भारताची एकूणच फिल्म इंडस्ट्री ही जरी मराठी माणसांनी निर्माण केलेली असली, तरी बॉलीवूडमध्ये अमराठी लोकांचे वर्चस्व कायम राहिले आहे. दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेल्या या तंत्राला व्ही. शांताराम यांच्यासारख्या मराठी माणसांनीच समृद्ध केले; पण काही अपवाद वगळता मराठी कलाकार हे हिंदी चित्रपटात नायक न राहता सहाय्यक अभिनेते, चरित्र अभिनेते म्हणूनच झळकले. यातील काही मराठी कलाकारांनी आपला चांगला ठसा उमटवला असला, तरी नायक म्हणून फार कमी मराठी कलाकारांना बॉलीवूडमध्ये संधी मिळाली आहे.
मराठी चित्रपटात व्ही. शांताराम यांच्या पिंजरातून नायक म्हणून चमकल्यावर झाकोळसारखे अनेक मराठी चित्रपट श्रीराम लागू यांनी केले; पण हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायक, चरित्र अभिनेता म्हणून असंख्य चित्रपटातून काम केले आहे. मोठमोठ्या दिग्गजांपुढे त्यांनी आपला अभिनयाचा प्रभाव पाडला आहे. अमिताभ बच्चनबरोबर मुकद्दर का सिकंदर, लावारीस अशा चित्रपटातून डॉ. लागू नकारात्मक भूमिकेतच समोर आले आहेत. राजेश खन्नाबरोबर सौतनसारख्या चित्रपटातून एका अस्पृश्य माणसाची भूमिका त्यांनी केली आहे. जितेंद्रबरोबर हम तेरे आशिक हैं, मुद्दत, दिलवाला हे मिथुन चक्रवर्तीबरोबर तर बहुतेक सर्वच तत्कालीन नायकांबरोबर श्रीराम लागूंनी काम केले; पण नायक म्हणून ते बॉलीवूडमध्ये झळकले नाहीत.
त्यापूर्वी रमेश देव या मराठी नायकाने असंख्य मराठी चित्रपटात आपला ठसा उमटवला होता; पण हिंदी चित्रपटात ते सहकलाकार आणि खलनायकच राहिले. आनंद चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दोघांबरोबर रमेश देवला लोकप्रियता मिळाली; पण खुद्दार, कसोटी अशा अनेक चित्रपटातून रमेश देव हे खलनायकाचे सहाय्यक अशा दुय्यम भूमिकेतच दिसले. मुख्य नायक किंवा मुख्य खलनायकही वाट्याला आला नाही.
त्या तुलनेत मुख्य खलनायक म्हणून सदाशिव अमरापूरकर, नाना पाटेकर यांनी बाजी मारली; पण नायक म्हणून फक्त दिसला तो सचिन. ताराचंद बडजात्याच्या चित्रपटातून तो झळकला. यशस्वीही झाला, परंतु मराठी चित्रपटात सुपरस्टार असणारे कोणीही रजनीकांतप्रमाणे नायक म्हणून बॉलीवूडमध्ये झळकले नाहीत, याचे आश्चर्य वाटते.
अशोक सराफ यांनी अनेक हिंदी चित्रपटातून आपले दर्शन दाखवले; पण बºयाचशा चित्रपटांत तो खलनायकांच्या टोळीतील सहखलनायक म्हणूनच दिसला. यामध्ये प्रतिघात या एन चंद्राच्या चित्रपटातील वकील असो वा मुद्दतमधील नोकर. बहुतेक मराठी कलाकारांनी अशा दुय्यम भूमिकाच केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यालाही अनेक हिंदी चित्रपट मिळाले; पण त्यात नायकाचा मित्र, नोकर अशाच भूमिका जास्त होत्या. मैने प्यार किया, हम आपके हैं कौनसारख्या चित्रपटातून तो चमकला; पण नायक म्हणून मराठीतील हा हुकमी एक्का नाही चमकू शकला.
मराठीतील रुबाबदार नायक अशी ओळख असलेल्या रवींद्र महाजनी यांनीही बेअब्रू नावाचा एक हिंदी चित्रपट केला होता. त्यात त्याने पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती; पण हा चित्रपट सी ग्रेड आणि लो बजेट असाच होता. कोणतीही चांगली स्टारकास्ट यात नव्हती.
अजिंक्य देव यानेही काही हिंदी चित्रपटात काम केले आहे; पण ती सहनायक किंवा नकारात्मक अशीच आहेत. संसार या चित्रपटात राज बब्बर, रेखा या नायक-नायिकेसोबत छोट्या भावाची भूमिका त्याला मिळाली आहे; पण मराठीत अनेक हिट चित्रपट देणारे आमचे मराठी कलाकार नायक म्हणून बॉलीवूडमध्ये चमकले नाहीत.
मराठीत नायक आणि खलनायक अशा भूमिका करणारे आमचे निळु फुले यांनी अनेक हिंदी चित्रपटात कामं केली; पण त्यात ते मुख्य खलनायक किंवा नायक म्हणून चमकू शकले नाहीत. भयानक या रहस्यमय चित्रपटात सुटाबुटातील निळु फुलेसमोर आले, तेव्हा वाटले आता हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या खलनायकीने ते आता व्यापून टाकणार; पण नंतर फारशी संधी मिळाली नाही. अमिताभ बच्चनच्या कुलीमध्ये त्यांनी लक्षात राहिल असे काम केले आहे; पण मराठी कलाकार मुख्य नायकाच्या भूमिकेत हिंदीत फारसा दिसला नाही. दादा कोंडकेंनी तीन-चार हिंदी चित्रपट काढले; पण सबकुछ दादा असलेल्या दादा कोंडकेंच्या चित्रपटात बाकी कोणाला वावच नसायचा; पण मराठी इतका हिंदीत त्यांनाही प्रतिसाद नाही मिळाला. त्यामुळे या चित्रपटसृष्टीचा पाया घालूनही मराठी माणसाला हिंदीचे नायकपद अजून प्राप्त झाले नाही.
त्या तुलनेत शोभना समर्थ, नूतन, तनुजा, उषा किरण, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. सुलोचना, जयश्री गडकर, ललीता पवार, सीमा देव, रोहिणी हट्टंगडी, उमा भेंडे, पद्मा चव्हाण शुभा खोटे, सुषमा शिरोमणी यांनी सहनायिका, चरीत्र अभिनेत्रीपण यशस्वीपणे गाजवले.
टॉलीवूडचा सुपरस्टार अशी ख्याती झाल्यावर १९८०च्या दशकात रजनीकांतने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रिना रॉयपासून श्रीदेवीपर्यंत अनेक नायिकांसोबत अनेक चित्रपट दिले. त्याचे चित्रपट मल्टिस्टार कास्ट राहिले, तर रजनीकांतचे नाव झाले. अंधा कानूनमध्ये विशेष भूमिकेत हिंदीतील सुपरस्टार अमिताभ बच्चन असला, तरी चित्रपटाचा नायक रजनीकांत होता. गिरफ्तारमध्ये छोटीशी भूमिका असली, तर अमिताभ बच्चन, कमल हसन यांच्या बरोबरीने रजनीकांतची भूमिका गणली गेली होती. चालबाजमध्ये जोडीला सनी देओल असला, तरी रजनीकांतच्या नावावर हा चित्रपट जमा झाला होता. हिंदीतील नायकपद त्याने मिळवले होते. तसे भाग्य अजूनही मराठी कलाकारांच्या वाट्याला आले नाही. अगदी इकबालमधून श्रेयस तळपदे झळकला, तरी तो पुढे लक्षात राहिल इतका चालला नाही.
प्रफुल्ल फडके/द स्क्रीन
9152448055\\