गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

कोण म्हणतो या देशातील सहिष्णुता संपली?

 



मागच्या आठवड्यात नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा नाट्यानंतर जे पडसाद उमटले, तसेच अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या स्वैराचारानंतर एक शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला. तो म्हणजे सहिष्णुता. अनेक नेते, पुरोगामी, तथाकथीत पुरोगामी, स्वयंघोषित विचारवंत कशाचा कशाला संबंध जोडून सहिष्णुतेबाबत बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते.


खरं तर स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या साठ वर्षांत सहिष्णुता हा शब्द आपल्या देशात कधी माहितही नव्हता; पण गेल्या सात वर्षांत म्हणजे केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आणि त्यापेक्षा गेल्या सहा दिवसांत देशभरातील वृत्तवाहिन्यांवर हा शब्द फार वापरला गेला. म्हणजे असे दिसते की, या विचारवंतांच्या मतावरून सहिष्णुता संपली आहे, असे भासवले जात आहे; पण ते काही खरे नाही.

या देशातील नागरिकांइतकी सहिष्णुता कोणत्याच देशात नसेल. वाहिन्यांवरून आपली मते लादणारे अँकर, वृत्त निवेदक आणि एखाद्याला टार्गेट करणारी पत्रकारीता पाहिल्यावर या देशातील नागरिकांच्या सहनशक्तीला सलाम केला पाहिजे. कोण म्हणतो या देशातील नागरिक सहिष्णु नाहीत? वायफळ आणि कोणत्याही निष्कर्षाविना होत असलेल्या वाहिन्यांवरच्या चर्चा, संदर्भहिन मालिका, कथानक महिनोंमहिने पुढे न सरकणाºया मालिका आणि विविध वाहिन्यांवरील तेच तेच विषय सहन करणारे प्रेक्षक पाहिल्यावर या देशातील सहिष्णुता संपली आहे, असे बिल्कुल वाटत नाही.


काही वर्षांपूर्वी अशीच मते अभिनेता आमिर खानने व्यक्त केली होती. आमिर खान याच्या वक्तव्याने चार वर्षांपूर्वी असाच सहिष्णुतेचा विषय चर्चेत आला होता; पण आपल्याकडे सहिष्णुतेचा आधार घेणाºया आणि न घेणाºया सगळ्याच राजकीय पक्षांना कधी आमिर खान, कधी सलमान खान, कधी शाहरूख खान या खानावळीत भोजन करून आपली पोळी भाजायला आवडते. उलट ज्याप्रकारे सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांमधून याबाबत एरंडाचे गुर्हाळ चालवले जाते. त्यावरून राजकीय पक्षांची सहिष्णुता आता संपली आहे, असे दिसते.

या देशातील प्रसारमाध्यमे अनेक वेळा भुई धोपटण्याचे काम सतत करत असतात. जेव्हा मूळ प्रश्न बाजूला टाकायचा असतो, तेव्हा उपप्रश्नाला जास्त महत्त्व येते.


कोणी जरा स्पष्टपणे मते मांडली की, सहिष्णुता संपली असे होते. त्याला स्वयंघोषित पुरोगाम्यांनी वाटेल तसे उत्तर दिले की, सहिष्णुता शिल्लक असते; पण याचे खापर मात्र जनतेवर फोडले जाते, याचे आश्चर्य वाटते. सोशल मीडियावर तर हा उत्साह उतू जावू लागला. ‘सहिष्णुता-असहिष्णुता’ यावर कितीही वाद होऊ शकला आणि सरकारला जेवढा द्यायचा आहे तेवढा दोष दिला, तरी कोणत्याही परिस्थितीत या देशातल्या कोणीही ‘मी देश सोडून जातो,’ असे म्हणत नाही. आमिर खानने काही वर्षांपूर्वी या सहिष्णुतेच्या अभावाने आपण देश सोडू, असे म्हटले होते; पण त्याने बायकोला सोडले देश सोडला नाही. सहमतीने घटस्फोट घेण्याचा नवा फॉर्म्युला तयार केला, तरी सर्वांनी तो मान्य केला. हे कोणत्या देशात चालले असते? भारतातच हे शक्य झाले आहे; पण भारतात सगळं काही चांगले मिळत असताना, एकाएकी त्याला काही वर्षांपूर्वी या देशात भीती वाटत होती. असे काय कोणी आमिरला केले होते की, हा देश सोडून जावेसे वाटले? पण या तथाकथीत विचारवंतांना किंचित समाजसेवा करायची, एखादी एनजीओ उभी करायची आणि शासकीय फायदे घ्यायचे, आंतरराष्ट्रीय मदत मिळवायची आणि सरकारला दोष द्यायचा एवढेच जमते.

नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्ही देश सोडून जाऊ म्हणणारे अनेक विद्वान या देशात अजूनही आहेत. तेव्हा किती आकांड तांडव केले होते आणि काँग्रेसचे समर्थन या तथाकथीत अर्थतज्ज्ञांनी केले होते. कोणी देश सोडून गेले नाही. खरं तर अशा तथाकथीत विद्वानांना आपण सहन करतो यापेक्षा कोणती सहिष्णुता असेल?


कोरोना काळात जनतेने सहन केले, सहिष्णुता दाखवली, आपले हाल करून घेतले म्हणून तर आपण त्यावर मात करू शकतो आहोत; पण विनाकारण राजकीय पक्षांना बदनाम करण्यासाठी, मनात आढी ठेवून बोलण्याचा सवंग प्रकार हा थांबला पाहिजे. सहिष्णुता हा इतका स्वस्त शब्द करण्याचे कारण नाही. खरं तर कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया उमटली, रिअ­ॅक्शन आली की, त्याची चर्चा होते; पण ही प्रतिक्रिया ज्याच्यामुळे उमटली त्या क्रियेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. जनतेचा उद्रेक होतो, कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, तोडफोड करतात याची चर्चा होते; पण ते का असे करत आहेत, याकडे लक्ष दिले जात नाही. वाहिन्या तोच तोच भाग पुन्हा पुन्हा जोडून घाबरवून सोडतात. मत व्यक्त करायला भाग पाडतात. सहिष्णुतेला आव्हान देतात. हे प्रकार थांबले पाहिजेत. ही तोडफोड का झाली त्याची स्पष्टता सत्य बाजू दाखवणे गरजेचे असते. मग अशा आंदोलकांवर, कार्यकर्त्यांवर पोलीस सौम्य ते बेछूट लाठीमार करतात तो त्यांचा संयम गेला म्हणूनच ना? मग पोलिसांची सहिष्णुता संपली असे म्हणता येईल का? त्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देताना आपण काय शब्द वापरतो, कुणावर टीका-टिप्पणी करतो याचे भान विचारवंतांना असले पाहिजे. सहिष्णुता या शब्दाचे अवमूल्यन करण्याचा हा प्रकार आहे. तो थांबला पाहिजे.

या वायफळ चर्चांनी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, तरीही नागरिकांनी कसलीही तक्रार केली नाही. कारण इथला सामान्य नागरिकच सहिष्णु आहे. सहिष्णुता संपुष्टात आणली आहे ती राजकीय नेत्यांनी. सहिष्णुता संपुष्टात आलेली आहे ती वाहिन्यांची. स्पर्धेत आपल्या पुढे कोणी गेले, तर आपले कसे व्हायचे या भीतीच्या पोटी ही सहिष्णुता संपुष्टात आली. याचे खापर मात्र फोडले गेले ते नागरिकांच्या सहिष्णुतेवर.


या देशाएवढा सुंदर देश जगात कुठचाही नाही, ही भावना प्रत्येक भारतीयाने मनात बाळगलीच पाहिजे. ज्या अत्यंत असहिष्णु घटना देशात घडत आहेत, त्याबद्दलचा उद्रेक व्यक्त करताना आमिरने त्याच्या पत्नीची जी भावना सांगितली असेल, ती खरी असो किंवा खोटी असो, तशी भावना व्यक्त करणे चुकीचे आहे; पण आमिरच्या पत्नीने देश न सोडता त्याला सोडला हा काय प्रकार आहे? हा तोच आमिर आहे का जो राँग नंबर म्हणून पीकेमध्ये लोकांच्या डोळ्यात अंजन घालत होता. या देशात गेल्या काही महिन्यांत अत्यंत टोकाचे असे असहिष्णु वातावरण तयार केले जात आहे. हे वातावरण तयार करण्याचे काम राजकीय नेते आणि प्रसारमाध्यमे करत आहेत. खळबळजनक काहीतरी दाखवण्यासाठी कोणाला, तरी बोलवायचे आणि त्यावरून बातम्या घडवायच्या या प्रकारात देशात कुठे अशांतता माजणार नाही ना हे पाहणे गरजेचे आहे. पण जनता या सर्वांना सहन करत आहे, यासारखी सहिष्णुता कुठे असेल?

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: