शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतिक


भारतीय लष्कर आणि हवाई दल प्रमुखांच्या नुकत्याच केलेल्या विधानांनी पाकिस्तान आणि त्याच्या मालकांना स्पष्ट संकेत दिला आहे की, भारत आता त्याच्या जुन्या आत्मसंयम आणि संयमाच्या कवचात अडकलेला देश नाही. आॅपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले आहे की, नवी दिल्लीकडे केवळ निर्णायक लष्करी क्षमताच नाही तर ती वापरण्याचा दृढनिश्चयदेखील आहे. हा संकल्प आपल्या लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांच्या शब्दांत प्रतिध्वनित होतो. यामुळे पाकिस्तानबरोबरच राहुल गांधी आणि महाभागांना आणि त्यांच्या कंपूतील टोळीलाही समजले असेल.


राजस्थानमधील अनुपगड आघाडीवरून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्टपणे इशारा दिला की, जर राज्य पुरस्कृत दहशतवाद सुरू राहिला तर इस्लामाबादला ‘जगाच्या नकाशावरील त्याच्या स्थानाचा पुनर्विचार करावा लागेल.’ हे विधान केवळ शब्दांचा खेळ नाही तर भारताचे प्रतिबिंब आहे, जो आता आपल्या सैनिकांवर आणि नागरिकांवर हल्ले शांतपणे सहन करण्यास तयार नाही. हा आत्मविश्वास आला आहे हे फार महत्त्वाचे आहे.

हे पाहून, आॅपरेशन सिंदूरच्या अनुभवाने भारताची रणनीती अधिक तीव्र केली आहे. लष्करप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की, गेल्या वेळी दाखवलेला संयम पुन्हा होणार नाही. संदेश सोपा आहे, भारत आता स्वसंरक्षणासाठी नाही तर शत्रूच्या आक्रमणाला मुळापासून उखडून टाकण्याची रणनीती स्वीकारेल. सैनिकांना सतत सतर्क राहण्याचा आणि ‘पूर्णपणे तयार’ राहण्याचा आदेशदेखील सूचित करतो की, सीमेपलीकडून होणाºया कोणत्याही कारवाईला आता समान प्रतिसाद मिळेल.


दुसरीकडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी पाकिस्तानच्या ‘मनोरंजन कथा’ फेटाळून लावल्या आणि स्पष्ट केले की, आॅपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. भारतीय हल्ल्यांमध्ये एफ-१६ आणि जेएफ-१७ सारखी लढाऊ विमाने, विशेष मोहीम विमाने आणि प्रमुख हवाई तळ नष्ट झाले. ३०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर एस-४००ने शत्रूचे विशेष विमान पाडले हा भारताच्या तांत्रिक श्रेष्ठतेचा जिवंत पुरावा आहे.

हा संदेश पाकिस्तानसाठी तितकाच खोल आहे जितका तो आंतरराष्ट्रीय समुदायासाठी स्पष्ट आहे. जगाने भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराची केवळ कबुली दिली नाही तर त्याला उघडपणे पाठिंबाही दिला आहे. या जागतिक वातावरणामुळे भारतीय नेतृत्व अधिक धाडसी झाले आहे. आज, भारताचा विश्वास केवळ त्याच्या शस्त्रांच्या बळावर नाही तर नैतिक बळावर आणि धोरणात्मक स्पष्टतेवर आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा भारताचा अधिकार आता वादाचा विषय राहिलेला नाही. खोटेपणा आणि नकाराच्या आडून पाकिस्तान किती काळ आपले अपयश लपवत राहील हा एकमेव प्रश्न आहे.


इतिहास साक्षीदार आहे की १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये सामान्य नागरिकही सैनिकांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले. लष्करप्रमुखांनी त्या परंपरेची आठवण करून दिली आहे की, जर पाकिस्तानने विवेकबुद्धी दाखवली नाही तर येणारे युद्ध हे केवळ सैन्याचे युद्ध राहणार नाही; ते राष्ट्राच्या सामूहिक विवेकाचे आणि सामर्थ्याचे युद्ध असेल.

आज, भारतीय लष्कर आणि हवाई दल केवळ तांत्रिक आधुनिकीकरणातच नव्हे तर धोरणात्मक विचारसरणीतही एका नवीन युगात प्रवेश करत आहेत. ड्रोनपासून ते क्षेपणास्त्र संरक्षणापर्यंत, प्रत्येक स्तरावर भारताची तयारी दर्शवते की शत्रूच्या प्रत्येक हालचालीला अधिक शक्तिशाली आणि प्राणघातक प्रत्युत्तराने तोंड दिले जाईल.


पाकिस्तानला आता हे समजून घ्यावे लागेल की भारत बदलला आहे. हा नवा भारत संयम आणि वाट पाहण्याऐवजी निर्णायक कृतीचे प्रतीक आहे आणि जेव्हा एखादा राष्ट्र आपल्या सैनिकांवर, तंत्रज्ञानावर आणि नैतिक शक्तीवर- या तिन्हींवर- इतका विश्वास ठेवतो तेव्हा ते थांबवणे अशक्य होते. पाकिस्तानने कितीही ‘कथा’ सांगितल्या तरी, सत्य हे आहे की, भारत आता केवळ तयार नाही तर कोणत्याही आक्रमणाचा बदला घेण्यासही तयार आहे. या कृतीतून भारतीय संरक्षण यंत्रणेने केवळ पाकिस्तानच्याच नाही तर विरोधकांच्या डोळ्यातही अंजन घातले आहे.

सध्या भारतात पाकिस्तानपेक्षा पाकिस्तानची पाठराखण करणाºया विरोधी शक्तींचाच उपद्रव जास्त आहे. भारतीय सैन्याचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम काँग्रेसने केले. ट्रम्प यांच्या निराधार वक्तव्यांचा आधार घेत भारतीय लष्करावर संशय व्यक्त केला. केंद्र सरकारच्या नावाने बदनामी करण्याचे काम विरोधकांनी केले. अधिवेशनात त्यावर गोंधळ घालून संसदेचा वेळ वाया घालवला. कोणतेही विधायक काम न करता विरोधकांनी पाकिस्तानला पुरक अशी वक्तव्ये केली. हे षड्यंत्र केवळ सत्ताधाºयांना बदनाम करण्यासाठी केलेले होते. आपल्याला सत्ता मिळत नाही म्हणून कोणत्याही थराला जाण्याच्या प्रवृत्तीने झपाटलेले विरोधक पाकिस्तानचे कौतुक करतात, भारतीय सैन्यावर संशय घेतात आणि आॅपरेशन सिंदूरवर टीका करतात. अशांना या दोन्ही वक्तव्यांनी चांगलेच झापडले आहे. राहुल गांधी भारताची किती विमाने पाडली म्हणून चौकशी करत होते. पण पाडलीच नाही तर सांगणार काय? आणि पाडली असती तर ती दिसली नसती का? पण पाकिस्तानची विमाने पाडल्यामुळे पाकिस्तानने आपणही भारताला चोख उत्तर दिले असा कांगावा केला. त्या पाकिस्तानी सुरात सूर मिसळण्याचे काम राहुल गांधींनी केले. त्याला चांगलीच चपराक भारतीय लष्कर आणि हवाईदलाकडून मिळाली आहे. आता तरी राहुल गांधी देशप्रेम दाखवतील आणि सैन्य आणि शेतकरी यात राजकारण करणार नाही अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: