इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये इतिहासाने कदाचित एक नवीन वळण घेतले असेल, पण काही परंपरा तशाच राहिल्या. अशीच एक परंपरा इराणी नववर्ष, नवरोजच्या उत्सवाशी संबंधित आहे, ज्यात बदल करण्यासाठी दबाव आला, पण तो अयशस्वी ठरला. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर २१ मार्च रोजी सुरू झालेला हा उत्सव १३ दिवस चालतो. या काळात भारतात पारंपरिक नववर्ष, उगादी, गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री हे सणदेखील साजरे केले जातात.
यामुळे इराणी आणि भारतीय संस्कृतीमधील काही साम्यस्थळे देखील अधोरेखित होतात. या वर्षी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे नवरोजचा सण इराणसाठी विशेष सुखद ठरलेला नाही. सततचे हल्ले आणि सर्वोच्च नेत्यांच्या मृत्यूला न जुमानता इराणी लोकांचे मनोधैर्य अढळ राहिले आहे. कदाचित कर्बलाच्या हौतात्म्याने त्यांना प्रेरणा दिली असावी. इस्लामिक क्रांतीदरम्यान अयातुल्ला खोमेनी घोषणा करत असत, ‘प्रत्येक दिवस आशुरा आहे, आणि सर्वत्र कर्बला आहे.’ याचा शब्दश: अर्थ असा आहे की, प्रत्येक दिवस एक संघर्ष आहे आणि प्रत्येक संघर्ष हे कर्बलाचे रणांगण आहे. याच निर्धाराने अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या या चालू असलेल्या लढाईत इराणी लोक प्रतिकाराचे प्रतीक म्हणून उदयास आले आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली अमेरिकन सैन्य आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे, यात शंका नाही. या युद्धामुळे आधीच अनेक निर्बंधांचा सामना करणाºया इराणच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याच्या अणुसुविधा, तसेच संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि अत्यंत प्रभावशाली अली लारीजानी यांच्यासह त्याचे सर्वोच्च नेतृत्व अक्षरश: संपवले गेले आहे.
अशा परिस्थितीत इतर कोणताही देश कदाचित शरण गेला असता, परंतु इराणने एक शक्तिशाली प्रतिहल्ला चढवला. त्याने इस्रायलच्या अशा लक्ष्यांवरही हल्ला केला ज्यांची कल्पनाही करता येत नव्हती. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेने अत्यंत प्रगत रणनीतीकारांनाही चकित केले. त्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपले नियंत्रण अधिक मजबूत करून जलवाहतुकीत अडथळा आणला. इतकेच नव्हे, तर आखातातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करून, त्याने धाडस आणि संहारकता दोन्ही दाखवली, ज्यामुळे हल्लेखोरांना काही प्रमाणात बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पडले.
युद्धाला चौथा आठवडा सुरू होत असताना, ते कोणत्या दिशेने जात आहे, याबद्दल आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. हे खरे आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला ठार मारले, परंतु सत्तेच्या संरचनेत बदल घडवण्याचा त्यांचा हेतू साध्य झालेला नाही आणि तसा तो झालेला दिसतही नाही. याउलट, सत्तेवर आलेले नवीन नेते पूर्वीच्या नेत्यांपेक्षाही अधिक टोकाची भूमिका घेत आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणी नेत्यांना निवडकपणे लक्ष्य केल्याने नेतृत्वाचे संकट निर्माण होईल की या प्रवृत्तीमुळे केवळ कट्टरपंथी आवाज अधिक मजबूत होतील, हे पाहणे बाकी आहे. कोणत्याही परिस्थितीत, युद्ध संपल्यानंतरही वाटाघाटींचा मार्ग सोपा दिसत नाही. अमेरिकेच्या वाटाघाटींच्या प्रयत्नांवर इराणी गटाच्या प्रतिक्रिया देखील हेच दर्शवतात.
काही प्रमाणात अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम खिळखिळा होऊ शकतो आणि त्याचे नौदल दुर्बळ होऊ शकते, परंतु इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमतेमुळे आखाती देश चिंतेत आहेत. शिवाय, हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ असलेल्या दिएगो गार्सियावरील इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याने तेहरानच्या क्षमतांची खोलीदेखील दाखवून दिली. जरी अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध एकत्र लढत असले तरी, दोन्ही बाजूंमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले आहेत. इराणच्या दक्षिण पार्स तेल आणि वायू क्षेत्रावरील इस्रायली हल्ल्याबाबत, अमेरिकेने स्पष्टपणे सांगितले की, त्यांना विश्वासात घेतले गेले नव्हते. जरी नेतान्याहू यांनी नंतर इराणी ऊर्जा मालमत्तांना लक्ष्य केले जाणार नाही असे सूचित केले असले तरी, इस्रायलने आपल्या योजना पूर्णपणे सांगितल्या नव्हत्या हे उघड झाले. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने आखाती देशांमधील अनेक प्रमुख तेल आणि वायू क्षेत्रांवर हल्ले केले, ज्यामुळे ऊर्जेच्या किमती गगनाला भिडल्या.
या युद्धात अमेरिका आणि नाटो मित्र राष्ट्रांमधील सहकार्याचा अभावही स्पष्टपणे दिसून येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे ट्रम्प यांचे आवाहन निष्फळ ठरले. केवळ ब्रिटनने काही मर्यादित मदत देऊ केली. दरम्यान, इराणने एका धूर्त खेळीत, आक्रमक देश आणि त्यांचे मित्र देश वगळता होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली असल्याचे ठामपणे सांगितले. इराणच्या हल्ल्यांनी आखाती देश ज्या अमेरिकन संरक्षण कवचावर अवलंबून होते, त्याच्या मर्यादाही उघड केल्या आहेत. इराणने हे दाखवून दिले आहे की, अमेरिकन संरक्षण कवच त्यांच्यासाठी अभेद्य नाही. हे युद्ध शिया आणि सुन्नी यांच्यातील वैचारिक दरीही रुंदावत आहे.
या संकटाच्या काळात संयुक्त राष्ट्रांचे मौन गंभीर प्रश्न निर्माण करते. आखाती देश आणि जॉर्डनवरील इराणी हल्ल्यांचा निषेध करण्यापलीकडे, संयुक्त राष्ट्रे केवळ वरवरची सहानुभूती दाखवत असल्याचे दिसते. ओमानसह इतर काही देश सक्रियपणे मध्यस्थी करत आहेत, परंतु आता ते युद्ध थांबवू शकत नाहीत. इराण अत्यंत कडक अटी ठेवत आहे. सध्या तरी एक स्वीकारार्ह शांतता करार होण्याची शक्यता कमी असली तरी, आपण त्यासाठी नक्कीच आशा बाळगू शकतो. १९६१ नंतर प्रथमच ईद आणि नवरोज एकाच वेळी साजरे करण्यात आले. अशा दुर्मीळ संयोगामुळे युद्धविराम होऊन या प्रदेशात शांतता आणि समृद्धी नांदेल की नाही, हे सांगणे कठीण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा