठी आहे, म्हणूनच या विविध साडेतीनची माहिती रंजक आणि महत्त्वपूर्ण आहे. राजकारणात काय असेल ते असो; पण महाराष्ट्र आणि साडेतीनचा संबंध समजून घेतलाच पाहिजे.
पेशवाईतील साडेतीन शहाणे
राजकारण सर्वाधिक गाजले ते पेशवाईत. त्यामुळे त्या काळातील साडेतीन शहाणे हा उल्लेख महत्त्वाचा आहे. पेशवाईच्या काळातले तीन साडेतीन शहाणे प्रसिद्ध आहेत. ते असे सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर हे पूर्ण शहाणे. हे नुसतेच मुत्सद्दी नव्हते, तर योद्धेही होते. उरलेले अर्धे शहाणे म्हणजे नाना फडणवीस. हे मुत्सद्दी होते; पण त्यांची युद्ध करण्यात गती नव्हती. एवढीच त्यांची कमतरता होती. पेशवाईतच असणारा; पण पेशवाईशी दुजेपणाने वागणारा पहिला पूर्ण शहाणा म्हणजे सखारामबापू बोकील, इतिहासात एकाने लिहिले आहे की, 'सखारामबापूंनी बोलावले तरी त्यांच्या घरी जाऊ नये.' दुसºयाने लिहिले आहे की 'हा कालचक्रासही फिरवील'. तिसरा म्हणतो, 'हा पुरता लबाड आणि त्याची दृष्टी धोकादायक आहे.' दुसरा पूर्ण शहाणा म्हणजे पेशव्यांचे मांडलिक असलेल्या जानोजीराव भोसलेराजे नागपूरकरांच्या दरबारात असलेले; पण पेशवाईशी वितुष्ट घेणारे देवाजीपंत चोरघडे. पेशवाईचा शत्रू हैदराबादच्या नबाब याच्याकडे असणारा आणि त्यामुळे पेशवाईच्या विरुद्ध वागणारा तिसरा पूर्ण शहाणा म्हणजे विठ्ठल सुंदर. हा शहाणा तर होताच; पण खºया अर्थाने पूर्णपणे शस्त्रधारी योद्धा होता. चौथे अर्धे शहाणे म्हणजे अर्थात नाना फडणवीस.
पुणेरी काँग्रेसकालीन साडेतीन शिरोमणी
त्यानंतर मागच्या शतकात पुण्यातून जेव्हा काँग्रेसची सूत्रं हालत आणि देशाचे राजकारण जेव्हा पुण्यातून होत होते, तेव्हा पुण्यातले साडेतीन शिरोमणी फार महत्त्वाचे होते. त्यामध्ये बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, ना. ग. गोरे, जगन्नाथराव जोशी आणि जयंतराव टिळक यांची नावे घेतली जातात. हे सगळे अत्यंत विद्वान आणि विचारवंत होते. विठ्ठलराव गाडगीळ, ना. ग. गोरे, जगन्नाथराव जोशी यांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून केंद्रीय पातळीवर कार्य केले होते, तर त्या तुलनेत जयंतराव टिळक यांनी महाराष्ट्रातच कारकीर्द केली होती, त्यामुळे ते अर्धे मानले जातात; पण पुण्यातील राजकाणाला तेव्हा महत्त्व होते. नंतर हे महत्त्व पुण्यातून बारामतीकडे गेले.
साडेतीन मुहूर्त
आपल्याकडे संस्कृतीत साडेतीन मुहूर्ताला महत्त्व आहे. यामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू वर्षाचा प्रारंभी दिवस गुढीपाडवा म्हणूनही ओळखला जातो. गुढीपाडवा (वर्ष प्रतिपदा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. त्यानंतर अक्षय तृतीया हा एक दुसरा मुहूर्त. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवससुद्धा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहते ते, म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या दिवशी जप, होम, दान केले जाते. ही तृतीय बुधवारी आली व त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महापुण्यकारक समजली जाते. या दिवशी घरोघरी सोन्याची खरेदी केली जाते. तिसरा मुहूर्त म्हणजे, विजया दशमी - दसरा हा आहे. अश्विन शुक्ल दशमी म्हणहेच हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण दसरा हा सुद्धा साडेतीन मुहूर्तात येतो. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. याशिवाय अर्धामुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा - व्यापारी पाडवा. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील अर्धा मुहूर्त मानला जातो. दिवाळीचा चौथा दिवस हा बलिप्रतिपदेच्या असतो. गुढीपाढवा हिंदू धर्मियांचा पहिला दिवस त्याचप्रमाणे बलिप्रतिपदा किंवा पाडवा हा व्यापारांतील पहिला दिवस.
साडेतीन शक्तीपीठे
महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठे फार महत्त्वाची आहेत. यामध्ये करवीन निवासीनी कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी हे पहिले शक्तीपीठ. तुळजापूरची तुळजा भवानी माता हे दुसरे शक्तीपीठ आहे. तर तिसरे पीठ माहूरगडची रेणुकामाता. तर अर्धे पीठ म्हणून वणीची सप्तश्रृंगी देवी ओळखली जाते.
महाभारतातील साडेतीन शिरोमणी
महाभारतातही साडेतीन शिरोमणी मोठे होते. एका राजाची पत्नी नारदांच्या शापामुळे गाय होते. त्या गायीला पुन्हा मनुष्याचा देह प्राप्त होण्यासाठी साडेतीन शिरोमणींचा स्पर्श एकाचवेळी झाला तर होईल असा उ:शाप नारदांनी दिलेला असतो. त्याप्रमाणे या कथेत कौरव पांडव एका बाजूला तर दुसरीकडे कृष्ण आणि यादव असे युद्ध होते. या युद्धात द्वारकाधीश भगवान कृष्ण, बलराम आणि पांडवांमधील भीम हे पूर्ण शिरोमणी त्या गायीला एकाचवेळी स्पर्श करतात. तर अर्धाशिरोमणी म्हणजे दुर्योधन. शूर असूनही कपटात अडकल्याने त्याला अर्धा मानले गेले होते. पण या साडेतीन शिरोमणींच्या स्पर्शाने त्या गायीचे रुपांतर बाईत होते.
पण एकूणच आपल्याकडे साडेतीनला खूपच महत्त्व आहे. महाभारतात, पेशवाईत आणि राजकारणात भारतात साडेतीनची गोष्ट महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी उल्लेख केल्यामुळे पुन्हा एका नव्या साडेतीन जणांचा या इतिहासात समावेश होणार आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा